भुईंज / वार्ताहर : महामार्गावरील रायगाव, ता. जावली येथे चालत्या कारमध्ये दारु पित असणार्यांकडे बघितल्याच्या कारणातून चिडून जावून संशयितांनी साता
भुईंज / वार्ताहर : महामार्गावरील रायगाव, ता. जावली येथे चालत्या कारमध्ये दारु पित असणार्यांकडे बघितल्याच्या कारणातून चिडून जावून संशयितांनी सातारा जिल्ह्यातील वरिष्ठ पत्रकार राहूल तपासे (रा. गुरुवार पेठ, सातारा) यांच्या कारला धडक देवून अपघात करुन त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी भुईंंज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर सातारा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष हरीष पाटणे व सातारा पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद कुलकर्णी यांनी तात्काळ संशयितांना अटक करण्याची मागणी करताच सातारा पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी, ही घटना दि. 30 मे रोजी रात्री 12.30 वाजता रायगाव गावच्या हद्दीत महामार्गावर घडली आहे. तक्रारदार राहूल हिंदुराव तपासे (वय 48, रा. गुरुवार पेठ, सातारा) हे त्यांच्या ब्रीझा कारमधून साताराकडे येत होते. त्यावेळी फॉर्च्युनर कारमध्ये तिघेजण मद्यप्राशन करत कार चालवत होते. ही बाब राहूल तपासे यांनी पाहिली.
‘आमच्याकडे का पाहिले,’ या कारणातून चिडून जावून संशयितांनी आपआपसात संगनमत करुन चिडून जावून तक्रारदार राहूल तपासे यांना जीवे मारण्याच्या हेतूने त्यांच्या ब्रीझा कारला भीषण धडक दिली. सुदैवाने या घटनेत राहूल तपासे बचावले. या घटनेनंतर संशयित कार चालक मात्र तेथून कारसह पसार झाले. जीवे मारण्याचा प्रयत्न झाल्यानंतर त्यांनी ही बाब सातारा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष हरीष पाटणे व सातारा पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद कुलकर्णी यांना सांगितली. यानंतर दोघांनी जिल्हा पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांना सांगून तात्काळ घटनेचा शोध घेवून संशयित आरोपींना अटक करण्याची मागणी केली. राहूल तपासे सातारा जिल्ह्यातील वरिष्ठ पत्रकार असून त्यांच्यावर झालेल्या या हल्ल्याने संतापाची लाट निर्माण झाली. एसपी यांनी भुईंज पोलिसांना तात्काळ तपासाच्या सूचना करताच गुरुवारी याप्रकरणी एका संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले.
पोलिस संशयिताकडे कसून चौकशी करत असून इतर दोघेजण कोण आहेत? त्यांचा नेमका उद्देश काय होता? संशयित आरोपीकडील कार कोणाच्या मालकीची आहे? याची पोलिस माहिती घेत आहेत.
COMMENTS