देवळाली प्रवरा : राहुरी तालुक्यातील मुसळवाडी (महाडूक सेंटर परिसर) येथे एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीने राहत्या घरात साडीच्या साहाय्याने गळफास घेऊन
देवळाली प्रवरा : राहुरी तालुक्यातील मुसळवाडी (महाडूक सेंटर परिसर) येथे एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीने राहत्या घरात साडीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सोमवारी (२७ जुलै) उघडकीस आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात तीव्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुलीने रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास हे टोकाचे पाऊल उचलले. सोमवारी सकाळी हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर कुटुंबीयांनी तत्काळ राहुरी पोलिसांना याची माहिती दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार जयदीप बडे व शेषराव कुटे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. रुग्णवाहिका चालक रवींद्र देवगिरे यांच्या मदतीने मुलीला उपचारासाठी राहुरी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र डॉक्टरांनी तपासणीअंती उपचारापूर्वीच तिला मृत घोषित केले.
दरम्यान, याप्रकरणी मृत मुलीच्या वडिलांनी राहुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मानोरी येथील एका तरुणाने व्हॉट्सॲपवर मुलीसोबत सातत्याने चॅटिंग करून तिला मानसिक तणावात आणले, आणि याच मानसिक त्रासाला कंटाळून तिने आत्महत्या केल्याचा गंभीर आरोप वडिलांनी केला आहे. पोलिसांनी या तक्रारीची गंभीर दखल घेतली असून, मुलीला आत्महत्येस प्रवृत्त केले गेले आहे का? यादृष्टीने सर्व बाजूंनी तपास सुरू केला आहे. पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली राहुरी पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

COMMENTS