महाराष्ट्रातील तीन ओबीसी नेत्यांची वक्तव्य पाहता आणि त्याचा अन्वयार्थ जर आपण शोधायला गेलो, तर, त्यातून नेमकं काय समोर येतं, हे आपण आजच्या सदरात

महाराष्ट्रातील तीन ओबीसी नेत्यांची वक्तव्य पाहता आणि त्याचा अन्वयार्थ जर आपण शोधायला गेलो, तर, त्यातून नेमकं काय समोर येतं, हे आपण आजच्या सदरात बघणार आहोत. सांगली मतदारसंघात ओबीसी बहुजन आघाडीचे संस्थापक नेते प्रकाशआण्णा शेंडगे हे लोकसभा निवडणुकीसाठी उभे आहेत. त्यांना निवडणूकपूर्वी वंचित बहुजन आघाडीचे नेते ऍड. बाळासाहेब प्रकाश आंबेडकर यांनी पाठिंबा दर्शवला होता. या पाठिंब्याचे वैशिष्ट्ये असे होते की, त्यांनी सर्वप्रथम ज्या उमेदवारांना पाठिंबा दिला होता, त्यातील पहिला पाठिंबा हाच होता. मात्र अचानक यावर घुमजाव केला आणि काँग्रेस पक्षाचे बंडखोर उमेदवार विशाल पाटील यांना त्यांनी आपले समर्थन दिले. यावर बऱ्याच काळानंतर प्रकाश अण्णा शेंडगे यांनी टीका केली. ते म्हटले की, धनदांडगा व्यक्ती भेटल्याबरोबर वंचित बहुजन आघाडीने माझा पाठिंबा काढून घेतला; जी वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्रामध्ये श्रीमंत आणि गरीब मराठा असा भेद करून निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी सातत्याने लोकांमध्ये जाऊन बोलत होती. त्याच पक्षाने काढून घेतलेला हा पाठिंबा, वंचित बहुजन आघाडीची भूमिका अनाकलनीय ठरवतो. त्याचवेळी विजय वडेट्टीवार यांनी उज्वल निकम यांच्या उमेदवारीवर टीका करताना एस एम मुश्रीफ यांच्या पुस्तकाचा हवाला देऊन उज्वल निकम यांनी पाकिस्तानच्या दहशतवाद्यांच्या विरोधातील लढा देताना, काही गोष्टी देशापासून लपवल्या, असा आरोप केला. दुसऱ्या बाजूला परभणी येथे राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार असलेले तथा राष्ट्रीय अध्यक्ष असणारे महादेव जानकर यांना महायुतीने आणि विशेषत: भाजपने पूर्ण पाठिंबा दिला असताना, काल त्यांनी बारामती येथे महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांचा प्रचार करताना, त्यांच्या प्रचार सभेत मी परभणी मतदार संघातून निवडून येणार आहे, परंतु माझे मताधिक्य काहींनी दगाबाजी केल्यामुळे घटणार आहे, असं वक्तव्य केलं.
या तीनही ओबीसी नेत्यांचं वक्तव्य हे देशाच्या राजकारणाचे प्रातिनिधिक ध्वनी आहेत. ओबीसी संख्येने बहुल असतानाही प्रत्येक मतदारसंघात त्यांच्या समोर उभे राहिलेले संकट आणि त्यातून त्यांनी राजकारणाचे दाखविलेले गणित हा निश्चितपणे ओबीसी समुदायाला राजकारणाची एक परिपक्व ओळख करून देणारा घटक ठरतो आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुका या निश्चितपणे गेल्या ७० वर्षातील वैशिष्ट्यपूर्ण आणि वेगळ्या अशा निवडणुका आहेत. या निवडणुकांमध्ये कोणत्याही पक्षाच्या नेतृत्वाला फार विचारात घेतले जात आहे, असे नव्हे. परंतु, देशाच्या जनतेमध्ये एक माहोल निर्माण झाला आहे आणि तो माहोल बेरोजगारी, महागाई, अशांतता आणि देशात सुरू असलेली बड्या उद्योजकांची लूट, या सगळ्या मुद्द्यांबोवती जनतेला अधिक अस्वस्थ करत आहे. यातूनच जनतेने या निवडणुकांची सूत्र पूर्णपणे आपल्या हातात घेतली आहेत. महाराष्ट्रातील हे तिघेही ओबीसी नेते जे वक्तव्य करत आहेत, ते त्यांच्या स्वतःसाठी किंवा त्यांच्या वेगवेगळ्या पक्षांसाठी जरी करीत असले, तरीही, व्यवस्थेला भेदण्याची आणि टक्कर देण्याची जी सर्वंकष तयारी त्यांनी केली आहे, त्याचं निश्चितपणे कौतुक करायला हवे. ओबीसींचा लढा हा व्यापक आहे. परंतु, त्या आधारावर त्याची वैचारिक मांडणी नव्याने होणे गरजेचे आहे. कारण ओबीसी आतापर्यंत वेगवेगळ्या पक्ष विचारांच्या माध्यमातून काम करत आल्यामुळे, त्याची स्वतःच्या पक्षाची रचना तो करू शकलेला नाही. ही बाब २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत खटकणारी ठरलेली आहे, यात दुमत असण्याचे कारण नाही! त्यामुळे लोकसभा निवडणुकीनंतर लगोलग राज्यामध्ये विधानसभेच्या निवडणुका ऑक्टोबर-नोव्हेंबर मध्ये होऊ घातलेल्या आहेत. त्यासाठी आता ओबीसींनी स्वतःच्या समस्यांना सोडवणारी आणि आपली ताकद दाखवणारा राजकीय पक्षाची खंबीरपणाने उभारणी करावी. त्या नव्या पक्षाने विधानसभेच्या निवडणुकांत सत्तेसाठीच आपला आवाज बुलंद करावा. हाच या तिन्ही ओबीसी राजकीय नेत्यांच्या अस्वस्थ्येतून संदेश घ्यावा, अशी परिस्थिती आज आहे.
COMMENTS