हातावर पोट असलेल्या विडी कामगारांच्या हाताला काम द्यावे किंवा मग पंधराशे रुपये आर्थिक मदत देण्याची मागणी लालबावटा विडी कामगार युनियन आयटक व इंटकने केली असून, या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयास देण्यात आले आहे.
अहमदनगर/प्रतिनिधी- हातावर पोट असलेल्या विडी कामगारांच्या हाताला काम द्यावे किंवा मग पंधराशे रुपये आर्थिक मदत देण्याची मागणी लालबावटा विडी कामगार युनियन आयटक व इंटकने केली असून, या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयास देण्यात आले आहे.
राज्यात 1 मे पर्यंत संचारबंदी घोषित करून पंधरा दिवसाच्या लॉकडाउन काळात विडी कामगारांना आर्थिक मदत द्यावी, अन्यथा विडी कामगारांचा रोजगार सुरु ठेवण्यासाठी विडी कारखान्यांना घरखेप सुरु ठेवण्याची मागणी लालबावटा विडी कामगार युनियन आयटक व विडी कामगार युनियन इंटकच्यावतीने करण्यात आली आहे. यावेळी आयटकचे सरचिटणीस अॅड. सुधीर टोकेकर, उपाध्यक्ष भारती न्यालपेल्ली, इंटकचे अध्यक्ष शंकरराव मंगलारप, सरोजनी दिकोंडा, विनायक मच्चा, कविता मच्चा, शारदा बोगा, कमलाबाई दोंता, लक्ष्मीबाई कोटा, ईश्वराबाई सुंकि आदी उपस्थित होते.
नाहीतर आंदोलन…
कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न बिकट होत असल्याने विडी कामगारांना काम द्या, नाहीतर आर्थिक मदत देण्याचे आवाहन प्रशासनास करण्यात आले आहे. अन्यथा, रस्त्यावर येऊन आंदोलन केल्याशिवाय पर्याय राहणार नसल्याचा इशारा देण्यात आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंधरा दिवसांची संचारबंदी पुकारून लॉकडाऊन केले आहे. यात आर्थिक मदतीतून कामगारांना दिलासा दिला असून, कारखाने व उत्पादने बंद न ठेवता नियम व अटीनुसार उत्पादन सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे व आर्थिकदृष्ट्या गरीब कामगारांना पंधराशे रुपयांचे पॅकेज जाहीर करण्यात आले आहे. विडी कामगार हे देखील आर्थिकदृष्ट्या दुर्बल व गरीब असून रोजंदारीवर काम करुन कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत असतात. राज्य सरकारने पंधरा दिवसाचा लॉकडाऊन केला असल्याने विडी कामगारांना देखील जिल्हाधिकारी यांनी 15 दिवसासाठी नियोजन समितीच्या कोट्यामधून प्रत्येक कामगारास दीड हजार रुपये अनुदान देण्याची मागणी विडी कामगार संघटनांच्यावतीने करण्यात आली आहे. शहरात सुमारे तीन ते चार हजार विडी कामगार असून, त्यांच्या उदरनिर्वाहाची सोय यामुळे होणार आहे. विडी कारखान्यांना विडी कामगारांपर्यंत घरपोच विडी बनविण्यासाठी पाने, तंबाखूचा कच्चा माल पुरविल्यास त्यांचा रोजगार बुडणार नाही, कारखान्यांनी विडी कामगारांना रोजंदारी रोख स्वरुपात द्यावी व पंधरा दिवसाचे सानुग्रह अनुदान देण्याची मागणी लालबावटा विडी कामगार युनियन आयटक व विडी कामगार युनियन इंटकच्यावतीने करण्यात आली आहे.
—
COMMENTS