अहमदनगर/प्रतिनिधी : जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागाला लागलेल्या आगीच्या चौकशीसाठी नियुक्त समितीचा अहवाल तयार झाला असून, त्यात हलगर्जीपणाचा ठपका
अहमदनगर/प्रतिनिधी : जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागाला लागलेल्या आगीच्या चौकशीसाठी नियुक्त समितीचा अहवाल तयार झाला असून, त्यात हलगर्जीपणाचा ठपका ठेवला गेला असल्याचे सांगण्यात येते. मात्र, हा हलगर्जीपणा नेमका कोणी केला व यात कोण दोषी आहेत, यांची नावे समितीद्वारे सरकारला सोमवारी दिल्या जाणार्या अहवालातून स्पष्ट होणार आहे. त्यामुळे या दोषींवर होणार्या कारवाईची उत्सुकताही वाढली आहे. जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागाला लागलेल्या आगीच्या घटनेप्रकरणी चौकशी समितीने 60 पेक्षा जास्त पानांचा अहवाल तयार केला असून, तो सोमवारी (29 नोव्हेंबर) राज्य सरकारला सादर केला जाणार आहे. त्यामध्ये हलगर्जीपणाचा ठपका ठेवण्यात आला असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे या घटनेप्रकरणी कुणा कुणावर जबाबदारी निश्चित होणार, याकडे लक्ष लागले आहे. जिल्हा रुग्णालयात आग लागून 14 रुग्णांचा मृत्यू झाला. सरकारने विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नियुक्त केली होती. या समितीने घटनास्थळी भेट देवून माहिती व विविध नोंदी घेतल्या. तसेच जिल्हा रुग्णालयाशी संबंधित विविध विभागांना दिलेल्या प्रश्नावलीद्वारे माहिती संकलित करण्यात आली होती. गुरुवारी आयुक्त गमे यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समितीची शेवटची बैठक झाली. आगीचा घटनाक्रम, आग कशामुळे लागली त्याचे कारण, आग लागल्यानंतर केलेला हलगर्जीपणा, अतिदक्षता विभागाच्या कामातील त्रुटी, पुन्हा अशा घटना घडू नये म्हणून करावयाच्या उपाययोजना, अशा विविध मुद्द्यांवर चर्चा करून अहवाल तयार करण्यात आला असल्याचे सांगण्यात आले.
त्या वीजपुरवठ्याची दखल?
जिल्हा रुग्णालयासंदर्भातील तक्रारीची दखल चौकशी समितीने घेतली असून अहवालामध्ये त्यावर भाष्य आहे तसेच जिल्हा रुग्णालयातील एक्सप्रेस फिडरमधून खासगी रुग्णालयाला दिलेल्या वीज कनेक्शनचीदेखील चौकशी समितीने अहवालात दखल घेतली असल्याचे सूत्रांनी सांगितले.
COMMENTS