Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

’माझे पुणे, स्वच्छ पुणे’ अभियानाचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

पुणे - पुणे प्लॅटफॉर्म फॉर कोलॅबरेटिव्ह रिस्पॉन्स यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ’माझे पुणे, स्वच्छ पुणे’ अभियानाचे उद्घाटन राज्याचे उच्च व तं

Ahmednagar : खाजगी हॉस्पिटलला जवळपास सहा कोटी रुपयांचा दणका | LOKNews24
लोकमंथन दैनिकाचा दणका प्रशाशनला जाग खासदार डॉ. भारती ताई पवार यांनी तातडीने घेतली दखल
अंधारे मॅडम भिंती रंगविल्या शोभा वाढली; आता 44 खड्ड्यात झाडे लावून शोभा द्विगुणीत करा

पुणे – पुणे प्लॅटफॉर्म फॉर कोलॅबरेटिव्ह रिस्पॉन्स यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ’माझे पुणे, स्वच्छ पुणे’ अभियानाचे उद्घाटन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले.
केसरीवाडा येथे आयोजित या कार्यक्रमाला महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार, स्वच्छ भारत अभियानाचे ब्रँड म्बेसेडर सलील कुलकर्णी, पीपीसीआरचे डॉ.सुधीर मेहता, उपायुक्त आशा राऊत, महेश सूर्यवंशी, अण्णा थोरात, कुणाल टिळक, आशिष भंडारी, राजीव खेर, श्रीकांत शेट्ये उपस्थित होते.
यावेळी पालकमंत्री म्हणाले, नीटपणे नियोजन केल्यास स्वच्छतेसोबतच कचर्‍यातून संपत्तीची निर्मिती करता येते. विशेषतः प्लास्टिकच्या कचर्‍यापासून उपयुक्त वस्तू तयार करता येतात. कोरडा कचरा उपयोगात आणून कांडी कोळसा तयार करता येतो. त्यामुळे कचरा व्यवस्थापनात नीट नियोजन आवश्यक आहे. या क्षेत्रात योगदान देणार्‍या अनेक संस्था आणि व्यक्ती आहेत, त्यांच्यात महानगरपालिकेने समन्वय साधावा. सर्वांनी मिळून पुणे शहराला स्वच्छतेच्या बाबतीत देशात प्रथम आणण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन त्यांनी केले.
शहरात सांडपाणी व्यवस्थापनासाठी आवश्यक निधी देण्यात येत आहे. त्यामुळे 2025 पर्यंत नदीत प्रदूषित पाणी जाणार नाही. शहर स्वच्छतेबाबत नागरिकांचेही सहकार्य आवश्यक आहे. राज्य शासन या उपक्रमात सर्व सहकार्य करेल, अशी ग्वाही त्यांनी दिली. शहर स्वच्छतेचा संकल्प करून प्रत्येकाने शहरासाठी आपले योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.
आयुक्त विक्रमकुमार म्हणाले, शहरात दररोज आज 22 लाख किलो कचरा संकलन होत आहे. 2035 मध्ये हे प्रमाण दुपटीवर जाईल. शहरातील 550 जागांवर उघड्यावर कचरा टाकण्यात येतो. असे भाग कमी करून शहर स्वच्छ ठेवण्यासाठी स्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे. अतिरिक्त मनुष्यबळ, नागरिकांशी संवाद आणि प्रोत्साहन या त्रिसूत्रीवर भर दिला जाणार आहे. गेल्या चार वर्षात फुरसुंगी येथील कचर्‍याचा डोंगर 70 टक्के कमी करण्यात आला आहे. कचरा संकलनासाठी 250 नवीन वाहने घेण्यात आले आहेत. पुढील महिन्यात 5 अत्याधुनिक वाहने आणि 10 विद्युत ऊर्जेवर चालणारी वाहने घेण्यात येणार आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.
प्रास्ताविकात श्री.भंडारी म्हणाले, शहरातील कचरा संकलन यंत्रणा बळकट करून 90 टक्के कचरा संकलन आणि विलगीकरण व्हावे असे प्रयत्न पुढील वर्षभरात करण्यात येणार आहे. स्वच्छतेच्या संदर्भात पुण्याला देशात पुढे आणणे आणि नागरिकांच्या आरोग्यात सुधार करण्यासाठी स्वच्छता आवश्यक आहे. विश्रामबाग परिसरातून या उपक्रमाची सुरुवात होत असल्याचे त्यांनी सांगितले.
श्री.खेर यांनीही यावेळी विचार व्यक्त केले. वडारवाडीत कचरा संकलनासाठी करण्यात आलेला प्रायोगिक प्रकल्प यशस्वी झाल्याने कसबा-विश्रामबाग भागात मोठ्या प्रमाणात हे अभियान हाती घेण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांची पोहोच नागरिकांपर्यंत असल्याने उत्तम समन्वयाद्वारे पुण्याला स्वच्छ शहर बनविण्यात येईल असे श्री.सूर्यवंशी यांनी सांगितले.
’माझे पुणे, स्वच्छ पुणे’ अभियानाला जनवाणी, सोशल लॅब आणि दगडूशेठ गणपती ट्रस्टचे सहकार्य लाभले आहे.

COMMENTS