नवी दिल्ली : भारतात ईव्हीएम मशीन हे ब्लॅक बॉक्ससारखे असून त्याच्या तपासणीची परवानगी नाही, असे सांगत काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी ईव्हीएम मशि

नवी दिल्ली : भारतात ईव्हीएम मशीन हे ब्लॅक बॉक्ससारखे असून त्याच्या तपासणीची परवानगी नाही, असे सांगत काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी ईव्हीएम मशिनवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. मुंबईतील शिवसेनेचे नेते रवींद्र वायकर यांच्या मेव्हण्याने मतमोजणी केंद्रात मोबाईलचा वापर केल्यासंदर्भातील बातमीचे कात्रण राहुल गांधी यांनी आपल्या सोशल मीडीया पोस्टमध्ये जोडले आहे.
अमेरिकेच्या निवडणुकीत ईव्हीएमचा वापर केला जाऊ नये, असा सल्ला टेस्ला कंपनीचे सर्वेसर्वा एलन मस्क यांनी यांनी दिला आहे. इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन रद्दबातल करण्याची गरज आहे. हे मशीन एकतर मानवाद्वारे अथवा कृत्रिम बुध्दीमत्तेद्वारे हॅक केले जाण्याची शक्यता आहे. अर्थात हा धोका कमी असला तरी त्याची शक्यता जास्त असल्याचे मस्क यांनी सोशल मीडीया संदेशात म्हटले होते. हा संदेश रि-पोस्ट करत राहुल गांधी म्हणतात की, भारतात ईव्हीएम मशीन हे ब्लॅक बॉक्ससारखे आहे. त्याच्या तपासणीची परवानगी नाही. देशाच्या निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शतेच्या अनुषंगाने गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे. जेंव्हा संस्थांचे उत्तरदायित्व कमी होते, तेव्हा हा एक देखावा बनून राहतो आणि फसवणुकीची शक्यता जास्त राहते.
उत्तर पश्चिम मुंबई मतदार संघात शिवसेनेचे उमेदवार रवींद्र वायकर यांनी 48 मतांनी ठाकरे गटाचे उमेदवार अमोल कीर्तीकर यांचा पराभव केला होता. मतमोजणी दरम्यान गैरव्यवहार झाला असल्याचा आरोप कीर्तीकर यांनी केला होता. मतमोजणीच्या दिवशी वायकर यांचा मेव्हणा मंगेश पंडीलकर याने मतमोजणी केंद्रात मोबाईलचा वापर केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. यासंदर्भात एका वृत्तपत्रात आलेल्या बातमीचे कात्रण राहुल गांधी यांनी आपल्या पोस्टमध्ये जोडले आहे.
चौकट :
किर्तीकरांचा पराभव इव्हीएम नव्हे, तर पोस्टल मतांमुळे – लोकसभा निवडणुकीचा निकाल लागून दोन आठवडे उलटून गेले. त्यानंतरही वायव्य मुंबई लोकसभा मतदार संघातील ठाकरे गट विरुध्द शिंदे गट अर्थात अमोल किर्तीकर विरुध्द रवींद्र वायकर या लढ्याच्या निकालाचा मुद्दा शांत झालेला नाही. अमोल किर्तीकरांचा अवघ्या 48 मतांनी पराभव झाल्यानंतर मतमोजणीत गैरप्रकार झाल्याचा आरोप ठाकरे गटाकडून व मविआकडून केला जात आहे. मात्र, असा कोणताही गैरप्रकार झाला नसल्याची भूमिका महायुतीने घेतली आहे. त्यात आता संबंधित मतमोजणी केंद्रात एक मोबाईल नेण्यात आला होता आणि तो रवींद्र वायकर यांच्याशी संबंधित व्यक्तीकडे होता असा दावा केला जात आहे. यासंदर्भात आता नुकतेच काँग्रेसमधून पुन्हा शिवसेनेत गेलेले नेते संजय निरुपम यांनी नव्याने भूमिका मांडली आहे.
COMMENTS