भारतीय अवकाश संशोधन संस्था अर्थात इस्त्रोने अलीकडच्या काही वर्षांमध्ये जी काही कामगिरी केली आहे, ती थक्क करणारी असून, भारताची मान उंचावणारी आहे.
भारतीय अवकाश संशोधन संस्था अर्थात इस्त्रोने अलीकडच्या काही वर्षांमध्ये जी काही कामगिरी केली आहे, ती थक्क करणारी असून, भारताची मान उंचावणारी आहे. चांद्रयान मोहीमेनंतर गगनयान मोहीम यशस्वी करत, भारताने एक पाऊल पुढे टाकले आहे. त्यामुळे आता अवकाशात मानवाला पाठवणे शक्य होणार आहे. मात्र भारताचा अवकाश संशोधनाचा हा प्रवास सोपा नव्हता. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशामध्ये अन्नधान्यांची टंचाई, त्यासोबतच उद्योगधंद्याची उभारणी, त्यामुळे अवकाश संशोधनाकडे दुर्लक्ष झाले. मात्र आजमितीस आपल्याकडे अवकाश मोहीमेचे तंत्रज्ञान रशिया, अमेरिकेसारख्या देशाच्या तोडीस-तोड असल्याचे दिसून येते. रशिया, अमेरिका ही दोन विज्ञानप्रगत बलाढ्य राष्ट्रे. त्यांची आर्थिक कुवतही मोठी असून, ती विकसित राष्ट्रे असल्यामुळे या देशांनी अवकाश संशोधन शाखेचे महत्त्व त्यांनी केव्हाच ओळखले होते. या शाखेच्या संशोधनाचा प्रारंभ करण्याचा मान आहे रशियाचा. 4 ऑक्टोबर 1957 रोजी 83 किलो वजनाचा ‘स्पुटनिक – 1’ हा कृत्रिम उपग्रह अंतराळात पाठवून रशियाने मुहूर्तमेढ रोवली. अमेरिकेने त्यांचा पहिला 8 किलो वजनाचा कृत्रिम उपग्रह, ‘एक्प्लोअर – 1’ हा 31 जानेवारी 1958 रोजी अंतराळात धाडला. रशियापेक्षा चार महिने उशिराने. आपण 360 किलो वजनाचा ‘आर्यभट्ट’ हा पहिला उपग्रह 19 एप्रिल 1975 रोजी प्रक्षेपित केला. आपणाला हे यश रशिया, अमेरिका यांच्यानंतर 17 वर्षांनी मिळाले. या यशातील दुसरा फरक हा की, रशिया, अमेरिकेने त्यांचे उपग्रह, त्यांच्या स्वत:च्या प्रक्षेपकातून म्हणजेच, अग्निबाणातून पाठवले. भारताला मात्र ‘आर्यभट्ट’ पाठविण्यासाठी रशियाचे सहकार्य घ्यावे लागले. रशियाच्या अग्निबाणातून त्याला अवकाशात धाडावे लागले. त्यावेळी आपणाला अग्निबाणाचे तंत्रज्ञान अवगत नव्हते. मात्र भारताने आज याबाबतीत मोठी आघाडी घेतली आहे. त्यामुळेच गगनभरारीला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. प्रत्यक्ष मोहिमेदरम्यान अंतराळवीर या क्रू मोड्यूलमधूमच प्रवास करणार आहेत. एखादी आपात्कालीन स्थिती निर्माण झाल्यास हे मोड्यूल रॉकेटपासून विलग करून समुद्रात अलगद उतरवले जाणार आहे, त्याचीच यशस्वी चाचणी घेण्यात आली. भारताच्या गगनयान मोहीमेची चाचणी उड्डाण अगदी ऐनवेळी, म्हणजे जेमतेम पाच सेकंद बाकी असताना थांबवावे लागले होते. गगनयान मोहिमेअंतर्गत इस्रो ज्या यानातून भारतीय अंतराळवीरांना अवकाशात पाठवणार आहे, त्या यानाची ही एक सुरक्षा चाचणी होती. यामुळे भविष्यात प्रत्यक्ष अतंराळवीर अवकाशात पाठवतांना उड्डाणाच्या वेळी किंवा उड्डाणानंतर काही मिनिटात तांत्रित बिघाड झाला तर प्रक्षेपकावर-रॉकेटच्या अग्रभागावर असेलल्या अवकाशान यानातील अंतराळवीरांना पुन्हा सुखरुप जमिनीवर आणणे हे शक्य होणार आहे. याबाबची पहिली चाचणी त्या अवकाश यानाच्या माध्यमातून यशस्वी करण्यात आली. अवकाश यान हे रॉकेटच्या अग्रभागावर टोकावर असते. जर उड्डाणाच्या वेळी किंवा उड्डाण झाल्यावर रॉकेटमध्ये काही तांत्रिक बिघाड झाला तर रॉकेटचा लगेचच स्फोट होण्याची शक्यता असते. कारण रॉकेटमध्ये कित्येक हजार टन असे अत्यंत ज्वलनशील इंधन असते. अशा वेळी अकाशयानातील अंतराळवीरांची सुरक्षा महत्त्वाची ठरते. तेव्हा हे अवकाश यान लगेचच मुख्य रॉकेटपासून वेगळे होत दूर जात सुखरूप पृथ्वीवर परतणार असे नियोजन असते. सुरुवातीच्या तांत्रिक बिघाडानंतर आपातकालीन सुटकेचे चाचणी यशस्वी झाल्याने आता गगनयान मोहिमेचा पुढचा टप्पा आणखी लवकर पार पडेल अशी आशा आहे. या मोहिमेतून भविष्यात अनेक तंत्रज्ञान उपलब्ध होणार आहे. त्यामुळे इस्त्रो विकासाच्या दिशेने पावले टाकतांना दिसून येत आहे.
COMMENTS