नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर पोलिसांनी गोवंश मांसाच्या अवैध वाहतुकीवर मोठी कारवाई करत तब्बल 500 किलो संशयित गोवंश मांस आणि इको व्हॅनसह 3 लाख 75 हज

नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर पोलिसांनी गोवंश मांसाच्या अवैध वाहतुकीवर मोठी कारवाई करत तब्बल 500 किलो संशयित गोवंश मांस आणि इको व्हॅनसह 3 लाख 75 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी वाहनचालकाविरुद्ध महाराष्ट्र प्राणी संरक्षण (सुधारणा) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांच्या सतर्कतेमुळे तस्करीचा हा प्रकार उघडकीस आला.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अर्धापूर पोलीस ठाण्याचे पथक गस्तीवर असताना वसमत-नांदेड मार्गावरील कामठा फाटा परिसरात एका इको व्हॅनमधून गोवंश मांसाची अवैध वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी तात्काळ सापळा रचून एमएच-26-बीएक्स-0286 क्रमांकाच्या इको व्हॅनची तपासणी केली. तपासणीदरम्यान वाहनातील पाच पोत्यांमध्ये सुमारे 500 किलो संशयित गोवंश मांस आढळून आले. जप्त मांसाची अंदाजे किंमत 75 हजार रुपये, तर वाहनाची किंमत 3 लाख रुपये असून, एकूण 3 लाख 75 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी पोलीस हेड कॉन्स्टेबल किर्तीकुमार रणवीर यांच्या फिर्यादीवरून महाराष्ट्र प्राणी संरक्षण (सुधारणा) कायदा, 1995 मधील कलम 5(अ), 5(ड) तसेच इतर संबंधित कलमान्वये सय्यद साजिद सय्यद समीर (रा. मेन रोड, झेंडा चौक, काळीपेठ, वसमत, जि. हिंगोली) याच्याविरुद्ध अर्धापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक महादेव मांजरमकर यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार पप्पू चव्हाण करत आहेत. प्राथमिक तपासात वाहनावर संशय येऊ नये म्हणून त्याच्या समोरील काचेवर एका नामांकित वृत्तपत्राचे नाव आणि हरीओम, तर मागील काचेवर गण गण गणात बोते असा धार्मिक मजकूर लिहिल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. तसेच चालकाने भगव्या रंगाचे वस्त्र परिधान केल्याची माहितीही समोर आली आहे. पोलिसांच्या मते, वाहनाची धार्मिक प्रतिमा निर्माण करून तपास यंत्रणा आणि नागरिकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करण्यात आला असावा. पोलिसांनी या प्रकरणाचा पुढील तपास सुरू ठेवला असून, या अवैध वाहतुकीमागील इतर संबंधित व्यक्ती किंवा जाळ्याचा शोधही घेतला जात आहे.

COMMENTS