अमोल कोल्हे यांची पुनर्विचार करण्याची मागणी मुंबई : इयत्ता आठवीच्या सामाजिक शास्त्राच्या पाठ्यपुस्तकातून 1759 सालातील मराठा साम्राज्याचा ‘कटक

अमोल कोल्हे यांची पुनर्विचार करण्याची मागणी
मुंबई : इयत्ता आठवीच्या सामाजिक शास्त्राच्या पाठ्यपुस्तकातून 1759 सालातील मराठा साम्राज्याचा ‘कटक ते अटक’ असा विस्तार दर्शवणारा नकाशा वगळण्यात आल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या या निर्णयावर विविध स्तरांतून प्रतिक्रिया उमटत असून, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी या निर्णयाचा पुनर्विचार करण्याची मागणी केली आहे.
नवीन शैक्षणिक वर्षासाठी तयार करण्यात आलेल्या इतिहासाच्या पुस्तकातून हा नकाशा हटवण्यात आला आहे. संबंधित नकाशात राजस्थानातील काही भाग मराठा साम्राज्याच्या प्रभावाखाली दाखवण्यात आल्यामुळे काही राजघराण्यांकडून आक्षेप घेण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर परिषदेकडून नकाशा वगळण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे समजते. मात्र, या निर्णयामुळे महाराष्ट्रासह इतिहास अभ्यासकांत नाराजीचे सूर उमटत आहेत. खासदार अमोल कोल्हे यांनी सामाजिक माध्यमांद्वारे या निर्णयावर तीव्र प्रतिक्रिया नोंदवली. अभ्यासक्रमातील बदल हे केवळ तक्रारींवर आधारित न राहता ऐतिहासिक पुराव्यांच्या कसोटीवर तपासले जावेत, असे त्यांनी नमूद केले. त्यांच्या मते, 1752 मधील ‘अहमदिया करार’, तत्कालीन प्रशासकीय नोंदी तसेच विविध गॅझेटिअरमधील उल्लेख यांवरून राजस्थानातील जयपूर, जोधपूरसारख्या संस्थानांवर मराठ्यांचा प्रभाव होता, तसेच तेथून ‘चौथ’ वसुली होत असल्याचे स्पष्ट होते. कोल्हे यांनी पुढे सांगितले की, शालेय अभ्यासक्रम हा भावी पिढीच्या ऐतिहासिक जाणिवा घडवणारा महत्त्वाचा घटक आहे. त्यामुळे कोणत्याही राजकीय दबावापेक्षा वस्तुनिष्ठ आणि पुराव्याधारित इतिहास मांडणे आवश्यक आहे. मराठा साम्राज्याचा विस्तार ‘अटक ते कटक’ असा होता, ही ऐतिहासिक बाब योग्य संदर्भांसह विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचली पाहिजे, असे त्यांनी अधोरेखित केले.

COMMENTS