पोलिसांनी दखल घेतली आणि मुलीची सुटका झाली…

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पोलिसांनी दखल घेतली आणि मुलीची सुटका झाली…

कोकणातील आदिवासी कुटुंब आपल्या कोळसा भट्टीवर काम करीत नाही म्हणून त्यांच्या मुलीला तब्बल सहा वर्षे डांबून ठेवणार्‍या पाथर्डीतील कोळसा भट्टी मालकाला याबाबत पोलिसांकडून विचारणा झाली आणि तडक त्या मालकाने त्या कोकणातील आदिवासी कुटुंबाकडे जाऊन त्यांची मुलगी त्यांच्या सुपूर्द केली.

एसटी आंदोलनात ठिणगी; इस्लामपूर डेपोतून वाटेगावला निघालेली एसटी बस अज्ञातांनी फोडली
बकरी ईद निमित्त नगर येथे मुस्लिम बांधवांनी घरीच नमाज पठण केले
विकासासाठी आम्ही कोणाबरोबरही जाऊ शकतो ; खा. डॉ. विखेंची स्पष्ट भूमिका

अहमदनगर/प्रतिनिधी- कोकणातील आदिवासी कुटुंब आपल्या कोळसा भट्टीवर काम करीत नाही म्हणून त्यांच्या मुलीला तब्बल सहा वर्षे डांबून ठेवणार्‍या पाथर्डीतील कोळसा भट्टी मालकाला याबाबत पोलिसांकडून विचारणा झाली आणि तडक त्या मालकाने त्या कोकणातील आदिवासी कुटुंबाकडे जाऊन त्यांची मुलगी त्यांच्या सुपूर्द केली. अर्थात कोकणातील सर्वहारा जनआंदोलन या सामाजिक संस्थेने याबाबत पाठपुरावा करून पाथर्डी पोलिसांकडे मुलीच्या सुटकेची मागणी केली होती. त्यानंतर पोलिसांनी त्याची दखल घेतली.

 याबाबतची माहिती अशी की, कोकणातील रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील चिंचवली येथील आदिवासी मजूर कुटुंबातील सहाजणांचे कुटुंब सहा वर्षांपूर्वी पाथर्डी तालुक्यातील आंबेवाडी येथील एका कोळसाभट्टी मालकाकडे मजुरी कामासाठी आले होते. त्यांचे काम चांगले असल्याने त्यांनी कायमस्वरुपी आंबेवाडी येथेच राहावे, असा मालकाचा आग्रह होता. मात्र, मजुरांच्या कुटुंबाला ते शक्य नव्हते. तरीही काही दिवस हे कुटुंब येथे राहिले, पण नंतर काही दिवसांनी मजुरांनी परत जाण्याचा निर्णय घेतला व मालकाकडे केलेल्या कामाचा हिशोब मागू लागले. त्यामुळे चिडलेल्या मालकाने सर्वांना हाकलून दिले. पण, त्यांची एक लहान मुलगी (आताचे तिचे वय दहा वर्षे) आणि आणखी एका व्यक्तीला आंबेवाडीतच ठेवून घेतले. या मुलीला सोडावे म्हणून तिच्या पालकांनी वारंवार विनंती केली. पण मालकाने त्याला दाद दिली नाही. काही दिवसांपूर्वी या मुलीचे आई-वडिल तिला आणण्यासाठी आंबेवाडीला आले होते. तरीही मालकाने या मुलीला त्यांच्या ताब्यात दिले नाही. त्यामुळे या आदिवासी कुटुंबाला काय करावे हे सुचले नाही व ते परत कोकणात गेले.

सर्वहाराची घेतली मदत

कोकणात सामाजिक काम करीत असलेल्या सर्वहारा जन आंदोलन या संघटनेची माहिती या मुलीच्या पालकांना मिळाली व या कुटुंबाने या संघटनेचे जिल्हाध्यक्ष सोपान सुतार यांची 7 एप्रिल 2021 रोजी भेट घेऊन त्यांना सर्व माहिती सांगितली. या घटनेचे गांभीर्य आणि आदिवासी कुटुंबाची असहाय्यता लक्षात आल्यावर सुतार यांनी पाथर्डी पोलिस ठाण्यात संपर्क साधला व तेथील अधिकार्‍यांना आदिवासी कुटुंबासोबत घडलेला प्रकार सांगून त्या मुलीची सुटका करण्याची विनंती केली. पाथर्डी पोलिसांनी तातडीने दखल घेत आंबेवाडी येथे पोलिस पथक पाठविले. पण, त्या कोळसा भट्टीचा मालक सहा महिन्यांपासून तिथे राहत नसल्याची माहिती पोलिसांना मिळाली. येथेच केलेल्या चौकशीत, एक आदिवासी लहान मुलगी त्याच्याकडे असल्याची माहिती पोलिसांना तेथील लोकांना दिली. त्यानंतर पोलिसांनी त्या मालकाचा मोबाईल नंबर मिळवून त्याच्याशी संपर्क केला. तेव्हा त्याने आपण कर्नाटकात असल्याचे व ती लहान मुलगी आपल्यासमवेतच असल्याचेही कबूल केले.

पोलिसांकडून फोन आल्यानंतर मालकाने लगेच कर्नाटकातून थेट कोकण गाठले. आदिवासी कुटुंबाच्या घरी जाऊन त्या मुलीला त्यांच्या ताब्यात दिले. एवढ्या वर्षांनंतर आपली मुलगी मिळाल्याने त्या कुटुंबाला मोठा आनंद झाला. पण, त्यांनी तक्रार न दिल्याने पोलिसांनी कोळसाभट्टी मालकाविरुद्ध कारवाई केलेली नाही. पोलिसांच्या सांगण्यानुसार, तो मालक कर्नाटकात होता आणि तिकडूनच त्याने मुलीला ताब्यात दिले असल्याने पाथर्डीत गुन्हा दाखल केलेला नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान, तक्रार नसल्याने त्या मालकाविरूद्ध गुन्हा दाखल झालेला नाही. मुलीची आणि तिच्यासोबत आणखी एका व्यक्तीची सुटका झाल्यातच या आदिवासी कुटुंबाने यातच समाधान मानले आहे. मात्र, या क्षेत्रात काम करणार्‍या नगर जिल्ह्यातील संघटना संबंंधित कोळसाभट्टीचालकावरील कारवाईसाठी पाठपुरावा करणार असल्याचे सांगण्यात आले.

COMMENTS