Homeताज्या बातम्या

श्रीक्षेत्र गोरक्षनाथ टेकडीवर गुरु पौर्णिमा भक्तिभावात; ‘किसन बाबांसारखे गुरु पुन्हा होणे नाही’ – शांतीब्रह्म नवनाथ बाबा महाराज

बीड: श्रीक्षेत्र गोरक्षनाथ टेकडी येथे गुरु पौर्णिमेचा उत्सव अत्यंत भक्तिमय वातावरणात आणि हजारो भाविकांच्या उपस्थितीत उत्साहात साजरा करण्यात आला.

KGF स्टार यशच्या वाढदिवसाची तयारी करत असताना मोठा अपघात
सुप्रसिद्ध अभिनेते सतीश कौशिक यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने दुःखद निधन
129 गावांतील साडेआठ हजारावर शेतकर्‍यांचे गारपिटीत नुकसान

बीड: श्रीक्षेत्र गोरक्षनाथ टेकडी येथे गुरु पौर्णिमेचा उत्सव अत्यंत भक्तिमय वातावरणात आणि हजारो भाविकांच्या उपस्थितीत उत्साहात साजरा करण्यात आला. पहाटेपासूनच परिसरातील भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. या प्रसंगी बोलताना गुरुवर्य शांतीब्रह्म नवनाथ बाबा महाराज यांनी, “सद्गुरू किसन बाबा यांच्यासारखे गुरु पुन्हा होणे नाही. त्यांनी मला घडवले आणि आयुष्याला योग्य दिशा दिली,” अशा भावपूर्ण शब्दांत आपल्या गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त केली.

गुरु पौर्णिमेनिमित्त आयोजित कीर्तनसेवेत ह.भ.प. पांडुरंग महाराज उगले यांनी गुरु-शिष्य परंपरेचे महत्त्व विशद केले. ते म्हणाले की, गोरक्षनाथ टेकडी ही गुरु-शिष्य परंपरेची अतिशय पवित्र गादी असून गुरु मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ, गहिनीनाथ, साधूबाबा, सद्गुरू किसन बाबा आणि शांतीब्रह्म नवनाथ बाबा ही अखंड परंपरा आजही येथे जोपासली जात आहे. आज गोरक्षनाथ टेकडीवर दिसणारे अफाट वैभव हे सद्गुरू किसन बाबा आणि शिष्य शांतीब्रह्म नवनाथ बाबा यांच्या त्याग, तपश्चर्या आणि निस्सीम सेवेमुळेच उभे राहिले आहे, असे प्रतिपादन त्यांनी अभंग विवेचनातून केले.

पहाटे ५ वाजता गुरुवर्य शांतीब्रह्म नवनाथ बाबा महाराज यांच्या पालखीची भव्य मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर गोरक्षनाथ महाराज, साधूबाबा महाराज, सद्गुरू किसन बाबा महाराज तसेच गुरुमाऊली दत्तात्रेय यांच्या महाआरत्या पार पडल्या. दिवसभर भाविकांनी टाळ, मृदुंग आणि वीणेच्या गजरात गर्भगिरी पर्वताची प्रदक्षिणा करून भक्तिमय वातावरणाचा आनंद घेतला.

हजारो भाविकांनी घेतला ‘गुरुमंत्र’:

गुरु-शिष्य परंपरा जपणार्‍या श्रीक्षेत्र गोरक्षनाथ टेकडीवर दरवर्षीप्रमाणे यंदाही नवीन शिष्यांना गुरुमंत्र देण्याचा सोहळा पार पडला. सकाळी ७ ते ८, ९ ते १० आणि दुपारी ३ ते ५ या वेळेत गुरुवर्य शांतीब्रह्म नवनाथ बाबा महाराज यांच्या हस्ते हजारो भाविकांनी शिस्तबद्ध पद्धतीने गुरुमंत्र स्वीकारला.

बकरवडी ग्रामस्थांतर्फे भव्य महाप्रसाद:

गुरु पौर्णिमेचे औचित्य साधून बकरवडी ग्रामस्थांच्या वतीने भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. महाप्रसादासाठी तब्बल ८ क्विंटल ५० किलो बुंदी आणि १५ पोते चिवडा तयार करण्यात आला होता. हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेत उत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

COMMENTS