पुणे ः राज्यात सध्या नाताळ व थर्टी फस्टच्या पार्टीची धूम आहे. यानिमित्त शहर परिसरात होणार्या पार्ट्या, सेलिब्रेशनवर उत्पादन शुल्क विभागाची करडी

पुणे ः राज्यात सध्या नाताळ व थर्टी फस्टच्या पार्टीची धूम आहे. यानिमित्त शहर परिसरात होणार्या पार्ट्या, सेलिब्रेशनवर उत्पादन शुल्क विभागाची करडी नजर राहणार असून पार्टयामध्ये पुरविण्यात येणार्या मद्यावर करडी नजर ठेवली जाणार आहे. पुणे उत्पादन शुल्क विभागाकडून यासाठी 14 नियमित पथकांव्यतिरीक्त 10 विशेष पथके तयार करण्यात आली आहेत. पथकांकडून शहर परिसरातील बडे हॉटेल्स, पब, रिसॉर्ट, फार्म हाऊसची तपासणी केली जाणार आहे.
पुण्यात दरवर्षी सरत्या वर्षाला निरोप देत नवीन वर्षाच्या स्वागतासाठी मोठ्या प्रमाणात सेलिब्रेशन केले जाते. थर्टी फर्स्टच्या निमित्ताने शहरासह आसपासच्या हॉटेल, पब, रिसॉर्टमध्ये पार्टंयांचे आयोजन केले जाते. याठिकाणी चालणार्या पार्ट्यांमध्ये सर्वाधिक मद्याचा वापर केला जातो. मात्र, अनेक ठिकाणी राज्यात बंदी असलेल्या परराज्यातील दारूचा अवैध पुरवठा होतो. छुप्या पद्धतीने परराज्यातील दारू पुरविली गेल्यास राज्याचा महसूल बुडतो. यामुळे उत्पादन शुल्क विभागाकडून दारू वाहतूक आणि पार्ट्यांच्या ठिकाणी होणार्या नियमभंगावर विशेष लक्ष राहणार आहे. उत्पादन शुल्क विभागाकडून सातत्याने या कारवाया केल्या जातात. मात्र, थर्टी फस्टच्या पार्श्वभूमीवर कारवाईसाठी अधिक पथके तयार केली आहेत. सध्या उत्पादन शुल्क विभागाकडे 14 पथके कार्यरत असून यात आणखी 10 विशेष पथकांची भर पडणार आहे. अशापद्धतीने 24 पथकांच्या माध्यमातून शहर परिसरात करडी नजर राहणार आहे.
COMMENTS