Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

टंचाईचे ढग दाटले; लातूर जिल्ह्यातील प्रकल्पातील पाणी आता पिण्यासाठी आरक्षित !

लातूर प्रतिनिधी - वरुणराजाने महिनाभरापासून दडी मारल्यामुळे चिंता वाढली आहे. जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होण्याची भीती वाढली आहे.

रोहित पाटील यांना राष्ट्रवादीत मोठी जबाबदारी
तंत्रज्ञानाद्वारे शेतकर्‍यांनी आर्थिक प्रगती करावी
महाराष्ट्र विधानसभा थेट प्रक्षेपण ( अर्थसंकल्पीय अधिवेशन, मार्च २०२२, | LOKNews24

लातूर प्रतिनिधी – वरुणराजाने महिनाभरापासून दडी मारल्यामुळे चिंता वाढली आहे. जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होण्याची भीती वाढली आहे. आतापर्यंत सरासरी 340.6 मिमी पाऊस झाल्याने नदी- नाले कोरडेठाक आहेत. मध्यम प्रकल्पातही केवळ 20.85 टक्के उपयुक्त जलसाठा आहे. परिणामी, जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील सर्व मध्यम, लघु प्रकल्पातील पाणी केवळ पिण्यासाठी आरक्षित ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
जिल्ह्यात पावसाळ्यातील मृगाचे 15 दिवस कोरड गेले. आर्द्रापासून पावसाला सुरुवात झाली. जुलैच्या तिसर्‍या आठवड्यापर्यंत कधी रिमझिम तर कधी मध्यम स्वरुपाचा पाऊस होत होता. त्यावर खरीपाच्या 98 टक्के पेरण्या झाल्या. त्यानंतर मात्र, वरुणराजाने हुलकावणीच दिली. जिल्ह्यातील जळकोट तालुक्यातील दोन महसूल मंडळ वगळता अद्यापही एकदाही मुसळधार पाऊस झाला नाही. त्यामुळे मांजरा, तेरणा, तिरु या तीन प्रमुख नद्या वाहिल्या नाहीत.जिल्ह्यात अद्यापही दमदार पाऊस झाला नसल्याने नदी- नाले वाहिले नाहीत. परिणामी, विहिरी, तलाव, लघु, मध्यम प्रकल्पात जलसाठा झाला नाही. बाष्पीभवनामुळे जलसाठ्यात मोठी घट होत आहे. पावसाळ्यातील पावणेतीन महिने उलटत आहेत. मात्र, दमदार पाऊस नाही. त्यामुळे व्हटी आणि तिरु हे दोन मध्यम प्रकल्प जोत्याखाली आहेत. तिथे उपयुक्त पाणीसाठा नाही. उर्वरित सहा प्रकल्पात 25.465 दलघमी उपयुक्त पाणीसाठा आहे. तसेच 134 लघुप्रकल्पात 67.321 दलघमी उपयुक्त पाणीसाठा असून त्याची टक्केवारी 21.42 अशी आहे. जिल्ह्यात ऑगस्टअखेरपर्यंत समाधानकारक पाऊस झाला नाही. तसेच मान्सूनमध्ये पावसाची प्रगतीही नसल्याने जिल्ह्यातील ग्रामीण व नागरी भागात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होऊ नये म्हणून जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी जिल्ह्यातील सर्व मध्यम, लघु पाटबंधार्‍यातील पाणी राखीव ठेवण्याचे आदेश काढले आहेत.जिल्ह्यातील मध्यम, लघु प्रकल्पातील उपयुक्त पाणी पातळीचा आढावा घेऊन संभाव्य पाणी टंचाई उद्भवू नये म्हणून जिल्हाधिकार्‍यांनी प्रकल्पातील पाणी केवळ पिण्यासाठी आरक्षित केले आहे. प्रकल्पातील पाण्याचा अनधिकृतपणे उपसा होणार नाही, याची दक्षता पाटबंधारे विभागाने घ्यावी. पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी प्रकल्पातील पाणीसाठा सुरक्षित ठेवण्यासाठी दक्षता पथक नियुक्त करावे, असेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. जिल्ह्यातील आणि शहरातील औद्योगिक क्षेत्रातही येणार्‍या काळातील पाणी टंचाई लक्षात घेऊन पाणी कपात करण्याची सूचना संबंधित विभागाला दिली जाणार असल्याचे जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर- घुगे यांनी सांगितले.

COMMENTS