कर्जत : दादा पाटील महाविद्यालयात पार पडलेला वार्षिक पारितोषिक समारंभ यंदा ‘जागर आध्यात्मिक लोकशाहीचा’ या आगळ्या-वेगळ्या थीममुळे विशेष ठरला. तब्

कर्जत : दादा पाटील महाविद्यालयात पार पडलेला वार्षिक पारितोषिक समारंभ यंदा ‘जागर आध्यात्मिक लोकशाहीचा’ या आगळ्या-वेगळ्या थीममुळे विशेष ठरला. तब्बल तीन तास चाललेल्या या कार्यक्रमात १०० हून अधिक विद्यार्थ्यांनी विविध कलामाध्यमांतून सादर केलेल्या प्रभावी कलाकृतींनी प्रेक्षकांना अक्षरशः मंत्रमुग्ध केले.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय नगरकर यांच्या संकल्पनेतून आणि मार्गदर्शनाखाली गेल्या काही वर्षांपासून थीम-आधारित सांस्कृतिक कार्यक्रमांची परंपरा सुरू झाली असून यंदाच्या कार्यक्रमात संतपरंपरेचा समृद्ध वारसा उजागर करण्यात आला. श्री चक्रधर स्वामींपासून सुरुवात करत संत ज्ञानेश्वर महाराज, संत नामदेव, संत जनाबाई, संत चोखामेळा, संत सावता माळी, संत मीराबाई, संत कबीर, संत तुकाराम, संत एकनाथ, संत गाडगे महाराज आदी संतांच्या जीवनातील प्रेरणादायी प्रसंगांचे नाट्य, अभंग, भारुड, नृत्य, वारी, रिंगण आणि फुगडी यांसारख्या विविध कलाप्रकारांतून सजीव सादरीकरण करण्यात आले.
आजच्या काळात कमी होत चाललेल्या सामाजिक एकतेच्या पार्श्वभूमीवर संतांनी रुजवलेली समता, बंधुता आणि आध्यात्मिक लोकशाही यांचा संदेश या कार्यक्रमातून प्रभावीपणे देण्यात आला. ‘बुरगुंडा होईल तुला’ आणि संत तुकाराम चरित्र या सादरीकरणांना प्रेक्षकांनी विशेष दाद दिली.
विशेष म्हणजे, विद्यार्थ्यांनी स्वतः लेखन, दिग्दर्शन आणि सादरीकरण करत हा कार्यक्रम अत्यंत प्रभावीपणे उभारला. प्रकाश शिंदे, अजित पवार, साक्षी वाघ, दिग्विजय रानमाळ, कृष्णा शेटे, यश खेतमाळस, लखन शिंदे यांनी कोरिओग्राफीत योगदान दिले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सांस्कृतिक विभागाचे चेअरमन डॉ. प्रमोद परदेशी, प्रा. सुखदेव कोल्हे, प्रा. स्वप्नील म्हस्के, प्रा. राम काळे यांच्यासह सर्व प्राध्यापकांनी परिश्रम घेतले. माजी विद्यार्थी संघाने प्रायोजकत्व स्वीकारले, तर सूत्रसंचालन प्रा. स्वप्नील म्हस्के व प्रा. राम काळे यांनी केले.

COMMENTS