Homeताज्या बातम्यासंपादकीय

चीनची कुरघोडी

भारतासारख्या देशाची वेगाने विकासाकडे वाटचाल सुरू आहे. आगामी काळात जगाचे नेतृत्व करण्याची धमक भारतामध्ये असल्याचे दिसून येत आहे. भारतीय अर्थव्यवस्

राष्ट्रवादीच्या तलवारी म्यान
भ्रष्टाचार आणि तपास यंत्रणा
…तर, पुन्हा युद्धाचा भडका

भारतासारख्या देशाची वेगाने विकासाकडे वाटचाल सुरू आहे. आगामी काळात जगाचे नेतृत्व करण्याची धमक भारतामध्ये असल्याचे दिसून येत आहे. भारतीय अर्थव्यवस्था, कुशल मनुष्यबळ, बाजारपेट, यासर्व बाबींचा विचार करता, आगामी काही दशकांमध्ये भारत अनेक देशांना मागे टाकून प्रथम स्थानावर विराजमान होवू शकतो. मात्र भारताच्या प्रगतीमध्ये अडथळे निर्माण करण्याचे काम भारताचे शेजारी असलेले देश म्हणजे चीन आणि पाकिस्तानकडून सातत्याने होत आहे. पाकिस्तान आणि चीनकडून नेहमीच भारताच्या विरोधात भूमिका घेतली जात आहे. दोन्ही देशांकडून भारताच्या विरोधात दहशतवादाला खतपाणी घातले जात आहे. भारतामध्ये दहशतवादी कारवाया करण्यासाठी चीन पाकिस्तानला शस्त्रास्त्र पुरवठा करतांना दिसून येत आहे. यासोबतच नुकताच चीनने आपल्या देशाचा नवा नकाशा जाहीर केला असून, त्यात त्याने अरूणाचल प्रदेशाला चीनचा भूभाग दाखवला आहे. चीनच्या या कृतीविरोधात देशभर संताप व्यक्त करण्यात येत आहे. नुकत्याच काही दिवसांपूर्वी दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग याठिकाणी ब्रिक्स देशांची 15 वी परिषद घेण्यात आली. या परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतच चीनचे राष्ट्राध्यक्ष देखील सहभागी झाले होते. दोन्ही देशांकडून आपल्या सीमेवरील तणाव कमी करण्यासंदर्भात चर्चा झाली. ही चर्चा झाल्यानंतर काही तासांतच चीनने पुन्हा एकदा कुरघोडी करण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे अरूणाचल प्रदेश हा भारताचा अविभाज्य भाग आहे. मात्र तेथील सीमारेषेवरील काही गावांवरून सध्या वाद सुरू आहे. या गावांचे नाव बदलत चीनने ती गावे आपलाच भूप्रदेश असल्याचे दाखवून दिले होते. नुकताच काँगे्रस नेते राहुल गांधी यांनी देखील चीनने लडाखमधील बराचसा भूप्रदेश बळकावल्याचा आरोप केला आहे, तर भारत सरकारने हा आरोप फेटाळून लावला आहे. त्यानंतर चीनने नवा नकाशा प्रसिद्ध करत लडाखसोबत अरुणाचल प्रदेश आणि अक्साई चीनवर पुन्हा हक्क सांगितला आहे. चीन सरकारच्या नैसर्गिक स्रोत मंत्रालयाने 28 ऑगस्ट रोजी हा नवा नकाशा जाहीर केला आहे. यात संपूर्ण अरुणाचल प्रदेश आणि चीनच्या सीमेतील अक्साई चीन प्रदेश, जो मूळ भारताचा भाग आहे, हा चीनचा भूभाग म्हणून दर्शवला आहे. चीनने पश्‍चिम सीमेवरील प्रादेशिक दावे, तसेच संपूर्ण दक्षिण चीन समुद्र व्यापणारी तथाकथित नऊ-डॅश लाईनदेखील नकाशावर दर्शविली आहे. तसेच तिथल्या बेटावरदेखील आपला हक्क सांगितला आहे. सर्वेक्षण आणि मॅपिंगचे प्रमाणीकरण करण्यासाठी तसेच विकासाला चालना देण्यासाठी हा नकाशा तयार करण्यात आल्याचे चीनचे म्हणणे आहे. लडाखचा बराच भूभाग चीनने आधीच बळकावला आहे. एप्रिल महिन्यात चीनने अरुणाचल प्रदेशातील 11 ठिकाणांची नावेही एकतर्फी बदलली होती. दोन्ही देशांचे लष्कर आमने सामने असून चर्चेच्या अनेक फेर्‍या होऊनदेखील सीमा प्रश्‍नी तोडगा निघालेला नाही. विरोधी पक्षांनीदेखील या मुद्द्यावरून भाजपवर हल्ला चढवला होता. मात्र, असे काही झाले नसल्याचा दावा सरकारने केला होता. त्यात दक्षिण आफ्रिकेत मोदी आणि शी जिनपिंग यांची भेट होऊन सीमा प्रश्‍नावर तोडगा काढण्याचे ठरले असताना, आता चीनने आगळीक करत नवा नकाशा प्रसिद्ध करत नव्या वादंगाला तोंड फोडले आहे. चीनची कोंडी करण्यासाठी भारतासमोर अनेक अस्त्र असतांना भारत चीनसोबत नेहमीच समन्वयाची भूमिका घेत आलेला आहे. मात्र चीनने समन्वयवादाची भूमिका न घेता कायमच महत्वाकांक्षी आणि राक्षसी वृत्ती ठेवत सर्वच सीमारेषेवर आपले नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न चालवला आहे. त्यामुळे चीनची आक्रस्ताळेपणाची भूमिका मोडीत काढण्यासाठी भारताने देखील आता आक्रमकपणे पावले उचलण्याची गरज आहे.

COMMENTS