रस्सीखेच रंगली…अखेरच्या क्षणी भोसलेंचे नाव झाले अंतिम ; अन्य दोन इच्छुकांना व्हावे लागले सूचक-अनुमोदक

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

रस्सीखेच रंगली…अखेरच्या क्षणी भोसलेंचे नाव झाले अंतिम ; अन्य दोन इच्छुकांना व्हावे लागले सूचक-अनुमोदक

महाविकास आघाडीतील राष्ट्रवादीकडे उपमहापौरपदासाठी ज्येष्ठ नगरसेवक गणेश भोसले, नगरसेवक विनित पाऊलबुद्धे व नगरसेविका मीना चोपडा शर्यतीत होते.

उंदिरगाव-माळेवाडी ते श्रीक्षेत्र सराला बेट रस्त्याचे कामासंदर्भात माजी आ.भानुदास मुरकुटे यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी रास्तारोको
सहकारमहर्षी नागवडे कारखान्याचा बॉयलर अग्नी प्रदीपन उत्साहात
आमदार काळेंनी केलेली विकासमकामे जनतेपर्यंत पोहचली पाहिजे – संदीप वर्पे

अहमदनगर/प्रतिनिधी-महाविकास आघाडीतील राष्ट्रवादीकडे उपमहापौरपदासाठी ज्येष्ठ नगरसेवक गणेश भोसले, नगरसेवक विनित पाऊलबुद्धे व नगरसेविका मीना चोपडा शर्यतीत होते. त्यांच्यात चुरस असल्याने उपमहापौरपदाचा साधा कोरा उमेदवारी अर्जही राष्ट्रवादीने घेतला नव्हता. अखेरच्या क्षणी आ. संग्राम जगताप यांनी भोसले, पाऊलबुद्धे व चोपडा यांच्यात समेट घडवला व भोसलेंचे नाव अंतिम झाल्यावर अर्ज वितरणास अवघे तीन मिनिट राहिले असताना कोरा अर्ज घेतला गेला तसेच नंतर अर्ज भरण्यास सात मिनिटे राहिले असताना भोसलेंचा अर्ज दाखल झाला. 

विशेष म्हणजे अन्य इच्छुक पाऊलबुद्धे व चोपडा हेच त्यांचे सूचक व अनुमोदकही झाले. आता त्यांच्याविरोधात आता कोणताही अर्ज नसल्याने त्यांची बिनविरोध निवड निश्‍चित झाली आहे. नगरपालिका व महापालिका मिळून तब्बल 25 वर्षांच्या राजकारणात भोसलेंना यंदा मानाचे मोठे पद मिळून न्याय मिळाला आहे. नगरच्या महापौरपदी शिवसेनेच्या रोहिणी शेंडगे व उपमहापौरपदी राष्ट्रवादीचे गणेश भोसले या दोन्ही निवडी बिनविरोध झाल्या असून, बुधवारी (30 जून) होणार्‍या निवडणुकीत त्यांची अधिकृत घोषणा होणार आहे. अर्थात ती आता औपचारिकता राहिली आहे. भोसले यांनी 3 उमेदवारी अर्ज दाखल केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्ष निरीक्षक अंकुश काकडे, आमदार संग्राम जगताप,  शिवसेनेचे नगरसेवक अनिल शिंदे, माजी शहरप्रमुख संभाजी कदम, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष माणिक विधाते, विनीत पाऊलबुद्धे, संजय शेंडगे, संजय चोपडा, सुभाष लोंढे, दत्ता कावरे, दत्ता जाधव, नगरसेवक गणेश कवडे, कुमार वाकळे, अजिंक्य बोरकर, श्याम नळकांडे,  जहागीरदार, सागर बोरुडे, सुनील त्र्यंबके, दीपक सूळ यांच्यासह काँग्रेसचे बाळासाहेब पवार, धनंजय जाधव, निखिल वारे, फारूक शेख, उबेद शेख, प्रशांत गायकवाड, बसपचे सचिन जाधव, मुदस्सर शेख, प्रकाश भागानगरे, चेतन गुंदेचा, समद खान, जॉन लोखंडे आदी उपस्थित होते.

इच्छुक झाले सूचक : अनुमोदक

उपमहापौरपदासाठी राष्ट्रवादीकडून गणेश भोसले यांच्यासह त्यांच्याच वॉर्डातील सहकारी नगरसेविका मीना चोपडा व सावेडीतील पक्षाचे नगरसेवक विनीत पाऊलबुद्धे हेही इच्छुक होते. सकाळी 11 पासून हे तिन्ही इच्छुक महापालिकेत आले होते. पण दुपारी साडेबाराच्या सुमारास आ. संग्राम जगताप महापालिकेत आले. त्यांनी भोसले व चोपडा यांना समवेत घेऊन नगर सचिव कार्यालयाच्या अँटी चेंबरमध्ये चर्चा केली. यावेळी पाऊलबुद्धे तेथे नव्हते. त्यांच्याशी नंतर चर्चा केल्याचे समजते. त्यानंतर चोपडा व पाऊलबुद्धे यांनी उमेदवारीचा दावा सोडून भोसले यांना सूचक व अनुमोदक होणे पसंत केले. राष्ट्रवादीमध्ये उपमहापौरपदासाठी चांगली रस्सीखेच होती. तिन्ही इच्छुकांमध्ये समेट घडत नव्हता, त्यामुळे कोरा अर्जही तोपर्यंत घेतला गेला नव्हता. अखेर समेट झाला. त्यामुळे उमेदवारी अर्ज घेण्याच्या दुपारी 1 वाजेची वेळ पूर्ण होण्यास अवघे तीन मिनिटे राहिले असताना विरोधी पक्ष नेते संपत बारस्कर यांनी तीन कोरे अर्ज घेतले व त्यानंतर ते भरण्याची प्रक्रिया सुरू केली गेली. त्यानंतर उमेदवारी अर्ज भरण्यास दीडची अखेरची वेळ असल्याने त्याआधी 7 ़िमनिटे म्हणजे एक वाजून तेवीस मिनिटांनी भोसले यांनी नगरसचिव एसबी तडवी यांच्याकडे अर्ज सुपूर्द केला. अन्य दोन अर्जही नंतर दिले गेले. या दोन अर्जांवर कुमार वाकळे व समद खान तसेच अविनाश घुले व संपत बारस्कर यांनी सूचक-अनुमोदक म्हणून सह्या केल्या आहेत.

