कल्याण, ठाण्याच्या मेट्रो प्रकल्पांना गती मिळणार

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कल्याण, ठाण्याच्या मेट्रो प्रकल्पांना गती मिळणार

कल्याण-तळोजा, गायमुख-शिवाजी चौक आणि ठाणे-भिवंडी या तीन महत्त्वपूर्ण मेट्रो प्रकल्पांच्या निर्मितीसाठी सल्लागार कंपन्यांच्या नियुक्तीचा निर्णय एमएमआरडीएच्या कार्यकारणी समितीच्या बैठकीत घेण्यात आला.

इस्लामपूर विधानसभा मतदार संघातील सर्व निवडणुका महाडिकांसोबत लढणार : वैभव नायकवडी
नुकसान झालेला एकही शेतकरी शासकीय मदतीपासून वंचित राहणार नाही :धनजंय मुंडे
जी च्या निर्णायक गोलने कोरिया रिपब्लिक उपांत्य फेरीत

ठाणे/प्रतिनिधीः कल्याण-तळोजा, गायमुख-शिवाजी चौक आणि ठाणे-भिवंडी या तीन महत्त्वपूर्ण मेट्रो प्रकल्पांच्या निर्मितीसाठी सल्लागार कंपन्यांच्या नियुक्तीचा निर्णय एमएमआरडीएच्या कार्यकारणी समितीच्या बैठकीत घेण्यात आला. कल्याण-नवी मुंबई या दोन शहरांना जोडणार्‍या कल्याण-तळोजा आणि ठाणे-मिरारोड या शहरांना जोडणार्‍या गायमुख-शिवाजी चौक मेट्रो मार्गांच्या स्थापत्य कामांच्या अंमलबजावणीसाठी 188 कोटींचा खर्च येणार आहे, तर ठाणे ते भिवंडी मार्गाच्या दूरसंचार प्रणालीसह महत्त्वपूर्ण कामांसाठी 91 कोटींच्या कामांसाठी सल्लागार कंपन्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या निर्णयामुळे ठाणे जिल्ह्यातील सार्वजनिक प्रवासाचा चेहरामोहरा बदलवणार्‍या तीन मेट्रो प्रकल्पांची कामे फास्ट ट्रॅकवर येणार आहेत.

कल्याण-तळोजा आणि गायमुख-शिवाजीचौक या दोन मेट्रो प्रकल्पांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सप्टेंबर 2019मध्ये भूमिपूजन झाले होते; परंतु त्यानंतर आलेल्या करोना साथीमुळे मेट्रो प्रकल्पांची कामे रखडून पडली होती. अखेर या प्रकल्पांच्या स्थापत्य कामांसाठी एमएमआरडीएकडून निविदा प्रक्रिया पूर्ण करून सल्लागारांची नियुक्ती करण्यात आली आहे. 10 मे च्या एमएमआरडीएच्या कार्यकारी समितीच्या बैठकीमध्ये या मार्गांसाठी 188 कोटींचा खर्च करून कंपनीची नियुक्ती करण्यात आली. एकॉम एशिया आणि एकॉम इंडिया यांच्या संयुक्त कंपनीच्या माध्यमातून ही कामे होणार आहेत. गुजरात मेट्रो, कोलकता मेट्रो, हैदराबाद मेट्रो, नागपूर मेट्रो, तसेच एमएमआरडीएच्या मुंबई ट्रान्स हार्बर लिंक अशा प्रकल्पांची कामे संबंधित कंपनीकडून केली जात आहेत. या कंपनीकडे मेट्रो 10 आणि मेट्रो 12 या दोन्ही प्रकल्पांची स्थापत्य कामे देण्यास मंजुरी देण्यात आली. दिल्ली मेट्रो रेल्वे महामंडळामार्फत तयार सविस्तर प्रकल्प अहवालाचे पुनरावलोकन करणे, स्थापत्य कामांच्या कंत्राटदार निवड, कामाच्या निविदा प्रक्रिया आणि व्यवस्थापन, आर्किटेक्चर वर्क्स, पीईबी, कार-शेड डेपो, स्टॅबलिंग यार्ड निविदा प्रक्रियेत व्यवस्थापन सहाय्य ही कामे संस्था करणार आहे. निधी पुरवणार्‍या संस्थांच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार गुणवत्ता, सुरक्षा आणि पर्यावरणीय सुनिश्‍चित कामांचे परीक्षण करण्याबरोबरच कामांचा आढावा घेऊन बिले देण्याच्या शिफारसी करण्याची जबाबदारी सल्लागाराची असेल. मेट्रो प्रणाली व्यवस्थापनासाठी आराखडा बनवणे, वाहतुकीच्या इतर मार्गांच्या योजनांचे एकत्रीकरण राबवण्यास मदत करणे तसेच परवानग्या मिळवण्यासाठी सहाय्य करण्यासारख्या कामांचा यात समावेश आहे. कल्याण-डोंबिवली आणि नवी मुंबई शहरांना जोडण्यासाठी मेट्रो मार्ग 12 अर्थात कल्याण-तळोजा या 20.756 किलोमीटर लांबीच्या प्रकल्पांचे नियोजन एमएमआरडीएकडून करण्यात आले आहे. 17 मेट्रो स्थानकांचा समावेश असलेल्या या प्रकल्पासाठी पाच हजार 865 कोटींचा खर्च निश्‍चित करण्यात आला आहे. कल्याण-डोंबिवलीतून नवी मुंबईत जाणार्‍या नागरिकांना हा प्रकल्प फायदेशीर ठरेल. ठाणे-मिरारोड शहरांना जोडण्यासाठी गायमुख-शिवाजी चौक या 9.209 किलोमीटर लांबीच्या 4 मेट्रो स्थानक असलेल्या मेट्रो मार्ग 10चे नियोजन करण्यात आले आहे. त्यासाठी चार हजार 476 कोटींचा खर्च येणार आहे. ठाणे ते भिंवडी दरम्यानच्या स्थापत्य कामांना सुरुवात झाली असताना आता या मार्गिकेच्या रोलिंग स्टॉक, संकेत व दूरसंचार, वीजपुरवठा व ट्रॅक्शन, ई अण्ड एम, स्टेशन्स व डेपो, एएफसी, पीएसडी, लिफ्ट आणि एस्केलेटर या कामांसाठी ठेकेदाराची नियुक्ती करण्यात आली आहे. यात कामांची दैनंदिन देखरेख, आराखडे तयार करणे, प्रणाली निविदांचे मूल्यमापन, मेट्रो मार्गाच्या डेपोच्या कामांची देखरेख, चाचणी आणि प्रणाली सुरू करण्याच्या कामांचा समावेश आहे.

COMMENTS