गांधींच्या खुन्याचा जयजयकार?

Homeताज्या बातम्यासंपादकीय

गांधींच्या खुन्याचा जयजयकार?

खून करणारा गुन्हेगार आणि याचा उदोउदो करणारा समाज देखील गुन्हेगार असतो आणि म्हणून त्यांना देखील फासाच्या तख्तावर चढवण्यात यावं, असं थेट वक्तव्य भाजपचे

गेम चेंजर महिला नेत्या !
मराठा आरक्षण आणि घटनापीठ ! 
खबरदार! ५० टक्केला हात लावला तर !

खून करणारा गुन्हेगार आणि याचा उदोउदो करणारा समाज देखील गुन्हेगार असतो आणि म्हणून त्यांना देखील फासाच्या तख्तावर चढवण्यात यावं, असं थेट वक्तव्य भाजपचे खासदार तथा गांधी कुटूंबातील सदस्य वरूण गांधी यांनी केले आहे. अर्थात, त्यांनी हे वक्तव्य काही साध्यासुध्या घटनाप्रसंगासाठी केलेले नसून महात्मा गांधी यांचा खून करणाऱ्या गोडसे जिंदाबाद च्या घोषणा देणाऱ्यांनाही फाशी द्या, अशी मागणीच त्यांनी केली आहे. महात्मा गांधी हे या देशातील असे व्यक्तिमत्व ठरले आहे, ज्यांचा सरकारी पातळीवर स्विकार तर झाला परंतु, सामाजिक पातळीवर त्यांच्या विचारांशी मतभेद असणारे अनेक विचार या देशात वावरत राहिले आहेत. कुसुमाग्रज नाव धारण करणाऱ्या मराठीतील एका मोठ्या कवीने त्यांच्याविषयी भावना व्यक्त करताना स्पष्टपणे म्हटले की, तुमच्या पाठीशी भिंती राहतील. भारतीय समाजाचे वास्तव इतके विषमतामूलक राहिले आहे की, त्यात बदल करण्याऐवजी आहे त्याच परिस्थितीला कवटाळून पुढे जाण्याचा संदेश आपल्या विचार कृतीतून जो गांधीजींनी दिला त्यास समाज जीवनाच्या अनेक घटकांनी टीकेच्या अग्रस्थानी घेतले.  ब्राह्मणी प्रभाव असणाऱ्या समाजव्यवस्थेत भारतीय लोकांचे जनसंघटन करणे कोणत्याही ब्राह्मण नेत्याला शक्य झाले नाही. लाल-बाल-पाल अशा आक्रमक ब्राह्मणी नेत्यांनाही शक्य झाले नाही. त्यामुळे, एक नवा प्रयोग त्याकाळात ब्राह्मणी शक्तींनी गांधींच्या माध्यमातून केला. गांधींना नेतृत्वस्थानी आणल्याने काॅंग्रेसची स्वातंत्र्य चळवळ पार गावपातळीवर गेली. गांधींच्या राजकीय नेतृत्वाला तत्कालीन ब्राह्मणेतर समाजाने स्विकारल्यामुळे स्वातंत्र्य चळवळ फलद्रूप झाली. त्यामुळे, कोण्या स्वातंत्र्यवीरामुळे नव्हे तर गांधींना ब्राह्मणेतर समाजात मिळालेला स्विकार हे भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे मोठे यश होते, ज्यातून भारताला स्वातंत्र्य मिळाले. मात्र, ज्या गांधींना ब्राह्मणेतर समाजाने स्विकारले त्याच समाजाच्या मतांवर उभी राहीलेली स्वातंत्र्योत्तर राजकीय सत्तेतून मात्र ब्राह्मणेतरांना पंडित जवाहरलाल नेहरू यांना पुढे करून बाहेर ठेवले. ब्राह्मणेतरांच्या मतांवर उभ्या राहिलेल्या सत्तेत ब्राह्मणेतरांना वाटा मिळू नये यासाठी ब्राह्मणी व्यवस्था इतकी दक्ष होती की, पटेल सारख्या नेत्यालाही त्यांनी निर्णयसत्तेचा भाग बनू दिला नाही. इथून पुढे गांधींचा उपयोग ब्राह्मणी विचारधारेसाठी संपलेला होता. गांधींचा खून करणाऱ्या शक्ती अल्पमतात होत्या तोपर्यंत त्या लपून होत्या. मात्र, याच ब्राह्मणेतर समाजाने आपली मते त्यांच्या पारड्यात टाकताच ते कडव्या विचारांसह सत्तेत बहुमताने आले. सत्तेत येताच गांधी विचार अल्पमतात गेल्याचा भास त्यांना झाला. त्यातूनच त्यांनी गांधी यांच्या खून्याचा जयघोष सुरू केला, असे चित्र दिसायला लागले. हा सगळा प्रकार पाहून वरूण गांधी सारख्या वरच्या नेत्याने त्याविरोधात आवाज उठवणे म्हणजे ब्राह्मणेतर समाजाचा आवाज बुलंद असणे, असाच याचा अर्थ आहे. गांधींच्या खून्याचा उदोउदो करणाऱ्या शक्ती या ब्राह्मणी विचारांच्या आहेत. मात्र, अशा प्रकारचा आवाज देखील ब्राह्मणी शक्तींकडे मेंदू गहाण असलेल्या ब्राह्मणेतरांचा आहे. ब्राह्मणेतरांच्या आश्रयाने अथवा आधारानेच ब्राह्मणी शक्ती असा प्रकार करतात. परंतु, वरुन गांधी यांनी जो आवाज उठवला तो ब्राह्मणेतरांचा आहे. ही शक्तीच ब्राह्मणेतरांची आहे, येणाऱ्या काळात आणखी बुलंद होणार, हेच सत्य आहे! गांधींच्या खून्याचा जयजयकार करणाऱ्या शक्तींना फासावर लटकवणं ही मागणी असली तरी तसं आम्हाला मान्य नाही. माणसांच्या विचारात बदल घडविणे यावरच आमचा आजही ठाम विश्वास आहे!

COMMENTS