Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पुस्तकं खरेदी करण्यासाठी पैसे नसल्याच्या कारणामुळे नववीतील चौदा वर्षीय मुलीने घेतला गळफास

लोहा तालुक्यातील माळेगांव यात्रा येथील घटना

लोहा प्रतिनिधी - दक्षिण भारतातील काशी म्हणून ओळख असलेल्या लोहा तालुक्यातील श्री क्षेत्र माळेगांव यात्रा येथील आल्प भुधारक शेतकर्‍याच्या इयत्ता न

संगमनेरमध्ये मराठा आरक्षणासाठी तरुणाची आत्महत्या
स्वतःच्याच गॅरेजमध्ये गळफास घेऊन गॅरेज चालकाची आत्महत्या
मोबाईलसाठी गळफास घेवून संपवले जीवन

लोहा प्रतिनिधी – दक्षिण भारतातील काशी म्हणून ओळख असलेल्या लोहा तालुक्यातील श्री क्षेत्र माळेगांव यात्रा येथील आल्प भुधारक शेतकर्‍याच्या इयत्ता नववी वर्गात शिक्षण घेणार्‍या चौदा वर्षीय मुलीने पुस्तके खरेदी करण्यासाठी पैसे नसल्याच्या कारणामुळे झाडाला गळफास लावून जीवनयात्रा संपविल्याची दुर्दैवी घटना नुकतीच घडली. सदर घटनेमुळे परिसरात व शैक्षणिक क्षेत्रात हळहळ होत आहे. गावातील दानशूर व्यक्तीने किंवा शाळेतील एखाद्या शिक्षकाने सदरील विद्यार्थिनीस पुस्तक खरेदी करण्यासाठी मदत पुरवली असती तर मुलीचा जीव वाचला असता अशी प्रतिक्रिया बोलली जात आहे.
लोहा तालुक्यातील श्री क्षेत्र माळेगांव यात्रा येथील अल्प भूधारक शेतकरी त्र्यंबक वाघमारे हे माळेगांव यात्रा गावात वास्तव्यास आहेत. त्यांच्या कुटुंबात पत्नीसह एक मुलगा आणि पाच मुली आहेत. तर त्यांच्याकडे जवळपास दीड ते दोन एकर कोरडवाहू शेत जमीन आहे. त्यावरच त्यांच्या संपूर्ण कुटुंबाचा प्रपंच चालतो. त्यावर गुजराण होत नसल्याने मिळेल ती मोलमजुरीचे कामे करून त्र्यंबक कुटुंबाचा गाडा ओढतात. आर्थिक गरिबी परिस्थितीतून त्यांनी यापूर्वी तिन मुलींचे विवाह लावून दिले. तर आणखी दोन मुली विवाहाच्या राहिल्या असून कु. स्वाती ही सर्वात धाकटी चौदा वर्षांची नवव्या वर्गात गावातीलच संजय गांधी विद्यालयात शिक्षण घेत होती. शिक्षणात हुशार व आवड असल्याने तिचे पिता त्र्यंबक वाघमारे यांनी तिला शिक्षण घेण्यासाठी कसलीही कमी पडू द्यायची नाही असे ठरविले होते. मात्र घरातील अठरा विश्व दारिद्र्य त्यात स्वातीच्या आजारी आईचा सातत्याने दवाखाना खर्च, घरातील दैनंदिन खर्च यामुळे त्र्यंबक वाघमारे हे सतत आर्थिक बेजारीत असायचे. मिळेल ते काम करायचे आणि कुटुंबाचा चरितार्थ चालवायचे. स्वाती सर्वात लहान आणि अभ्यासात हुशार असल्याने तिचा घरात लाड असायचा. चौदा वर्षीय स्वाती देखील शाळा अटोपल्यावर घरी अभ्यास करून आईला घरकामात मदत करायची. स्वाती प्रेमळ सुस्वभावी असल्याने तिचा कुटुंबासह शाळेत व शेजारी सर्वांची लाडकी होती. अभ्यासात हुशार असलेल्या स्वातीला शालेय पुस्तके खरेदी करण्यासाठी तिच्या वडिलांकडे पैसे नव्हते. आठवडाभर काम केल्यानंतर जे पैसे मिळतील त्यातून तुझे पुस्तके खरेदी करू. असे आश्वासन वडिलांनी स्वातीला दिले होते. परंतु वडिलांची आर्थिक परिस्थितीची जाणीव स्वातीला होती. तिने वडिलांना सांगितले मला नवीन पुस्तके नको. माझ्या एखाद्या मैत्रिणीकडे जुने पुस्तक मिळते का ते पाहून त्यावरच अभ्यास करेन असे तिने वडिलांना सांगितले होते. रविवार दि. 23 जुलै उजाडला स्वाती तणावात असल्याचे कांहीं जवळच्यांच्या लक्षात आले परंतु स्वातीने तिच्या चेहर्‍यावरचा भाव कुणाला ओळखू येवू दिला नाही. गरिबी परिस्थिती असल्याने स्वाती बहुतेक रविवारी खंडोबा मंदिरात भाविकांना होणारा अन्नदान कार्यक्रमास हजर होऊन भोजन करायची आणि कांहीं अन्न ती घरी घेवून यायची. तसेच तेथील कांहीं भांडीही धुवायची. या रविवारी देखील ती तिच्या मैत्रिणी सोबत मंदिरातील अन्नछत्र कार्यक्रमात गेली. मंदिरातून आल्यानंतर तिने गावातील हॉटेलातून बहिणीच्या बाळासाठी खाऊ घेवून दिला. आणि गावातून पुस्तक आणायचे असे मैत्रिणीस सांगून गेली. मात्र पुन्हा ती आलीच नाही. रविवारी दि. 23 रोजी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास स्वाती गावालगत शिवारातील पळसाच्या झाडाला गळफास घेवून आत्महत्या केल्याची  वार्ता गावात पसरली. नातेवाइकांसह ग्रामस्थांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. व माळाकोळी पोलिसांना घटनेची माहिती कळवली. पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून प्रकरण दप्तरी नोंद केली. मयत स्वाती हीचे माळाकोळी प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करण्यात आले. भारत देश महासत्ता होण्याच्या उंबरठ्यावर असल्याचे राज्यकर्ते प्रसार माध्यमातून सांगत असताना दुसरीकडे मात्र गरिबीमुळे अनेकांना एकवेळचे जेवण मिळत नाही, कांहिना अंगभर घालायला वस्त्र मिळत नाहीत, कांहींना शालेय साहित्य घेण्यासाठी पैसे मिळत नाही. अशा वाईट परिस्थितीत गरीब माणूस जगत असल्याचे विदारक चित्र सदरील घटनेमुळे समोर आले आहे. शंभर टक्के अनुदान तत्वावर असलेल्या माळेगांव येथील संजय गांधी विद्यालयाच्या एखाद्या शिक्षकाने स्वातीला आधार दिला आसता तर स्वातीचा जिव नक्कीच वाचला असता आशी चर्चा गावात होत आहे.

COMMENTS