मुंबई/प्रतिनिधी ः पुरोगामी महाराष्ट्र म्हणून असणार्या राज्यामध्ये महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये मोठी वाढ नोदंवण्यात आली आहे. गेल्या काही दिवसां
मुंबई/प्रतिनिधी ः पुरोगामी महाराष्ट्र म्हणून असणार्या राज्यामध्ये महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये मोठी वाढ नोदंवण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी सर्वाधिक महिला बेपत्ता होण्याचे प्रमाण महाराष्ट्रात असल्याचे सांगितले जात होेते, तशी आकडेवारी राज्य महिला आयोगाने सादर केली होती. त्यानंतर आता पोलिसांच्या आकडेवारीनुसार राज्यातील महिलांवरील बलात्कार, विनयभंग, अपहरण व कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनांत मोठी वाढ झाल्याची बाब पोलिसांच्या एका आकडेवारीतून निष्पन्न झाली आहे. यात विनयभंग व अश्लील वर्तनाचे सर्वाधिक गुन्हे मुंबईत नोंदवण्यात आलेत. त्यानंतर पुणे व नागपूरचा क्रमांक आहे.
यासंबंधीच्या वृत्तानुसार, मुंबईत अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत महिलांच्या विनयभंगाच्या गुन्ह्यांत चौपट वाढ झाली आहे. यंदाच्या पहिल्या 8 महिन्यांत मुंबईत महिलांच्या विनयभंग व अश्लील वर्तनाच्या 1254 घटना नोंदवण्यात आल्या. राज्यातील अन्य शहरांच्या तुलनेत हे प्रमाण 4 पटीने जास्त आहे. याच कालावधीत बलात्काराच्या 549 गुन्ह्यांची नोंद मुंबई पोलिसांकडून करण्यात आली. 300 तरुणी (अल्पवयींनासह) फूस लावून किंवा वेगवेगळी प्रलोभने दाखवून पळवून नेल्याच्या घटना घडल्या आहेत. तसेच कौटुंबीक हिंसाचार, हुंडाबळीसारख्या गुन्ह्याच्या घटनांमध्येही दुप्पट वाढ झाली आहे. मुंबईनंतर पुण्यात महिलांवर सर्वाधिक लैंगिक अत्याचाराच्या घटना उघडकीस आल्या आहेत. मागील 8 महिन्यांत पुण्यात विनयभंग व अश्लील वर्तनाच्या 364 घटना घडल्या आहेत. याच काळात पुण्यात 124 बलात्काराचे गुन्हे दाखल झालेत. नागपुरातही गत 8 महिन्यांत 304 महिलांच्या विनयभंगाच्या घटना घडल्या; तर 165 महिलांवर बलात्काराच्या घटना नोंदवल्या गेल्या आहेत. विनयभंग किंवा महिलांशी अश्लील वर्तनाच्या गुन्ह्यातील पीडितांमध्ये शाळकरी व महाविद्यालयीन विद्यार्थिनींचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. या घटनांतील आरोपींमध्ये टवाळखोर तरुणांचा समावेश आहे. याशिवाय नातेवाईक व कुटुंबातील सदस्यांवरही विनयभंगाचे गुन्हे दाखल झाले आहेत. समाजात बदनामी होण्याच्या भीतीने बर्याच वेळा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यापासून तरुणी परावृत्त होतात. याशिवाय पोलिसही काही प्रकरणांत गुन्हे दाखल करण्यास टाळाटाळ करत असल्याचे निष्पन्न झाले असल्याची माहिती समोर आली आहे.
COMMENTS