देशात असो की राज्यात आजमितीस धर्म आणि राजकारणाची सरमिसळ करण्याचे उद्योग सुरू आहे. धर्मांध भाषण, वक्तव्ये करून, राजकारणातील कार्यकर्त्यांना पेटवून
देशात असो की राज्यात आजमितीस धर्म आणि राजकारणाची सरमिसळ करण्याचे उद्योग सुरू आहे. धर्मांध भाषण, वक्तव्ये करून, राजकारणातील कार्यकर्त्यांना पेटवून देण्याचे नसते उद्योग सुरू असल्यामुळे अशांतता वाढत चालली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये उसळलेली दंगल, झालेला हिंसाचार हा धर्म आणि राजकारणाची सरमिसळ होत असल्याचे प्रतिबिंब या घटनेतून दिसून येते. धर्मांध वक्तव्ये, भडकावू भाषणे यातून विखार उत्पन्न करण्यात येत आहे. यातून हिंसाचारात्मक बाबी घडवण्यातच काहींना रस असल्याचे दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वीच न्यायालयाने देखील महाराष्ट्र सरकारला चांगलेच फटकारले होते. असे असतांना, राज्य अशांत राहण्यासाठी आणि आपली राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी काही पक्ष, संघटना पुढे सरसावल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे अशा जातीय दंगली घडतांना दिसून येतात. छत्रपती संभाजीनगरमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून जातीय दंगली घडलेल्या नाहीत. अनेक उत्सव, शांततेने साजरे होत आहेत. मात्र नेमके रामनवमीच्या रात्री काय घडले की, ही दंगल उसळून आली. बरं ही दंगल संपूर्ण शहरात पसरली नव्हती, तर शहरातील एक भाग असलेल्या किराडपुरामध्येच झाली. याठिकाणी श्रीरामाचे मंदिर असून, या मंदिराची कमान तथाकथित लोकांनी तोडल्याच्या अफवेरून ही दंगल सुरू झाली. वास्तविक पाहता छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये हिंदू आणि मुस्लिम समुदाय मोठया प्रमाणावर असून, या समुदायामध्ये फक्त वादाची ठिणगी पडण्याची गरज, लगेच वणवा पेटायला वेळ लागत नाही. अशा संवेदनशील परिसरामध्ये पोलिस कायदा व सुव्यवस्था उत्तमरित्या हाताळात आहेत. मात्र कालचा हिंसाचार हा नेमक्या कोणत्या कारणामुळे निर्माण झाला, याचा पोलिस शोध घेतीलच. मात्र ही दंगलीची दाहकता इतकी होती की, काही गटाने पोलिसांवर हल्ले करण्यास देखील मागेपुढे राहिले नाही. या हल्ल्यात तब्बल 15-17 पोलिस जखमी झाले आहे. या तथाकथित लोकांनी पोलिसांची तब्बल 8-9 वाहने जाळून टाकली. पोलिसांनी वेळीच नियोजन केल्यामुळे आणि जास्त कुमक मागवून, या जमावाला 100 मीटरच्या बाहेर जावू दिले नाही, म्हणून मोठा अनर्थ ठरला. अन्यथा या दंगलीत अनेकांचे बळी गेले असते. शिवाय ही दंगल मध्यरात्री पेटवण्यात आली. छत्रपती संभाजीनगर शहर शांतपणे झोपलेले असतांना, तथाकथित धर्मांचे ठेकेदार जागे झाले आणि त्यांनी ही दंगल घडवून आणली. आपले जे संरक्षण करतात, कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी ज्यांच्यावर आहे, त्यांच्यावर हल्ले करण्यास देखील या जमावाने मागे-पुढे पाहिले नाही. मात्र पोलिसांनी ही दंगल उत्तमरित्या हाताळल्यामुळे दुर्दैवी घटना घडली नाही. मात्र या हिंसाचारानंतर आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरू झाली आहे. ठाकरे गटाने महाविकास आघाडीची सभा होवू नये, यासाठीच हा हिंसाचार घडवून आणल्याचा दावा केला आहे. विशेष म्हणजे ठाकरे गटाने थेट भाजपवर आरोप केला आहे. ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी तर थेट याप्रकरणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच मास्टरमाईंड असल्याचा आरोप केला आहे. तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र समन्वय दाखवत, राजकारण करण्याची ही वेळ नसून, जनतेने शांतता राखण्याची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. त्यामुळे तथाकथित धर्मांच्या ठेकेदारांनी शांतता पाळण्यातच धन्यता मानावी. कारण मानव जातीच्या दृष्टीने तेच महत्वाचे आहे.
COMMENTS