विधानसभा की हास्यजत्रा

Homeताज्या बातम्यासंपादकीय

विधानसभा की हास्यजत्रा

हिवाळी अधिवेशनाला सुरूवात झाल्यामुळे या वेळी तर सर्वसामान्यांच्या गहन प्रश्‍नांवर चर्चा होईल अशी अपेक्षा होती. मात्र विधानसभेचा नुसता आखाडा झाला असून

विकासाचा ‘समृद्धी’ महामार्ग
समाजवादी चळवळीचा आधारस्तंभ
आतातरी आरक्षणाचा प्रश्‍न सुटेल का ?

हिवाळी अधिवेशनाला सुरूवात झाल्यामुळे या वेळी तर सर्वसामान्यांच्या गहन प्रश्‍नांवर चर्चा होईल अशी अपेक्षा होती. मात्र विधानसभेचा नुसता आखाडा झाला असून, येथेही खालच्या दर्जाचे राजकारण होतांना पाहून विधीमंडळाचे सर्व नियम आपण पायदळी तुडवत आहोत, याची जाणीव या सभागृहांच्या सदस्यांना नसणे ही शोकांतिकाच म्हणावी लागेल.
लोकांच्या प्रश्‍नांचे प्रतिबिंब ज्या सभागृहात उमटते, ते राज्यांचे प्रतिनिधित्व करणारे विधानसभेचे गृह. हिवाळी अधिवेशन एक तर कमी दिवसाचे त्यात, ही एकमेकांच्या नकला करण्याचा मोह सदस्यांना आवरतांना दिसून येत नाही. बरे सभागृहात नकला करू नये, असा कुठे नियम नाही. मात्र त्या नकला देखील सुसंगत असाव्या लागत्यात, आणि नेमक्या वर्मावर बोट ठेवणार्‍या असाव्या लागतात. मात्र भास्कर जाधव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची केलेली नक्कल त्यांच्या अंगलट आली आणि त्यांनी माफी मागत यावर पडदा टाकला. नरेंद्र मोदी एक राजकारणी म्हणून तुम्ही त्यांच्यावर टीका टिप्पणी, त्यांची नक्कल करण्याचा नक्कीच हक्क आहे, मात्र ते पंतप्रधान पदावर विराजमान आहेत, याचे देखील भान असणे गरजेचे आहे. मान हा त्या व्यक्तीला नसतो, तर त्या पदाला असतो. त्यामुळे त्या पदाचे भान राखून टीका टिप्पणी होणे गरजेचे आहे. तर दुसरीकडे भाजपचे आमदार नितेश राणे यांनी तर सर्वच मर्यादा तोडल्या आहेत. सिंधुदुर्गच्या राजकारणात तर त्यांनी सर्व मर्यादा तोडतांना आपण एक लोकप्रतिनिधी आहेत, याचेच त्यांना भान राहिलेले नाही. जिथे असून, तिथे गुंडगिरीची भाषा करून, त्यांनी आपलीच प्रतिमा रसातळाला घेऊन जातांना दिसून येत आहे. शिवाय त्यांचे वडील केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी तरी आपल्या मुलांना सुसुस्कृंत राजकारणांचे धडे देण्याची गरज होती. मात्र सर्व मर्यादा सोडून त्यांनी विधिमंडळाच्या अधिवेशनादरम्यान पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे विधानभवन परिसरात येताच विधानभवनाच्या पायर्‍यांवर आंदोलनाला बसलेले आमदार नितेश राणे यांनी ‘म्याव म्याव’ असा आवाज काढून आदित्य ठाकरेंना डिवचण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना नितेश राणे म्हणाले होते की, कधीकाळी शिवसेना वाघाप्रमाणे डरकाळ्या फोडत होती. मात्र हल्ली सेनेची अवस्था मांजरासारखी झाली आहे. म्हणूनच आपण आदित्य ठाकरेंना बघून म्याव म्याव असा आवाज काढला होता. नितेश राणेंच्या म्याव म्याव प्रकरणावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. महाविकास आघाडीचे अनेक नेतेही नितेश राणेंच्या ‘म्याव म्याव’ प्रकरणाचा समाचार घेत आहेत. दरम्यान, अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी एक मीम ट्विट करून राणेंवर ‘पहचान कौन’ असे म्हणत अप्रत्यक्ष टीका केली होती. या मीममध्ये कोंबडीच्या तोंडावर मांजराचा चेहरा मॉर्फ करण्यात आला आहे. हा सर्व प्रकार राजकारणांची खालावलेली पाताळी अधोरेखित करतांना दिसून येतो.
सभागृहात जरी आपण विविध पक्षांचे सदस्य असलो तरी, सभागृहातील सर्व सदस्य आपले सहकारी आहेत. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या सहकार्‍याचा आदर राखणे कर्तव्य आहे. मात्र सभागृहात एक अत्युच्च दर्जाचे भाषण, विदवत्ता पहायला मिळायची. तशीच ती खिलाडूवृत्ती देखील या सभागृहाने अनुभवली आहे. मात्र अलीकडच्या काळात अभ्यासपूर्ण भाषणांची मालिका खंडित होतांना दिसून येत आहे. केवळ सभागृह चालवायचे म्हणून चालवायचे अशी गत सभागृहाची सुरू आहे. विधानसभा अध्यक्षांनी देखील याला कुठेतरी पायबंद घालायला हवा. कठोर निर्णय घेऊन अशा सदस्यांना निलंबित करावे. महाराष्ट्राची विधानसभा ही 11 कोटी लोकांचे प्रतिनिधित्व करते. मात्र सभागृहात केवळ हास्यविनोद आणि नकला करून, मनोरंजन करण्यात येत असेल, तर आत्महत्या केलेल्या शेतकर्‍यांना तुम्ही काय न्याय देणार. सरळ सेवा भरतीचा बट्टयाबोळ झाला असतांना, त्यातून मार्ग काढत विद्यार्थ्यांना दिलासा देण्यासाठी म्याव, म्यावचे आवाज काढून आपल्याच सहकार्‍यांना डिवचण्याचा हा अल्पजीवी प्रयत्न संपूर्ण महाराष्ट्र बघतोय, याकडे तरी लक्ष द्या.

COMMENTS