मुंबई : राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षेतील प्रश्नपत्रिका गैरप्रकार आणि दिल्लीतील विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरील कारवाईच्या निषेधार्थ 26 जुलै र
मुंबई : राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षेतील प्रश्नपत्रिका गैरप्रकार आणि दिल्लीतील विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरील कारवाईच्या निषेधार्थ 26 जुलै रोजी मुंबईत होणार्या ठाकरे बंधूंच्या महामोर्चाला व्यापक राजकीय पाठबळ मिळण्याची चिन्हे आहेत. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या आवाहनानंतर काँग्रेस तसेच महाविकास आघाडीतील इतर घटक पक्षही या मोर्चात सहभागी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
गेल्या काही दिवसांपासून विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांवर देशभरात आंदोलन सुरू आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत मुंबईत महामोर्चाची घोषणा केली होती. विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर सर्व राजकीय पक्ष, पालक आणि नागरिकांनी एकत्र यावे, असे आवाहन त्यांनी केले होते. ठाकरे बंधूंच्या आवाहनाला प्रतिसाद देताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर सर्व पक्ष एकत्र येत असतील, तर काँग्रेसलाही त्यात सहभागी होण्यास हरकत नसल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे या मोर्चात महाविकास आघाडीतील सर्व प्रमुख पक्ष एकाच व्यासपीठावर दिसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मोर्चाच्या नियोजनासाठी महाविकास आघाडीची बैठक होणार असून, त्यामध्ये सहभाग, नियोजन आणि पुढील भूमिका यावर चर्चा होण्याची अपेक्षा आहे. मोर्चात मोठ्या संख्येने विद्यार्थी सहभागी होण्याची शक्यता लक्षात घेऊन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि युवासेनेकडून विशेष तयारी सुरू करण्यात आली आहे. दिल्लीतील आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील मोर्चा शांततेत पार पडावा, यासाठी नियोजन केले जात आहे. युवासेनेच्या पदाधिकार्यांच्या बैठकीत विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्याच्या सूचना करण्यात आल्याची माहिती पक्षाकडून देण्यात आली. मोर्चात सहभागी होणार्या विद्यार्थ्यांना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी आवश्यक समन्वय ठेवण्याचे निर्देशही देण्यात आल्याचे सांगितले जाते.

COMMENTS