काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्या नेत्यांमधील अंतर्गत मतभेदांची तीव्रता जशी वाढत गेली, तशी त्यांची सत्तास्थानावरची समजुतदारीही वाढत
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्या नेत्यांमधील अंतर्गत मतभेदांची तीव्रता जशी वाढत गेली, तशी त्यांची सत्तास्थानावरची समजुतदारीही वाढत गेली. निवडणुका आल्या की नेत्यांचे मतभेद पराकोटीचे उफाळून यायचे आणि त्यातून एकमेकांना पराभवाची भेट कशी करता येईल, यासाठीच त्यांच्या अंतर्गत खेळी होत्या. पण, १९९९ ते २०१४ या जवळपास पंधरा वर्षांमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन पक्षांची अभेद्य आघाडी राहिली. तीन टर्म लागोपाठ राज्याची सत्ताही सांभाळली या दोन्ही पक्षांमध्ये सुंदोपसुंदी अशा पद्धतीने वाढत गेल्या की दोघांपैकी कोणत्याही पक्षाला बहुमत मिळणे दुरापास्त झाले. तर, दुसऱ्या बाजूला शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांमध्येही कायम युती राहिली. भाजप शिवसेनेला राज्यांतर्गत मोठा भाऊ संबोधत आपली शक्ती वाढवत राहिला. ही शक्ती कशी वाढली याचे रिफ्लेक्शन आपल्याला सन २०१४ मध्ये दिसून येतात. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी सलग पंधरा वर्षे सत्ता उपभोग दिल्यानंतर दोन्ही पक्षनेत्यांच्या महत्त्वकांक्षा काहीशा वाढल्या होत्या; काहीशा तणावग्रस्त होत्या. त्यामुळेच २०१४ च्या निवडणुकीत जागा वाटपावरून यांच्यामध्ये दीर्घकाळ चर्चा रेंगाळली. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने १४४ जागा आणि मुख्यमंत्रीपद, अशी दुहेरी मागणी काँग्रेसकडे केली. यावर दीर्घकाळ चर्चा होत राहिली. २५ सप्टेंबर २०१४ ला काँग्रेसने राष्ट्रवादी काँग्रेसला काहीही न कळवता आपल्या ११८ जागा घोषित केल्या. या एका कृतीतून पंधरा वर्षे सत्तेत सहभागी असणाऱ्या या आघाडीची इतिश्री झाली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने समाजवादी पार्टी बरोबर आपली आघाडी करण्याचा याच काळात निर्णय घेतला. दुसऱ्या बाजूला शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष यांचीही जवळपास २५ वर्षाची युती – ज्यामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, (आठवले गट), स्वाभिमानी शेतकरी संघटना, राष्ट्रीय समाज पक्ष हेदेखील या युतीचे सहकारी दल होते. याचवेळी बीजेपी ने युतीमध्ये १४४ जागांची मागणी केली. यामध्ये कमी जास्त करत शेवटी त्यांनी १३० जागांपर्यंत आले. परंतु, शिवसेनेने त्यांना फक्त ११९ जागाच देण्याचा आणि १८ जागा युतीमध्ये सामील असणाऱ्या इतर चार पक्षांना देण्याचा प्रस्ताव शिवसेनेने ठेवला. शिवसेनेने आपल्यासाठी १५१ जागा या निश्चित करण्याचं ठरवलं आणि हाच विषय शिवसेना आणि भाजप यांच्या २५ वर्षाच्या युतीला तोडण्यासाठी पूरक ठरला. २५ डिसेंबर २०१४ ला शिवसेना आणि बीजेपी ची युती देखील तुटली. मग महाराष्ट्रात चित्र असं निर्माण झालं की काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि बीजेपी हे चारही पक्ष स्वतंत्रपणे निवडणुका लढायला लागले. अर्थात यामध्ये एक छोटा भाग निश्चितपणे होता की काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन पक्षांची राजकीय जागा वाटपामध्ये यशस्वीता साध्य झाली नसली तरी काही जागांवर ते एकमेकांसाठी प्रयत्न करत होते. तर दुसऱ्या बाजूला शिवसेना आणि भाजप यांचा समान धागा म्हणजे हिंदुत्व. त्यामुळे ते स्वतंत्र जरी लढले तरी या दोन्ही पक्षांची मतं त्यांचे उमेदवार कुठे स्ट्रॉंग आहेत त्या ठिकाणी एकमेकांना मदत करणारे ठरले. परंतु, असं असलं तरी २०१४ च्या निवडणुकीमध्ये जो निकाल आला, त्या निकालाने मोठे धक्के दिले. सर्वात मोठा धक्का म्हणजे याच निवडणुकीत जो भारतीय जनता पक्ष शिवसेनेला मोठा भाऊ महाराष्ट्रात म्हणत होता, त्या भारतीय जनता पक्षाला १२२ जागांवर विजय मिळाला; तर, शिवसेना ६३ जागांवर विजय मिळवू शकली. भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांच्या मिळून जागा जवळपास १८५ एवढ्या २०१४ च्या निवडणुकीत मिळवल्याचे आपल्याला दिसतात. २८८ च्या सभागृहामध्ये १८५ च्या वर जागा घेणारे हे दोन्ही पक्ष पाहिल्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांना सत्ता स्थापन करण्याची कोणतीही शक्यता उरली नाही. परिणामी, भाजप आणि शिवसेनेचे सरकार बनेल, असा अंदाज असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार यांनी निवडणूक निकालानंतर लगोलग घोषणा केली की, आम्ही म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस भारतीय जनता पक्षाला सरकार स्थापन करण्यासाठी विनाशर्त पाठिंबा देईल. शरद पवारांच्या या खेळीने शिवसेनेची बार्गेनिंग पॉवर जी काही निर्माण झाली होती, ती, एकाएकी संपुष्टात आली. त्यामुळे २०१४ च्या निवडणुकानंतर भारतीय जनता पक्षाने देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन केले. शिवसेनेला सत्तेबाहेर ठेवण्यात यश मिळवले. परंतु, भाजप आणि शिवसेना या दोन्हीही पक्षांचे कार्यकर्ते यामुळे अस्वस्थ झाले होते. परिणामी, काही महिन्यानंतर भारतीय जनता पक्षाला शिवसेनेबरोबर सत्तेचे समीकरण बनवावे लागले!
COMMENTS