Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बीड सायबर पोलिसांची मोठी कामगिरी

ऑनलाईन गुंतवणूक फसवणुकीतील 9.88 लाखांपैकी 4.68 लाख रुपये तक्रारदारास परतबीड । प्रतिनिधीऑनलाईन गुंतवणुकीच्या नावाखाली फसवणूक करणार्‍या टोळीविरुद्ध

बीडचे पालकमंत्री धनुभाऊंच्या मुजोर ठेकेदाराने पैठण-पंढरपुर राष्ट्रीय महामार्गाची वाट लावली
तहसील बीड व एनडीआरएफ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘आपदा मित्र-सखी’ प्रशिक्षण कार्यक्रम
महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेच्या बीड मंडळ व विभागीय कार्यकारिणीची घोषणा

ऑनलाईन गुंतवणूक फसवणुकीतील 9.88 लाखांपैकी 4.68 लाख रुपये तक्रारदारास परत
बीड । प्रतिनिधी
ऑनलाईन गुंतवणुकीच्या नावाखाली फसवणूक करणार्‍या टोळीविरुद्ध बीड सायबर पोलिसांनी प्रभावी कारवाई करत फसवणुकीतील मोठा हिस्सा तक्रारदारास परत मिळवून दिल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
सायबर पोलीस ठाणे बीड येथे ऑनलाईन फसवणूक प्रकरणी गुन्हा र. नं. 27/2025 कलम 318(4), 3(5) बी.एन.एस. सह कलम 66, 66(क) माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात तक्रारदार विलास ज्ञानोबा नाईकवाडे (रा. भगवानबाबा प्रतिष्ठानजवळ, पिताजी आनंद अपार्टमेंट, बीड) यांची आर्थिक फसवणूक झाल्याचे निष्पन्न झाले. तक्रारदार यांना ग्लोबल कॅपिटल एफ एक्स या कंपनीत गुंतवणूक केल्यास दररोज 0.50 ते 1 टक्का व्याज मिळेल तसेच तीन महिन्यांत गुंतवणूक दामदुप्पट करून देण्यात येईल, असे आकर्षक आमिष दाखवण्यात आले होते. या आमिषाला बळी पडून तक्रारदाराने दिनांक 24 फेब्रुवारी 2025 पासून 3 एप्रिल 2025 या कालावधीत वेळोवेळी ऑनलाईन ट्रान्सफरद्वारे 5,38,500 रुपये पाठविले. याशिवाय तक्रारदाराकडून 4,50,000 रुपये रोख रक्कम आरोपी ज्ञानेश्वर दिगांबर चाटे यास देण्यात आल्याचे तपासात समोर आले. अशा प्रकारे एकूण 9,88,500 रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याने तक्रारदाराने सायबर पोलीस ठाणे बीड येथे तक्रार दाखल केली होती. तक्रारीच्या अनुषंगाने सायबर पोलिसांनी तातडीने तपास सुरू करत तांत्रिक विश्लेषण, बँक खात्यांची माहिती व आर्थिक व्यवहारांचा सखोल अभ्यास केला. या तपासातून फसवणूक करणार्‍या आरोपींचा माग काढण्यात यश आले. तपासादरम्यान आरोपीचे बँक खाते गोठवून त्यामधील 2,68,000 रुपये गोठविण्यात आले. तसेच आरोपीकडून 2,00,000 रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली. सायबर पोलिसांच्या या कार्यक्षम तपासामुळे फसवणुकीतील एकूण 4,68,000 रुपये इतकी रक्कम वसूल करण्यात आली. सदर रक्कम आज मा. पोलीस अधीक्षक बीड नवनीत कावत यांच्या हस्ते तक्रारदार विलास ज्ञानोबा नाईकवाडे यांना सुपूर्द करण्यात आली. ही संपूर्ण कारवाई मा. पोलीस अधीक्षक बीड, अपर पोलीस अधीक्षक बीड व उपविभागीय पोलीस अधिकारी बीड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. सायबर पोलीस ठाणे बीडचे पोलीस निरीक्षक निलेश केळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप अराक, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक भारत जायभाये, पोलीस हवालदार विजय घोडके, पोलीस अंमलदार निलेश उगलमुगले व श्रीकृष्ण टेकाळे यांच्या पथकाने ही यशस्वी कामगिरी पार पाडली. दरम्यान, सायबर पोलिसांकडून नागरिकांना ऑनलाईन गुंतवणूक, जादा परताव्याचे आमिष, दामदुप्पट स्कीम्स यापासून सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले असून, कोणतीही शंका किंवा फसवणूक झाल्यास तात्काळ सायबर पोलीस ठाणे किंवा 1930 हेल्पलाईन वर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

COMMENTS