रायगड जिल्ह्यातील रत्नदुर्ग

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

रायगड जिल्ह्यातील रत्नदुर्ग

रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यात मिरगड उर्फ़ मिर्‍या डोंगर नावाचा किल्ला आहे. या किल्ल्याच्या मागच्या बाजूला एका छोट्या डोंगरावर ‘‘रत्नदुर्ग’’ नावाचा

पुण्यात ओमायक्रॉन विषाणूचा समूह संसर्ग नसल्याचे स्पष्ट
मुलीचा गळा आवळून बापाची आत्महत्या
अल्पवयीन मुलीच्या गर्भपाताचा प्रयत्न…गुन्हा दाखल


रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यात मिरगड उर्फ़ मिर्‍या डोंगर नावाचा किल्ला आहे. या किल्ल्याच्या मागच्या बाजूला एका छोट्या डोंगरावर ‘‘रत्नदुर्ग’’ नावाचा छोटा टेहळणीचा किल्ला आहे. मिरगड आणि रतनगड उर्ग रत्नदुर्ग या किल्ल्याच्या मध्ये एक खिंड आहे. पेण,खोपोली हा प्राचीन व्यापारी मार्ग या खिंडीतून जात होता त्यावर लक्ष ठेवण्यासाठी हा किल्ला बांधला असावा. या किल्ल्या वरील पाण्याची टाकी पाहाता हा किल्ला सातवहान कालिन असावा.
गडाचा परिचय :
मुंबई – पनवेल – पेण – कामार्ली – वाक्रुळ फ़ाटा -सायमाळ (अंतर ८० किमी) . पेण एसटी स्थानकातून पेण – तिलोरे जाणार्‍या एसटी बसेस आहेत. पेण सायमाळ हे अंतर १७ साधारण कि.मी आहे. या बसने सायमाळ फ़ाट्यावर उतरुन आपण १० मिनिटात गावात पोहोचतो.
सायमाळ हे रतनगड (रत्नदुर्ग) किल्ल्याच्या पायथ्याचे गाव आहे. जोडस असलेले हे गाव किल्ल्याच्या समोर वसलेले आहे. या गावाला खेटून रांजण नावाचा डोंगर आहे. गावात एक गणपती मंदिर आहे. या गणपतीचे दर्शन घेऊन गावातील प्राथमिक शाळेपाशी पोहोचावे. तेथील तोफ़ पाहून कच्च्या रस्त्याने रतनगडाच्या दिशेला चालत निघावे. सायमाळ गाव आणि रतनगड यांच्या मध्ये दरी आहे. कच्चा रस्ता दरी पर्यंत जातो. पुढे पायवाटेने आपण किल्ल्याच्या पायथ्याशी पोहोचतो. गावापासून किल्ल्याच्या पायथ्या पर्यंत जाण्यास १५ मिनिटे लागतात. पायथ्या पासून चढून गेल्यावर गावदेवीचे बांधलेले मंदिर आहे. मंदिरा बाहेर एक मुर्ती ठेवलेली आहे. या मंदिरात ३ मुर्ती आहेत. मंदिराच्या डाव्या बाजूने मागे जाऊन किल्ला चढायला सुरुवात करावी. या किल्ल्यावर गावकर्‍यांचा जास्त वावर नसल्याने पायवाटा ठळक नाही.
सर्व पार करत तीव्र चढ चढून अर्ध्या तासात आपण सपाटीवर पोहोचतो. या ठिकाणी कातळात कोरलेले गोल खळगे दिसतात. या ठिकाणी बसून टेहळणी करणार्‍यास, टेहळ्यांचे उन पाऊसा पासून संरक्षण करण्यासाठी या पॉटहोल्स मध्ये लाकडी खांब रोवून त्यावर गवताचे छप्पर घातले जात असे. या ठिकाणाहून सायमाळ गावच्या बाजूचा रांजण डोंगर, दुरवरची तिलोरे, डोलवली इत्यादी गावे दिसतात.
या पठारावरुन थोडेसे वर चढून गेल्यावर एक कातळात आतवर कोरलेले टाक दिसते. हे टाक पाहून किल्ल्याच्या सर्वोच्च टोकाकडे न जाता डाव्या बाजूने जाणार्‍या पायवाटेने वळासा घालून पुढे गेल्यावर कातळात खोदलेले दुसरे टाक दिसते
टाक पाहून पुढे गेल्यावर आपण मिरगड आणि किल्ल्याचा डोंगर यामधील खिंडीच्या बाजूला येतो. येथे कातळात कोरलेले पॉटहोल्स आहेत. पुढे गेल्यावर कातळात खोदलेल्या खाचा आहेत. त्यातून जपून खाली उतरल्यावर पाण्याच मोठे टाक आहे. हे टाक भरल्यावर पाणी बाहेर जाण्यासाठी पन्हाळी दगडात कोरलेली आहे. या पन्हाळीच्या खालच्या बाजूला चौथे टाक आहे, ते पाहाण्यासाठी तिसर्‍या टाक्याच्या पुढे असलेला साधारण १० फ़ूटी कातळ टप्पा (रॉक पॅच) उतरुन जावे लागते. त्यासाठी गिर्यारोहणाचे तंत्र अवगत असणे आणि सोबत रोप असणे हि आवश्यक आहे. चौथे टाक कोरडे आहे. ते पाहून आलेल्या मार्गाने जपून वर चढून पहिल्या टाक्यापर्यंत यावे. येथून गड माथ्यावर जाण्यासाठी वाट आहे. आपला ढासळलेल्या तटबंदीतून गडमाथ्यावर प्रवेश होतो. मिरगडच्या बाजूला एका ढासळलेल्या बुरुजाचे अवशेष आहेत. तटबंदीतून पाणी बाहेर जाण्यासाठी बनवलेली एक दगडी पन्हाळी तटबंदीवर पडलेली आहे. गडमाथ्यावर क्षेत्रपालाची मुर्ती आहे. या ठिकाणी पूर्वी छोटेसे देऊळ असावे त्याची साक्ष देणारा फ़ूल कोरलेला एक नक्षिदार दगड येथे पडलेला आहे. डाव्या बाजूला एक पिंड आहे. या गडावरुन मिरगड, माणिकगड, हेटवणे हे धरण दिसतात. आल्या वाटेने परत पायथ्याशी आल्यावर आपली गडफ़ेरी पूर्ण होते.

लेखक :- साईप्रसाद प्रमोद कुंभकर्ण

COMMENTS