दंगल पेटवण्याचे षडयंत्र ?

Homeताज्या बातम्यासंपादकीय

दंगल पेटवण्याचे षडयंत्र ?

महाराष्ट्रातील राजकारण पार रसातळाला गेले असून, त्याना अनुभव गेल्या काही महिन्यापासून सुरू आहे. अशातच कालपासून महाराष्ट्रातील वातावरण हिंसक बनले असून,

पाणीटंचाईचे संकट
राज्यपाल-सरकार संघर्ष
संसदेचे अधिवेशन पाण्यात

महाराष्ट्रातील राजकारण पार रसातळाला गेले असून, त्याना अनुभव गेल्या काही महिन्यापासून सुरू आहे. अशातच कालपासून महाराष्ट्रातील वातावरण हिंसक बनले असून, या दंगली भडकावण्यामागे नेमके कुणाचे षडयंत्र आहे. यामागे नेमका कुणाचा हात आहे. याचा शोध घेतला, तर यातील सत्य बाहेर येईल. मात्र ते सत्य विरोधकांना ही नको, आणि सत्ताधार्‍यांना नको असल्यामुळे हे सत्य बाहेर येणार नाही. मात्र यामुळे सर्वसामान्य जनता पुन्हा एकदा भरडली जाणार हे सत्य आहे.
त्रिपुरात झालेल्या घटनेच्या पार्श्‍वभूमीवर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात काही मुस्लिम संघटनांनी मोर्चे काढले होते. या मोर्चादरम्यान अनेक अफवा पसरवल्यामुळे वातावरण हिंसक बनले. अनेक ठिकाणी दगडफेकीच्या घटना घडल्या. त्यानंतर मालेगाव, अमरावती, नांदेड या तणावपूर्ण असलेल्या जिल्ह्यात परिस्थिती नियंत्रणांत आलेली होती. असे असतांना भाजपकडून अमरावती बंदचे आयोजन करण्यात आले होते. वास्तविक पाहता, ही संवेदनशील बाब असल्यामुळे आणि परिस्थिती नियंत्रणात असतांना, भाजपने बंद पुकारण्याचे काहीच कारण नव्हते. मात्र या बंददरम्यान पुन्हा एकदा हिंसक वातावरण तयार झाले. या बंददरम्यान काढलेल्या मोर्चामध्ये आंदोलकांनी दगडफेक केल्यामुळे पुन्हा एकदा अमरावती शहरामध्ये तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. त्रिपुरात झालेल्या हिंसाचाराच्या विरोधात अमरावतीमध्ये दोन दिवसांपासून राडा सुरू आहे. येथे, शुक्रवारी त्रिपुरा हिंसाचाराविरोधात अनेक मुस्लीम संघटनांनी निदर्शने केली. यावेळी मोठी गर्दी दिसून आली. आता या विरोधात हिंदू संघटनांनी शनिवारी बंदचे आवाहन केले होते. मात्र, यावेळी निदर्शकांनी जबरदस्त राडा केला. हे थांबवण्यासाठी पोलिसांनाही लाठीचार्ज करावा लागला. आता अमरावतीत कलम 144 लागू करण्यात आले आहे. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ नये म्हणून अमरावती शहरात संचारबंदी आदेश लागू करण्यात आला आहे. आता तीन दिवस इंटरनेट सेवा बंद करण्याचा निर्णय पोलिस प्रशासनाने घेतला आहे.
अमरावतीत राजकमल चौकात आंदोलकांनी धुमाकूळ घातला. कार पेटवली, प्रतिष्ठानाची जाळपोळ करण्यात आली. काही धार्मिक स्थळाचे नुकसानही यावेळी करण्यात आले. यानंतर पोलीस प्रशासनाने अमरावतीत कर्फ्यु लागू केला आहे. या तणावपूर्ण परिस्थितीचे वेध घेतला असता, गेल्या काही महिन्यातील अनेक नेत्यांची राजकीय विधाने तपासून बघावे लागतील. कारण गेल्या महिन्याभरात काही नेत्यांनी जाणीवपूर्वक हिंदू-मुस्लीम वादाला खतपाणी घालण्याचे काम केले. यातून ही तेढ वाढून उद्या महाराष्ट्रातील वातावरण तणावपूर्ण बनूू शकते, याची चाहूल लागली होती. आणि ती या घटनांनी पुन्हा एकदा खरी ठरतांना दिसून आली. महाराष्ट्रात दंगलीचा इतिहास तसा जुनाच आहे. आपली राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी सातत्याने या दंगली पेटत्या ठेवण्यात आल्या होत्या. दोन धर्मांत तेढ निर्माण करून, राजकीय डाव यशस्वी खेळले गेले.
मात्र अलीकडच्या काही वर्षांत महाराष्ट्राला या दंगलीचा विसर पडला होता. विकासाच्या वाटेवर महाराष्ट्र आपला वेगाने घौडदौड करत असतांना, पुन्हा एकदा या दंगलीचे हिंसक वातावरण उमटू लागले. दंगली भडकतात, त्यामध्ये राजकीय स्वार्थ साधला जातो, मात्र बळी जातो, सर्वसामान्यांचा. त्यामुळे अमरावती असो, की नांदेड, की मालेगाव, या जिल्ह्यात शांतता ठेवण्याची नितांत गरज आहे. अर्थात त्यासाठी राजकीय नेत्यांनी सामाजिक भान राखणे गरजेचे आहे. एकमेकांवर राजकीय चिखलफेक करण्याऐवजी महाराष्ट्रात शांतता ठेवण्यासाठी प्रथम प्राधान्य देण्याची गरज आहे. भारत हा देश संविधानानुसार मार्गक्रमण करत असून, त्यात भारत हा देश धर्मनिरपेक्ष असेल असे म्हटले आहे. याचाच अर्थ भारत सरकार सर्व धर्मांना समान न्याय देईल. शिवाय सरकार म्हणून कोणताही धर्म पुरस्कृत करणार नाही. त्यामुळे भारतासारख्या अखंडप्राय देशात विविधता असूनही एकात्मता नांदत आहे. मात्र या एकात्मतेला सुरुंग लावण्याचा प्रयत्न सातत्याने होत आहे. आणि भारतातील विविधता या प्रयत्नांना हाणून पाडतांना दिसून येत आहे. त्यामुळे अमरावतील हिंसक आंदोलनावर देखील ही एकात्मता मात करेल. मात्र या एकात्मतेला सुरुंग लावणार्‍यांना शोधावे लागणार आहे. ही हिंसक प्रवृत्ती देशासाठी आणि राज्यासाठी घातक आहे.

COMMENTS