‘अपघातमुक्त भारत’ मोहीम राबवा

Homeताज्या बातम्यासंपादकीय

‘अपघातमुक्त भारत’ मोहीम राबवा

मागच्या चार- पाच दिवसात महाराष्ट्रात अपघातामध्ये अनेकजणांचा बळी गेला. यात बीड जिल्ह्यातील टेकवणी परिवारातील चार जणांचा मृत्यू झाला. काल जळगाव जिल्ह्य

संगतीमधील विसंगती
नोटबंदीचा संशयकल्लोळ
कर्नाटक भाजपमधील बंडाळी

मागच्या चार- पाच दिवसात महाराष्ट्रात अपघातामध्ये अनेकजणांचा बळी गेला. यात बीड जिल्ह्यातील टेकवणी परिवारातील चार जणांचा मृत्यू झाला. काल जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगरच्या घोडसगावाजवळ बंद पडलेल्या टँकरमधून दुसर्‍या टँकरमध्ये दुध टाकत असताना भरधाव वेगाने आलेल्या ट्रकने टँकर्स आणि क्रेनला जोरदार धडक दिली. यामध्ये पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. या घटना हृदय हेलावून टाकणाऱ्या आहेत. अपघात का होतात आणि अपघात टाळता येऊ शकतात का यावर प्रकाश टाकणे क्रमप्राप्त.
अपघात या शब्दाबरोबर आपल्या डोळयासमोर वाहनांचे अपघात येतात. पण अपघात संज्ञेमध्ये अनेक नैसर्गिक घटनाही यात येतात. अपघात या शब्दाची काटेकोर व्याख्या करणे तसे अवघड आहे, पण पूर्वसूचनेशिवाय, ध्यानीमनी नसता घडलेली घातक घटना असा ‘अपघात’ या शब्दाचा सामान्य अर्थ लावला जातो. किंबहुना स्वत:ची कुठलीही चूक नसताना ज्या घटनांमुळे मनुष्याला इजा किंवा हानी पोहोचते, क्वचित मृत्यूही येतो, अशा आकस्मिक व अकल्पित घटनांना ‘अपघात’ असे म्हणता येईल. घर, शेत, वाहतूक व्यवसाय इत्यादींमध्ये संबंध येणाऱ्‍या वस्तूंत अथवा उपकरणांत बिघाड झाल्याने व्यक्तिगत अपघात होतात. भूकंप, पूर, वादळ यांसारख्या नैसर्गिक दुर्घटनांमुळे सामुदायिक अपघात होतात. सर्पदंश, सुरुंगामुळे उडालेल्या दगडाने इजा होणे, पाण्यात पाय घसरून पडणे ही  यदृच्छा घडणाऱ्‍या व्यक्तिगत अपघातांची उदाहरणे.
आपल्याकडे मोटार गाड्याचे मोठ्या प्रमाणावर अपघात होतात. याला विविध कारणे आहेत. दारू पिऊन वाहने चालवणे, अधिकवेळ ड्रायव्हिंग करणे, तुफान वेगाने गाड्या पळवणे, सीट बेल्ट न लावणे, हेल्मेट न वापरणे ही अपघाताची महत्त्वाची कारणे आहेत. या संबंधाने केलेले नियम वाहन चालवणार्‍यांनी पाळले आणि पोलिसांनी हे नियम न पाळणार्‍यांवर कडक कारवाई केली तर अपघाताचे प्रमाण कमी होऊ शकते. जगभरात होणार्‍या वाहन अपघातांमध्ये ९१ टक्के अपघात गरीब देशात घडल्याची नोंद आहे. गरीब देशातल्या वाहनांची संख्या कमी असून सुद्धा तिथे अपघात जास्त होतात. म्हणजे दर हजार वाहनांमागे होणार्‍या अपघाताचे सरासरी प्रमाण या देशात जास्त आहे.
अपघात होण्याच्या कारणांमागे वाहनांचा अति वेग आणि मद्यप्राशन करून गाड्या चालवणे ही दोन मुख्य मानले जात असले तरी खड्ड्याचे रस्ते, वळणाचे रस्ते यामुळे देखील अपघात होतात. शहरांमध्ये वाहनांचा वेग ताशी ५० कि.मी. पेक्षा कमी असावा, असा नियम आहे. पण तो पाळला जात नाही हे खरेच. तो कसोशीने पाळला तर जगातले ३० टक्के अपघात कमी होतील हे नक्की. याचा अर्थ अती वेगाचे वेड हे अपघाताचे मुख्य कारण आहे. वैशिष्ट्य म्हणजे मागासलेल्या देशांपेक्षा प्रगत देशांमध्ये दारू पिऊन गाड्या चालवण्याचे प्रमाण जास्त आहे. या संबंधात कायदा आहे, परंतु त्याचे पालन केले जात नाही. ते कडकपणे केले तर २० टक्के अपघात टळतील, असे तज्ज्ञांचे मत.
अपघातांमध्ये आपल्या महाराष्ट्रापेक्षाही उत्तर प्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक, राजस्थान, मध्य प्रदेश आघाडीवर आहेत. त्यातल्या त्यात महाराष्ट्रात थोडी तरी शिस्त आहे. परंतु उर्वरित राज्यात सुरक्षा नियमांची सर्रास पायमल्ली होताना दिसते. नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोची आकडेवारी पाहिली तर फारच भयानक स्थिती असल्याचे जाणवते. ‘अपघातमुक्त भारत’ अशी मोहीम राबविण्याची वेळ येऊन ठेपली आहे. ही ‘अपघातमुक्त भारत’ मोहीम राबवणे आवश्यक. सरकारने ती राबवावी ही अपेक्षा.  

COMMENTS