नाशिक : वाढलेल्या तापमानापासून बचावासाठी सामान्यत: घरोघरी कुलरचा वापर करण्यात येतो. कुलरचा वापर करताना अनेकवेळा प्रामुख्याने लोखंडी पत्र्याच्या
नाशिक : वाढलेल्या तापमानापासून बचावासाठी सामान्यत: घरोघरी कुलरचा वापर करण्यात येतो. कुलरचा वापर करताना अनेकवेळा प्रामुख्याने लोखंडी पत्र्याच्या कुलरमध्ये विद्युत प्रवाह उतरून अपघात होण्याची शक्यता असते. तेंव्हा कुलरचा गारवा अनुभवताना विद्युत सुरक्षेबाबत नागरिकांनी दक्षता बाळगावी, असे आवाहन महावितरणच्या वतीने करण्यात येत आहे. अज्ञान, निष्काळजीपणा, फाजिल आत्मविश्वास ही वीज अपघाताची मुळ कारणे आहेत. प्रत्येक नागरिकांने वैयक्तिक दक्षता बाळगून, प्रतिबंधक उपाययोजनांचा अवलंब करून सुरक्षित राहणे गरजेचे आहे.कुलरमुळे होणारे अपघात टाळण्यासाठी खालील बाबींचे कटाक्षाने पालन होणे आवश्यक आहे.
लहान मुलांना खेळण्यास मज्जाव- अनेकवेळा अपघाताच्या घटनांमध्ये कुलरच्या जवळपास खेळणाऱ्या लहान मुलांचा समावेश असतो. त्यामुळे कुलरच्या सान्निध्यात लहान मुले येणार नाहीत, अशा पध्दतीने कुलरची मांडणी करावी. कुलरच्या पंख्यासमोर जाळी लावलेली असल्यास लहान मुलांचा हात पंख्यात जाणार नाही.
पाणी भरताना घ्या काळजी – कुलरमध्ये पाणी भरण्यापूर्वी वीज पुरवठा बंद करावा. कुलरमधील वीजतारांचे (वायरचे) आवरण सुस्थितीत असल्याची खात्री करावी. कुलरमध्ये वीज तार पाण्यात बुडाली नसल्याची खात्री करुन घ्यावी. तसेच, ऒल्या हाताने कधीही कुलरला स्पर्श करु नये हे फार धोकादायक आहे. कुलरमधून पाण्याची गळती होणार नाही ,याची खबरदारी घ्यावी.
घरातील अर्थिंगची तपासणी – घरातील अर्थिंग सुस्थितीत असल्याची तपासणी परवानाधारक ठेकेदाराकडूनच नियमित कालावधीत करावी. जुन्या वायरिंगची तपासणी करणे, खराब झालेली तसेच आवरणाची रोधक क्षमता कमी झालेली वायरींग तात्काळ बदलण्यात यावी.
अर्थिंगसाठी थ्री पिन प्लगचा वापर – कुलरला नेहमी थ्री पिन प्लग व सॉकेटचा वापर करावा. त्यामुळे कुलरला अर्थिंग व्यवस्थित मिळेल, विद्युतप्रवाहाची गळती झालेली असल्यास धोका टळेल. आय.एस.आय. चिन्ह आणि योग्य दर्जाची विद्युत उपकरणे वापरणे आवश्यक आहे.
व्यवसायिक व्यक्तीकडून दुरूस्ती करावी – कुलरमध्ये कोणताही प्रकारचे बिघाड झाल्यास दुरूस्तीचे काम जबाबदार व्यावसायिक व्यक्तीकडून करून घ्यावे. कुलरचा पंप दुरुस्ती करण्यापुर्वी वीज पुरवठा बंद करावा. पंपास वीज पुरवठा करणारी वीज तार पाण्यात बुडाली नसल्याची खात्री करावी. पंपाची अर्थिंग योग्य असल्याचे तपासून घ्यावे. विजेचा धक्का बसल्यास कोरड्या लाकडाने त्या व्यक्तीस स्पर्श न करता बाजुला करावे, त्वरित कृत्रीम श्वासोंश्वास देत रुग्णालयात नेण्यात यावे. घरातील विद्युत उपकरणे तात्काळ बंद करावी. प्रत्येकाने आपल्या घरात अर्थ लीकेज सर्किट ब्रेकर्स बसवणे आवश्यक आहे. वीजेमुळे होणारे अपघात टाळण्यासाठी तांत्रिकदृष्ट्या हा उत्तम उपाय आहे. त्यामुळे वीजेचा धक्का लागल्यास वीज प्रवाह खंडीत होऊन पुढील अनर्थ टळतात. तरी सर्व वीज ग्राहकांनी दैनंदिन जीवनात विद्युत उपकरणांचा वापर करताना सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करून विद्युत अपघात टाळावे, असे आवाहन महावितरणकडून करण्यात येत आहे.
COMMENTS