कोपरगाव प्रतिनिधी : कोपरगाव तालुक्यातील करंजी बु. येथील रयत लक्ष्मी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेतील तत्कालीन व्यवस्थापक आयुब बनेमिया शेख यां
कोपरगाव प्रतिनिधी : कोपरगाव तालुक्यातील करंजी बु. येथील रयत लक्ष्मी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेतील तत्कालीन व्यवस्थापक आयुब बनेमिया शेख यांनी त्याचे व त्याच्या कुटुंबियांच्या नावाने नियमबाह्य बोगस कर्जे नावे टाकून संस्थेच्या तब्बल 84 लाख 43 हजार 146 रुपयांचा गैरव्यवहार केल्याचे लेखापरीक्षण अहवालात निष्पन्न झाले आहे. प्रकरणी सहकारी संस्था, अप्पर लेखापरीक्षक अनिष सुनील पटेल यांनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पतसंस्थेत गैरव्यवहाराचे प्रकरण उघडकीस आल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, कोपरगाव तालुक्यातील पतसंस्था क्षेत्रात अग्रगण्य असणार्या रयत लक्ष्मी पतसंस्थेचे तत्कालीन व्यवस्थापक आयुब शेख यांनी सन 2016 ते 2021 या कालखंडात त्यांचे व त्यांच्या कुटुंबियांच्या नावे पोटनियम बाह्य कर्ज रकमा नावे टाकून हा गैरव्यवहार केल्याचे अप्पर लेखापरीक्षक अनिष सुनील पटेल यांनी फिर्यादीत म्हटले आहे. शाखा व्यवस्थापक व कर्जदार शेख यांनी स्वतः 2 लाख 93 हजाराचे जामिनकी कर्ज तसेच कॅश क्रेडीट कर्ज 48 लाख 88 हजार रुपये, मुलगा जाहिद शेख यास 23 लाख 92 हजारांचे कॅश क्रेडीट कर्ज असताना नोटीस दिल्यानंतर त्याचा भरणा केलेला नाही. व्यवस्थापक शेख व त्याच्या कुटुंबीयांच्या कर्जापैकी 75 लाख 73 हजार रुपये कर्ज अजून भरलेले नाही. संस्थेच्या रोख रक्कमेतून योगेश पांडुरंग फापाळे यांचे नावे दीड लाख रुपये,अमोल केशव रोहम यांचे नावावर 3 लाख 70 हजार रोखीने बोगस नावे टाकले आहे. व्यवस्थापक आयुब शेख याने स्वतः अनामत म्हणून नावे टाकलेले साडे तीन लाख असे सर्व मिळून तब्बल 84 लाख 43 हजार 146 व अधिक होणारे व्याज अद्याप वसूल झालेले नाही.चाचणी लेखा परीक्षण काळात तत्कालीन व्यवस्थापक शेख याने नियमबाह्य कर्ज नावे टाकून सदर रकमेचा गैरव्यवहार केला असल्याचा ठपका लेखापरीक्षक ए.एस. पटेल यांनी ठेवला आहे. त्याप्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात मॅनेजर आयुब शेख यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यामुळे पतसंस्था क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.
गुन्हा दाखल होण्यास विलंब कशामुळे ? – करंजीच्या रयतलक्ष्मी पतसंस्थेत झालेल्या गैरव्यवहाराची रक्कम भरणेसंबंधी मनेजरने दिलेल्या 9 फेब्रुवारी 2023च्या प्रतिज्ञापत्रानुसार 31जानेवारी आणि 30 सप्टेंबर अखेर मुदतवाढ घेतली होती.त्या मुदतीत पैशे चुकविण्यात आले नाही.तरीदेखी गुन्हा नोंदविण्यास विलंब कुठल्या कारणाने झाला याबाबद चौकशी व्हावी अशी आता खातेदार ठेवीदारांत कुजबुज ऐकायला मिळत आहे.
व्यवस्थापक आयुब शेखने करंजी येथे चौरंगीनाथ अॅग्रो प्रोडूसर कंपनी नावाने खाजगी बाजार समिती सुरु केली आहे. खाजगी बाजार समिती सुरु करण्यासाठी आवश्यक असलेले क्षेत्र पणन महामंडळाच्या नियमानुसार 6 एकर स्वमालकीचे किंवा भाडे तत्वावर असल्यास कमीत कमी 29 वर्ष भाडेपट्टा असणे आवश्यक आहे. परंतु करंजी येथे ज्या ठिकाणी आयुब शेख याने चौरंगीनाथ अॅग्रो प्रोडूसर कंपनी सुरु केली आहे त्या क्षेत्राचा 10 ते 15 वर्षाचाच करार आहे. खाजगी बाजार समिती सुरु करण्यापूर्वी आवश्यक असलेल्या सोयी-सुविधा निर्माण केलेल्या नसतांना आयुब शेख याने खाजगी बाजार समिती सुरु करण्यासाठी परवानगी मिळविली आहे. बाजार समिती सुरु करण्यासाठी आयुब शेख यांची आर्थिक परिस्थिती नसतांना बाजार समिती सुरु तसेच काही वर्षापूर्वी अयुब शेख याने निधी बँक देखील सुरु केली होती. काही महिन्यांपूर्वी हि निधी बँक बंद करून त्याच नावाने क्रेडीट सोसायटी सुरु केली आहे. असे अनेक गुंतागुंतीचे व्यवहार करणार्या मॅनेजर आयुब शेखवर 84 लाख 43 हजार 146 रुपयांचा गैरव्यवहार केल्याचे लेखापरीक्षण अहवालात निष्पन्न होवून गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे त्याने चौरंगीनाथ ऍग्रो प्रोडूसर कंपनी नावाने सुरु केलेल्या खाजगी बाजार समितीत शेतकर्यांनी विक्रीसाठी आणलेल्या कांद्याचे पैसे मिळतील का? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाल्याशिवाय राहत नाही.
कारभारी आगवण(संस्थापक- रयत लक्ष्मी पतसंस्था)
COMMENTS