भरघोस निधी मनपाला देणार : काकडे

यावेळी बोलताना राष्ट्रवादीचे पक्ष निरीक्षक काकडे म्हणाले, राज्यात महाविकास आघाडी स्थापन झाल्यानंतर स्थनिक स्वराज्य संस्थांमध्ये एकत्रित निवडणूक लढवण्याचा निर्णय आघाडीच्या नेत्यांनी घेतलेला होता. त्यानुसार आम्ही नगर मनपा स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये या निवडणुका पाडत आहोत. नगर महापालिकेच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेने महापौरपदासाठी शेंडगे यांचा उमेदवारी अर्ज काल दाखल केलेला होता, आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने उपमहापौरपदासाठी गणेश भोसले यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला असल्याचेही त्यांनी सांगितले. स्थानिक पातळीवर सर्वांनी आम्हाला साथ दिली. त्यामुळे आता ही निवडणूक बिनविरोध झाली आहे, असेही ते म्हणाले. राज्यामध्ये आगामी काळातसुद्धा महाविकास आघाडी अशा पद्धतीने निवडणूक लढणार असल्याचे त्यांनी सांगितले. महाविकास आघाडीची सत्ता महापालिकेत स्थापन झाल्यामुळे आता राज्य सरकारच्या माध्यमातून विकास कामांसाठी भरीव असे योगदान मिळेल, त्यासाठी स्थानिक पातळीवर आमदार व लोकप्रतिनिधी निश्‍चितपणे मदत करतील, असेही ते म्हणाले. नगरमध्ये भारतीय जनता पक्षानेसुद्धा एक प्रकारे उमेदवारी न करण्याचा निर्णय घेतला व विरोधासाठी विरोध केला नाही ही कौतुकास्पद बाब आहे, असेही काकडे म्हणाले.

हरित नगर करणार : भोसले

यावेळी बोलताना नवे उपमहौपार गणेश भोसले म्हणाले, महाविकास आघाडीच्या माध्यमातून मला उमेदवारी देण्यात आलेली आहे. मला शिवसेनेसह सर्व पक्षांच्या नगरसेवकांनी साथ दिली व ही निवडणूक प्रक्रिया बिनविरोध पार पडलेली आहे. गेल्या अनेक वर्षापासून महापालिकेमध्ये नगरसेवक म्हणून काम करत असून आता उपमहापौरपदाच्या माध्यमातून नगर शहरातील विकासाचे जे प्रलंबित प्रश्‍न आहेत, ते सोडवले जाणार असल्याचेही ते म्हणाले. नगर शहर हरित नगर करण्याचा प्रयत्न असेल तसेच शहरातील वृक्ष गणना करण्यास प्राधान्य देणार आहे. याशिवाय पाणी, स्वच्छता व पथदिवे हे प्रश्‍न सोडवले जाणार आहेत, असे सांगून ते म्हणाले, शहरात अमृत गटार योजनेच्या खोदकामामुळे रस्त्यावर खड्डे झाले असल्याने हे काम 2 महिने म्हणजे पावसाळा संपेपर्यंत बंद ठेवण्याची भूमिका श्रेष्टी व पक्ष बैठकीत मांडणार आहे, असेही ते म्हणाले.

मनपाची बदनामी थांबवली : वारे

महापालिकेत महापौर निवडीत होणारा घोडेबाजार व नगरसेवकांची होणारी खरेदी तसेच यामुळे होणारी मनपाची व नगरसेवकांची बदनामी यावेळच्या महापौर-उपमहापौर निवडी बिनविरोध करून आम्ही थांबवली आहे, असा दावा काँग्रेसचे माजी नगरसेवक निखील वारे यांनी केला. सोमवारी रात्री राष्ट्रवादीचे आ. जगताप यांनी काँग्रेसच्या पाचही नगरसेवकांसमवेत चर्चा करून महाविकास आघाडी समवेत राहण्याचे आवाहन केल्याने त्याला आम्ही प्रतिसाद दिला आहे व मनपात आता शिवसेना-राष्ट्रवादी व काँग्रेस हे तिन्ही पक्ष एकत्र आले आहेत, असे सांगून ते म्हणाले, विकासाच्या मुद्यावर आम्ही एकत्र आलो आहोत. तसेच भाजपनेही चुकीचे राजकारण केले नाही. तसे ते करू शकले असते. पण त्यांनी तटस्थ राहण्याचे जाहीर केल्याने चांगला संदेश गेला. आतापर्यंत नगर शहराने राजकारण खूप पाहिले आहे, आता विकास कामे दिसली पाहिजे, असेही ते म्हणाले. पक्षाच्या उमेदवार शीला चव्हाण याही इच्छुक होत्या व आम्ही त्यांच्यासमवेतच होतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.

COMMENTS