कोपरगाव : तालुक्यातील दळणवळण व्यवस्था सक्षम करण्याबरोबरच शेतीसाठी पाण्याचे नियोजन बळकट करण्याच्या दृष्टीने विविध विकासकामांचे प्रस्ताव शासनाकडे स

कोपरगाव : तालुक्यातील दळणवळण व्यवस्था सक्षम करण्याबरोबरच शेतीसाठी पाण्याचे नियोजन बळकट करण्याच्या दृष्टीने विविध विकासकामांचे प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर, झगडे फाटा ते रांजणगाव देशमुख रस्त्याच्या प्रस्तावाला तातडीने गती देण्यासाठी आवश्यक तो प्रशासकीय पाठपुरावा करावा, अशी आग्रही मागणी आमदार आशुतोष काळे यांनी जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्याकडे केली आहे.
जिल्हाधिकारी डॉ. आशिया यांनी शुक्रवारी (दि. १२ जून २०२६) अंजनापूर येथे भेट दिली असता, आमदार काळे यांनी त्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन कोपरगाव तालुक्यातील विविध प्रलंबित विकासकामांवर सविस्तर चर्चा केली. झगडे फाटा ते रांजणगाव देशमुख (राज्यमार्ग क्र. ६५) या रस्त्याचा प्रस्ताव विविध योजनांतर्गत शासनाकडे सादर करण्यात आला असून, तो सध्या मंजुरीच्या अंतिम टप्प्यात असल्याची माहिती त्यांनी दिली. वाढती वाहतूक लक्षात घेता या संपूर्ण मार्गाचे सिमेंट काँक्रिटमध्ये रूपांतर करणे अत्यंत आवश्यक आहे. तसेच या रस्त्याचा राष्ट्रीय महामार्गात समावेश व्हावा, यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडेही मागणी करण्यात आल्याचे आमदार काळे यांनी सांगितले.
याशिवाय अंजनापूर बंधारा क्रमांक तीन ते मंगलमूर्ती मंगल कार्यालय, तसेच निळवंडे तळेगाव शाखा कालव्याच्या शेवटच्या टोकापासून खोकड विहीर पूरचारीपर्यंतच्या कामांचे प्रस्तावही शासनाकडे सादर करण्यात आले आहेत. या प्रस्तावांना मंजुरी मिळाल्यास परिसराच्या कृषी व आर्थिक विकासाला मोठी चालना मिळेल, असे त्यांनी नमूद केले. यावर जिल्हाधिकार्यांनी प्रशासकीय स्तरावर आवश्यक पाठपुरावा करण्याचे सकारात्मक आश्वासन दिले. याप्रसंगी अप्पर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर, प्रांताधिकारी माणिकराव आहेर, तहसीलदार महेश सावंत, मुख्याधिकारी सुहास जगताप यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

COMMENTS