मुंबई/प्रतिनिधी ः राज्यात आगामी निवडणुकांच्या दृष्टीने जोरदार मोर्चेबांधणी सुरू असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस य
मुंबई/प्रतिनिधी ः राज्यात आगामी निवडणुकांच्या दृष्टीने जोरदार मोर्चेबांधणी सुरू असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची रविवारी भेट घेतल्याची माहिती मुख्यमंत्री शिंदे यांनी सोमवारी दिली. आमची युती वैचारिक युती आहे. बाळासाहेबांच्या विचारातील ही गेल्या अनेक वर्षांची युती आहे. या राज्यात काम करत असताना, विकास प्रकल्प पुढे नेत असताना पंतप्रधान आमच्या पाठीशी उभे आहेत. अनेक प्रस्तावांना त्यांनी सढळ हस्ते मदत केली आहे, यासोबत शिवसेना आणि भाजप आगामी सर्व निवडणुका एकत्र लढणार असल्याचा विश्वास देखील मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केला.
महाराष्ट्राच्या विकासासाठी आमची युती ही भक्कम असून गेल्या 11 महिन्यांपासून आम्ही विकासाचे विविध निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी केली आहे. रखडलेले प्रकल्प मार्गी लावत आहोत. यापुढच्या काळात सर्वच क्षेत्रात महाराष्ट्राला देशात प्रथम क्रमांकाचे राज्य बनविण्यासाठी, विकासाची घोडदौड अशीच सुरू ठेवण्यासाठी आम्ही एकत्रित निवडणुका लढविणार आणि बहुमताने जिंकणार असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटले आहे. कृषी, सहकार विभागाशी संबंधित विविध बाबींवर आम्ही चर्चा केली. राज्यात शेतकरी, महिला सक्षमीकरण अशा विविध क्षेत्रात गतीने कामे सुरू असून अनेक रखडलेले प्रकल्प मार्गी लावले आहेत. राज्यातील विविध प्रकल्पांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेहमीच मार्गदर्शन लाभले आहे. सहकार विभागाशी संबंधित बाबींवर केंद्रीय सहकार मंत्री शहा यांचे आम्हाला नेहमीच मार्गदर्शन लाभत असल्याने आम्ही ही भेट घेतली. असे मुख्यमंत्री शिंदे यांनी पुढे म्हटले आहे. दीर्घ काळापासून रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार तसेच राज्याशी संबंधित विविध प्रश्नांच्या अनुषंगाने मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी रविवारी रात्री केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेत खलबते केली. रात्री साडेदहा वाजता सुरु झालेली ही बैठक पावणे बारा वाजता संपली. गतवर्षीच्या जूनमध्ये राज्यात सत्तापालट झाला होता व शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आले होते. मात्र सत्ता संघर्षाचा वाद सर्वोच्च न्यायालयात पोहोचल्याने मंत्रिमंडळ विस्ताराला मुहूर्त मिळत नव्हता. अलीकडेच न्यायालयाने सत्ता संघर्षावर निकाल दिलेला आहे. त्यामुळे पुढील काही काळात मंत्रिमंडळ विस्तार अटळ मानला जात आहे. अमित शहा यांच्यासोबतच्या बैठकीत या विषयावर चर्चा झाल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
केंद्रासह राज्याचाही लवकर मंत्रिमंडळ विस्तार – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटीत गेल्या काही दिवसांपासून रखडलेल्या मंत्रिमंडळ विस्तारावरही चर्चा झाल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. यावेळी त्यांनी या भेटीतील चर्चेबाबत सविस्तर माहिती दिली आहे. राज्यासह केंद्राचा देखील लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होणार केंद्रात शिंदे गटाला दोन मंत्रिपदे मिळण्याची शक्यता आहे. युतीतील अनेक आमदारांना अद्याप कोणतीच खाती न मिळाल्याने नेते नाराज असल्याच्याही चर्चा आहेत. तर, येत्या 19 जून रोजी शिवसेनेचा वर्धापन दिन आहे. याआधीच मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. त्यामुळे याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारले असता त्यांनी मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होणार असल्याचे सांगितले. ते म्हणाले की, कॅबिनेट विस्ताराबाबतही चर्चा झाली आहे. तो निर्णय लवकरच होईल, त्याला काहीही अडचण नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
COMMENTS