Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

साईड गटार रस्त्याच्या कडेला घेण्याची मागणी

डॉ. राजेंद्र पिपाडा यांचे शिर्डी-अहिल्यानगर रस्त्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन राहाता : शिर्डी-अहिल्यानगर या अत्यंत महत्त्वाच्या मुख्य रस्त्यावर सध

महाराष्ट्राचा आपला ‘दादा’ हरपला : घोगरे
काँग्रेस प्रवक्ते हनुमंत पवारांवरील हल्ल्याचा राहात्यात निषेध
एकरुखे गावात गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

डॉ. राजेंद्र पिपाडा यांचे शिर्डी-अहिल्यानगर रस्त्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

राहाता : शिर्डी-अहिल्यानगर या अत्यंत महत्त्वाच्या मुख्य रस्त्यावर सध्या सुरू असलेल्या साईड गटारींचे काम रस्त्याच्या कडेला न घेता थेट रस्त्यावरच करण्यात येत असल्याने रस्ता कृत्रिमरीत्या अरुंद होत आहे. यामुळे सध्याची वाहतूक व्यवस्था बिघडण्याबरोबरच भविष्यात अनधिकृत अतिक्रमणांचा धोका वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे सदर काम तात्काळ थांबवून साईड गटारी रस्त्याच्या कडेला घेण्यात याव्यात, अशी मागणी भाजप नेते डॉ. राजेंद्र पिपाडा यांनी जिल्हाधिकारी पंकज आशिया यांची समक्ष भेट घेऊन निवेदनाद्वारे केली. यावेळी शिर्डी लोकसभेचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे उपस्थित होते.

निवेदनात म्हटले आहे की, शिर्डी ते अहिल्यानगर या मुख्य रस्त्याचे काम सध्या प्रगतीपथावर आहे. राहाता शहरातून जाणारा हा रस्ता आधीपासूनच रुंद असूनही साईड गटारींच्या कामामुळे प्रत्यक्ष वापरातील रस्त्याची रुंदी कमी होत असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. हा मार्ग वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील असून दररोज मोठ्या प्रमाणावर जड व हलकी वाहतूक येथे होत असते. तसेच रस्त्यालगत शाळा, महाविद्यालये, रुग्णालये, आठवडे बाजार, व्यापारी संकुले व दाट वस्ती असल्याने रस्ता मोकळा व रुंद असणे अत्यावश्यक आहे.

मात्र, सध्या रस्त्याच्या प्रत्यक्ष भागावरच गटारींचे बांधकाम केल्याने भविष्यात वाहतूक कोंडी व अपघातांचा धोका निर्माण होऊ शकतो. रस्ता मोकळा असतानाही तो अरुंद केल्यास अनधिकृत अतिक्रमणे वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही, असा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे.

या पार्श्वभूमीवर शहरातून जाणाऱ्या रस्त्याचे संपूर्ण डांबरीकरण करून तो अधिक रुंद करण्यात यावा व साईड गटारींचे काम रस्त्याच्या बाहेरील बाजूस करावे, अशी मागणी करण्यात आली आहे. यामुळे राहाता शहरातील वाहतुकीची अडचण दूर होऊन नागरिकांना सुरक्षित व सुकर प्रवास करता येईल, असेही नमूद करण्यात आले.

जिल्हाधिकारी कार्यालयात दोन्ही खासदारांच्या उपस्थितीत झालेल्या आढावा बैठकीतही हा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. त्यावेळी खासदार भाऊसाहेब वाकचौरे व खासदार निलेश लंके यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देऊन शहरातून जाणारा रस्ता अरुंद न होता साईड गटारी रस्त्याच्या कडेला घेण्याचे निर्देश दिले होते.

या सर्व बाबींचा गांभीर्याने विचार करून प्रशासनाने तातडीने लक्ष घालून नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने योग्य ती कार्यवाही करावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

COMMENTS