Homeताज्या बातम्यासंपादकीय

गेम चेंजर महिला नेत्या !

भारताच्या राजकारणात एकेकाळी मायावती, ममता, जयललिता या स्वबळावर राजकारणात सत्तास्थानी पोहचलेल्या महिला नेत्यांचा दबदबा होता. त्यात त्यावेळी उमा भा

अन्यथा, माणसांची यंत्रे बनतील ! 
तटस्थ निवडणूक आयुक्त निवड समितीचा पेच !
राज्यसभेचा राजकीय खेळ !

भारताच्या राजकारणात एकेकाळी मायावती, ममता, जयललिता या स्वबळावर राजकारणात सत्तास्थानी पोहचलेल्या महिला नेत्यांचा दबदबा होता. त्यात त्यावेळी उमा भारती, सुषमा स्वराज या भाजपच्या आणि आधी तेलगू देसमच्या आणि नंतर काॅंग्रेस नेत्या बनलेल्या रेणुका चौधरी यांचा भारतीय राजकारणात अतिशय आक्रमक पावित्रा सतत चर्चेचा विषय असे. या महिला नेत्यांमधील जयललिता आणि सुषमा स्वराज आज हयात नाहीत; तर, उमा भारती आणि रेणुका चौधरी या राजकीयदृष्ट्या काहीश्या विजनवासात आहेत. अर्थात, गेल्या लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रेणूका चौधरी यांना हसण्यावरून अप्रत्यक्षपणे शुर्पणखा संबोधले होते, त्यावरून मोठा वाद निर्माण झाला होता. असो. वर उल्लेख केलेल्या महिला राजकीय नेत्यांपैकी मायावती आणि ममता बॅनर्जी या दोन महिला नेत्या राजकारणात सक्रियच नाहीत, तर, प्रभावी आणि गेम चेंजर मानल्या जातात. त्यातील ममता बॅनर्जी या इंडिया आघाडीच्या घटक होत्या परंतु, राहुल गांधी यांची भारत न्याय यात्रा पश्चिम बंगाल मध्ये प्रवेश करण्यापूर्वीच त्यांनी इंडिया आघाडीशी काडीमोड घेतली. तरीही, असं म्हटलं जात होतं की, निवडणुकीत तृणमूल काँग्रेस आणि काँग्रेस आघाडी राहील. ममता बॅनर्जी यांनी या सर्व अंदांजाना केराची टोपली दाखवत पश्चिम बंगाल मध्ये ४२ जागांवर लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर केली. ममता बॅनर्जी या सहसा कुणाचं ऐकत नाही. त्यांच्या राजकीय निष्ठूरतेची कल्पना जवळपास सर्वच पक्षांना आहे. तरीही, राजकारणाचा एक धर्म असतो, असे मानले जाते. परंतु, ममता बॅनर्जी असा धर्म पाळण्यात नेहमी चूक करतात. याविषयी सोनिया गांधी यांनी एक वेळा म्हटले होते की, ममता बॅनर्जी या राजकीय गोपनीयता पाळण्यात कमी पडतात म्हणून त्यांच्याशी यापुढे कधीही राजकीय युती होणार नाही. राजकारणात मात्र कोणीही कायम शत्रू किंवा मित्र नसतात. त्याची प्रचिती पुन्हा आली. ममता बॅनर्जी यांच्यासह इंडिया आघाडी अस्तित्वात आली. मात्र, आज पश्चिम बंगाल मध्ये सर्व जागांची यादी जाहीर करून तृणमूल काँग्रेसने इंडिया आघाडी नसल्याचे प्रत्यक्ष व्यवहारातून सुचित केले. असो.
    दुसऱ्या बाजूला उत्तर प्रदेश च्या चारवेळा मुख्यमंत्री पद भूषविलेल्या मायावती यांचे राजकारण आगामी सत्तेचे नियंत्रक बनले असल्याचे मानले जात आहे. परंतु, एकेकाळी त्यांचे मर्जीतील अधिकारी असलेल्या उत्तर प्रदेशातील एका अधिकाऱ्यावर धाड पडल्याने त्या सध्या शांत आहेत. मायावती शांत असल्या तरी आज ना उद्या त्या इंडिया आघाडी चा घटक होतीलच, असे मानले जात आहे. त्यामुळे, उत्तर प्रदेशात सपा, काॅंग्रेस आणि भाजपा यांनी अजूनही पूर्ण यादी जाहीर केली नाही. याचे कारण मायावती यांची भूमिका भारतीय राजकारणात आगामी लोकसभा निवडणुकीत गेम चेंजर असल्याचे मानले जात आहे. असं ‌म्हटलं जातं की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या राष्ट्रपती पदावर लागोपाठ एससी आणि एसटी समुहातील व्यक्तिमत्त्वांना बसवल्यामुळे आगामी काळात दलित पंतप्रधान केला जाऊ शकतो अशी चर्चा यानिमित्ताने होत आहे. मायावती यांच्या बहुजन समाज पक्षाला कधी नव्हे एवढी कमी मते सन २०२२ च्या विधानसभा निवडणुकीत मिळाली. एरव्ही २३ ते ३० टक्के च्या दरम्यान असणारी त्यांची व्होट बँक २०२२ च्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत १३ टक्क्यांपर्यंत खाली आली. त्यांच्या मतात झालेली घट ही शिक्षित दलित समाजाने त्यांना योग्य राजकीय भूमिका घेण्यासाठी दिलेली सबक आहे. त्या देखील ही बाब जाणतात.‌त्यामुळे मायावती या साधारणतः २० मार्चच्या आधी इंडिया आघाडी च्या घटक असतील, असा ठोस अंदाज लावला जात आहे.
   ममता बॅनर्जी आणि मायावती या दोन्ही राजकीय महिला नेत्या भारतीय राजकारणात आपला दबदबा ठेवून आहेत, ही बाब महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने अतिशय प्रभावी आहे.

COMMENTS