Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

लिफ्ट मागून वाहनचालकांना लुटणार्‍या महिलेस पकडले

दिल्लीगेट ते एमआयडीसी रस्त्यादरम्यान दुचाकी, टेम्पो चालकासह अन्य वाहनचालकांना लिफ्ट मागून नंतर त्यांना लुटणार्‍या महिलेस काही जागरूक नागरिकांच्या दक्षतेमुळे पोलिसांनी पकडले.

खेलो इंडिया यूथ गेम्स; आर्चरीमध्ये आदितीचा सुवर्णवेध तर पार्थ कोरडेला रौप्यपदक
घटस्फोटीत महिलेचा पतीकडून विनयभंग
महानगरपालिकेवर काँग्रेसचा भव्य आसूड मोर्चा

अहमदनगर/प्रतिनिधी- दिल्लीगेट ते एमआयडीसी रस्त्यादरम्यान दुचाकी, टेम्पो चालकासह अन्य वाहनचालकांना लिफ्ट मागून नंतर त्यांना लुटणार्‍या महिलेस काही जागरूक नागरिकांच्या दक्षतेमुळे पोलिसांनी पकडले. पोलिसांनी तिच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पकडण्यात आलेली ती महिला कधी कोणात्या तरी मोठ्या व्यक्तीची ओळख अथवा स्वतः वकील असल्याचे सांगून लिफ्ट देणार्‍याला दमदाटी करून तसेच पोलिस ठाण्याची भीती दाखवीत, शिवीगाळ करून लुटीत असल्याची माहिती मिळाली होती. 

तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुनील गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक समाधान सोंळके यांच्या सूचनेनुसार महिला पोलिस कर्मचार्‍यांनी सापळा लावून त्या महिलेस अखेर पकडले.

 दोघांना होते लुटले

गुढीपाडव्याच्या दिवशी म्हणजे गेल्या मंगळवारी (दि.13) रोजी दुपारी 12.45 वाजण्याच्या सुमारास विजय किसन माने (वय.43, रा.मिस्किन मळ्यासमोर, सिव्हील हडको, अ.नगर) हा आपल्या टेम्पोमध्ये फर्निचर सामान घेऊन नगर-मनमाड रोडने एमआयडीसीकडे जात होता. यावेळी झोपडी कॅन्टीनसमोर टीव्हीएस शोरूम जवळ पांढर्‍या रंगाचा अ‍ॅप्रन घालून एक महिला उभी होती. या ठिकाणी टेम्पोचालक पाणी पिण्यासाठी थांबला असता, त्या महिलेने संधी साधून त्या टेम्पाचालकाला मला हुंडेकरी शोरूमजवळ सोडा, असे सांगितले, यावेळी टेम्पोमध्ये फर्निचर असल्याने टेम्पोच्या पुढील सीटवर त्याने त्या महिलेस बसण्यास सांगितले. यानंतर हुंडेकरी शोरूम आल्याने त्या महिलेस येथे उतारा असे टेम्पोचालक माने म्हणाला. यावेळी त्या महिलेने, मी कुणाच्या गाडीत फुकट येत नाही, असे म्हणून त्याला 500 रुपयाची नोट दाखवली. तेव्हा त्यावेळी त्या टेम्पोचालकाने 500 रुपये सुट्टे नसल्याचे सांगितले. यावर ती महिला त्याला म्हणाली, माझ्याकडील 200 रुपयाच्या तीन नोटा घ्या व मला 580 रुपये मागे द्या, तेव्हा तो टेम्पोचालक त्या महिलेस, हा कोणता हिशोब आहे?. मला फक्त  20 रुपय भाडे द्या, असे म्हणाला. यावर ती महिला त्या टेम्पो चालकाला म्हणाली, ’मी तुला पोलीस स्टेशनला घेऊन जाईल. मी कोर्टात क्लासवन अधिकारी आहे’, असे म्हणून पुन्हा टेम्पोत बसून डॉन बॉस्को पुलापर्यंत हुज्जत घातली. शिवीगाळ, दमदाटी करून त्या महिलेने टेम्पोचालकाकडून 1700 रुपये काढून घेतले. तर त्याआधी काही काळ त्याच दिवशी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास शांतीलाल कपुरचंद भंडारी (राहणार आनंद नगर, स्टेशन रोड, अहमदनगर) हे दुचाकीवरून त्याच रस्त्याने जात असताना त्या महिलेने भंडारींकडे लिफ्ट मागून ती त्यांच्या दुचाकीवर बसली आणि रस्त्यावर दमदाटी करून त्यांच्याकडून 1500 रुपये काढून घेण्याची घटना घडली होती.

बदनामीच्या भीतीने गप्प

या महिलेने लिप्ट मागून लुटल्याच्या अनेक घटना या रस्त्यावर घडल्या आहेत. परंतु बदनामीच्या भीतीमुळेच कोणी पोलिस ठाण्यात आपल्याला लुटल्याच्या तक्रारी दिल्या नाहीत. पण काही जागरूक तरुणांमुळे ती महिला तोफखाना पोलिसांनी पकडली. तिची चौकशी केली असता तिचे नाव सुनीता भाऊसाहेब भगत (वय 43, राहणार काळे वस्ती, जेऊर, ता. नगर, जि. अ. नगर) असल्याचे समजले. याप्रकरणी विजय किसन माने यांच्या फिर्यादीवरून तोफखाना पोलिसांनी भादवि कलम 392 प्रमाणे जबरी चोरीच्या गुन्ह्याची नोंद केली असून अधिक तपास पोलीस हवालदार खंडागळे करीत आहेत.

COMMENTS