Homeताज्या बातम्यासंपादकीय

मंत्रिमंडळाचा विस्तार रखडला

लोकसभा निवडणुकीनंतर विधिमंडळाच्या अधिवेशनापूर्वी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होईल अशी अपेक्षा होती. मात्र त्यावेळी देखील विस्तार झाला नाही. अधिवे

काँगे्रस आणि प्रादेशिक पक्ष
मराठा-ओबीसींतील तणाव !
नीती आयोग आणि संघर्ष

लोकसभा निवडणुकीनंतर विधिमंडळाच्या अधिवेशनापूर्वी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होईल अशी अपेक्षा होती. मात्र त्यावेळी देखील विस्तार झाला नाही. अधिवेशन संपल्यानंतरही आजपर्यंत हा मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. विधानसभेच्या निवडणुका होण्यासाठी अवघ्या काही म्हणजे अडीच ते तीन महिन्यांचा कालवधी शिल्लक असतांना अजूनही मंत्रिमंडळाचा विस्तार होतांना दिसून येत नाही. मंत्री होण्यासाठी शिंदे गटातील आणि भाजपमधील अनेक आमदार गुडघ्याला बांशिंग बांधून तयार आहेत, मात्र वेळ काही येत नाही. खरंतर राज्यात सत्तांतर झाल्यानंतर पुढील पाच-सहा महिन्यात मंत्रिमंडळाचा विस्तार होईल अशी अपेक्षा वर्तवण्यात येत होती. त्यानंतर शिवसेना कुणाची याचा निकाल लागल्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार होईल अशी शक्यता देखील वर्तवण्यात येत होती, मात्र या सर्व शक्यता फोल ठरतांना दिसून येत आहे. यामागचे प्रमुख कारण म्हणजे पक्षातील नाराजी, आणि ती टाळण्यासाठीच मंत्रिमंडळ विस्तार पुढे ढकलण्यात येत असल्याचे दिसून येत आहे. जर पुढील काही दिवसांत मंत्रिमंडळ विस्तार झाल्यास नव्या मंत्र्यांना केवळ दोन महिन्यांचा कालावधी मिळू शकतो. कारण त्यानंतर आचारसंहिता लागेल. त्यामुळे अवघ्या दोन महिन्यांसाठी पक्षातील आमदारांची नाराजी ओढवून घेण्यात महायुतीतील पक्ष तयार नसल्याचे दिसून येत आहे.

राज्यात दोन-सव्वादोन वर्षांपूर्वी सत्ता हाती आल्यानंतर देखील भाजपच्या आमदारांना काहीही मिळालेले नाही. आर्थिक नाड्या अजित पवारांकडे आहेत, त्यामुळे भरमसाठ निधी नाही, मंत्रीमंडळात स्थान नाही, महामंडळाचे अध्यक्षपद नाही, त्यामुळे अशा सत्तेचा उपयोग काय, असा सवाल भाजपचे आमदार आणि पदाधिकारी करतांना दिसून येत आहे. त्यामुळे अशावेळी जर मंत्रिमंडळ विस्तार केल्यास हा असंतोष प्रगट होवू शकतो, तो असंतोष भाजप एकवेळ थांबवू शकतो, मात्र शिंदे यांच्या शिवसेनेत तो थांबवणे अवघड जावू शकते. त्यामुळे या असंतोषाचा भडका टाळण्यासाठीच मंत्रिमंडळाचा विस्तार रखडवण्यात आल्याचे बोलले जात आहे. मंगळवारी मध्यरात्री उपमुख्यमंत्री अजित पवारांनी राजधानी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेतल्याचे बोलले जात आहे. रात्री एक वाजता ही भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चा झडतांना दिसून येत आहे. वास्तविक पाहता अजित पवारांची भेट घेण्यामागचे अनेक कारण आहेत. मंत्रिमंडळाचा विस्ताराचे बोलले जात असले तरी, मंत्रिमंडळाचा विस्तार झाला काय, आणि नाही झाला काय, अजित पवारांच्या राष्ट्रवादीला त्याने काहीही फरक पडत नाही. अशावेळी विधानसभेच्या निवडणुकीत जास्तीत जास्त जागा कशा मिळतील, याचाच विचार अजित पवार करत असावेत असेच एकंदर दिसून येत आहे. कारण लोकसभा निवडणुकीत महायुतीचा परफॉर्मन्स चांगला नसल्याचे दिसून आले. त्यातुलनेत महाविकास आघाडी सरस ठरली.

त्यांची रणनीती, त्यांनी केलेला प्रचार, त्यांनी उभे केलेले उमेदवार सर्वच बाबी त्यांच्या पत्थावर पडल्याचे दिसून येत आहे. याउलट महायुतीचे सर्वच गणिते फसल्याचे दिसून आले. त्यामुळे जागावाटप न रखडवता लवकरात लवकर जागावाटप करण्याची मागणी अजित पवार गटाची आहे. त्यातच जर अजित पवार गट आणि शिंदे गटाला कमी जागा देवून त्यांची नारजाी ओढवून घेतली तर, यातील एखादा गट बाहेर पडू शकतो, याची जाणीव भाजपला असल्यामुळे शेवटच्या ठप्प्यात जागावाटप करण्याचे गणित भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या डोक्यात दिसून येत आहे. त्यामुळे या निवडणुकीत नाराजीनाट्य मोठ्या प्रमाणात पाहायला मिळू शकते. त्यामुळे मंत्रिमंडळाचा विस्तार रखडल्याचे दिसून येत आहे. मात्र पक्षातील कार्यकर्त्यांना, पदाधिकार्‍यांना बळ देण्याची गरज असल्याचे एव्हाना महायुतीच्या नेत्यांना चांगलेच ठाऊक आहे. त्यामुळे मंत्रिमंडळाचा विस्तार झालाच तर पुढील काही दिवसांत होईल, अन्यथा मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता तशी कमीच आहे. 

COMMENTS