शेवट गोल्ड झाला! पण….

Homeताज्या बातम्यासंपादकीय

शेवट गोल्ड झाला! पण….

कुठल्याही क्षेत्रात काय कमावले काय गमावले याचा लेखाजोखा मांडतांना सुरूवात आणि अखेर या बिंदूचा ताळेबंद मांडणे इष्ट ठरते.मिळालेले यशापयश जोखतांना प्राप

आघाडीच्या चाकाला केंद्राची खुट्टी !
महागाईचा विस्फोट !
पक्वानांच्या ताटात पालीची लघुशंका!

कुठल्याही क्षेत्रात काय कमावले काय गमावले याचा लेखाजोखा मांडतांना सुरूवात आणि अखेर या बिंदूचा ताळेबंद मांडणे इष्ट ठरते.मिळालेले यशापयश जोखतांना प्राप्त परिस्थितीचाही विचार करणे संयुक्तिक ठरते.प्रतिकूल  परिस्थितीत मिळालेले अपयश अनुकूल परिस्थितीत मिळालेल्या यशापेक्षा महत्वाचे मानले तर केलेली धडपड सार्थकी लागते.टोकीयो ऑलम्पिक मध्ये भारताला मिळालेले पदकांची संख्या पाहून निराशाचा राग आवळण्यापेक्षा प्रतिकूल परिस्थितीत या खेळाडूंनी केलेली धडपड महत्वाची मानली तर शेवट गोडच नाही तर गोल्ड झाला असे म्हणता येईल.
यंदाच्या ऑलम्पिक स्पर्धेत भारताच्या १२६ खेळाडूंनी दाखवलेली चमक अगदीच दुर्लक्षीत करण्यासारखी नाही.पदतालिकेत भारत अखेरच्या क्रमांकावर असला तरी सात पदके मिळवून केलेली कमाई एकूण भारतीय क्रीडा मानसिकतेचा विचार करता जसे आहे तसे गोड मानून घेण्यातच खरे हशील आहे.स्पर्धेची सुरूवात आणि शेवटही भायताच्या दृष्टीने गोडगोल्डी ठरला आहे.अगदी सुरूवातीला राष्ट्रप्रेमाने न्हाऊन निघालेल्या इवल्याशा मिरा चानूने ब्रांझ पदक मिळवून खाते उघडून दिले तर सांगतेला निरज चोपडा मरहट्टी गड्याने थेट सुवर्ण तुराच खोवला.या अर्थाने  टोकियो ऑलंम्पिक क्रिडा स्पर्धेतील शनिवार भारतासाठी ‘सुवर्ण’ दिवस ठरला. निरज चोपडाच्या  भालाफेकीने भारताचे  “सुवर्ण” ध्येय पुर्णत्वास गेले.चानूने केलेला प्रारंभ आणि निरज केलेली सांगता  भव्य अशा जागतिक ऑलंम्पिक स्पर्धांमध्ये विशाल जनसंख्येचा देश असलेल्या भारत ‘सप्त पदकांनी’ सुवर्णमय कारणीभूत ठरली.
ऑलंम्पिक स्पर्धेत सर्वात पहिले पदक मिरा चानूने वेटलिफ्टिंग क्रिडा प्रकारात 40 किलो वजन गटात पहिले रौप्य पदक मिळवून भारताला सलामी दिली. त्यातच बॅडमिंटनमध्ये पी. व्ही. सिंधूने कांस्य पदक मिळवून इतिहास घडविला. ऑलंम्पिक स्पर्धांमध्ये दुसरे पदक मिळविणारी सिंधू पहिली खेळाडू ठरली. टोकियो ऑलंम्पिकमध्ये कुस्तीत रवी दहियाने फ्री स्टाईल 57 किलो वजन गटात उपांत्य सामन्यात कझाकिस्तानच्या नुरइस्लाम सानायेव याचा पराभव करून अंतिम फेरी गाठली होती. सुशीलकुमार नंतर ऑलम्पिकमध्ये अंतिम फेरी गाठणारा रवी दहिया पहिला मल्ल ठरला. परंतू रशियन मल्लाने अंतिम फेरीत रवी दहियाचा 7-4 ने पराभव केला आणि रवी दहियाला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. आणि 69 किलो वजनी गटात महिला बॉक्सर लवलिनाने कांस्य पदक जिंकले तर कुस्ती फ्री स्टाईल प्रकारात 45 किलो वजनी गटात बजरंग पुनियाने कांस्य पदक मिळविले. शिवाय सांघिक क्रिडा प्रकारात पुरूष हॉकी स्पर्धेत भारताने जर्मनीला 5-4 ने हरवून कांस्यपदक जिंकले. सात पदकांच्या या मांदियाळीत भालाफेक प्रकारात निरज चोप्राने 87.58 मीटर भाला फेक करीत भारताला ‘सुवर्ण भारत’ बनविले. आर्मीत राजपूताना रायफलमध्ये सुभेदार पदावर असलेल्या 24 वर्षीय निरजने ही ‘सुवर्णमयी’ कामगिरी करत भारताच्या शिरपेचात सुवर्णपदक रोवले. सात पदकांच्या तालिकेत 6 पदके हे व्यक्तिगत क्रिडा प्रकारात मिळविली तर एक पदक भारतीय पुरूष हॉकी संघाने मिळविले. यात तीन महिला खेळाडू, मीराबाई चानू (वेट लिफ्टिंग), पी. व्ही. सिंधु (बॅडमिंटन), लवलिनाने (बॉक्सिंग) क्रीडा प्रकारात पदके मिळविली तर रवी दहिया (कुस्ती), बजरंग पुनिया (कुस्ती), निरज चोप्रा (भालाफेक) या क्रीडा प्रकारात पुरूष खेळाडूंनी पदके मिळविली. चार कांस्य, दोन रौप्य आणि एक सुवर्ण पदक मिळवत भारताने पदकांची ‘सप्तपदी’ गाठली आहे. मिराबाई चानू हिने दिलेली कांस्य सलामी निरज चोप्राच्या सुवर्ण पदकाने भारताच्या तिरंग्याला सलामी दिली. हॉकी खेळात अतिशय अटीतटीच्या लढतीत पेनल्टी कॉर्नरवर कर्णधार मनप्रितसिंगच्या संघाने 5-4 असा रोमहर्षक विजय मिळविला. ऑलंम्पिक हॉकीमधील 41 वर्षांचा पदक दुष्काळ भारतीय हॉकी संघाने मिळविलेल्या कांस्यपदकाने का होईना दूर झाला आहे. जर्मनीसारख्या बलाढ्य संघाला शेवटच्या क्षणापर्यंत भारतीय हॉकी संघाने दिलेली मात, जर्मनीला मिळालेल्या शेवटच्या पेनल्टी कॉर्नरने विजयात बदलली. सामना संपण्यासाठी केवळ 6 सेकंद असतांना जर्मनीला पेनल्टी कॉर्नर मिळाला. परंतू श्रीजेशच्या गोल किपिंगने तो पेनल्टी कॉर्नर गोलमध्ये परावर्तीत होवू शकला नाही. अशाच पध्दतीने अतिशय जिद्दीने लढणारा भारतीय महिला हॉकी संघ मात्र यशस्वी होवू शकला नाही. निर्णायक सामन्यात भारतीय महिला हॉकी संघाला ग्रेट ब्रिटन विरूध्द  3-4 असा पराभव पत्करावा लागला. परंतू महिला हॉकी संघाचा पराभव झाला असला तरी उपांत्य फेरीपर्यंत धडक मारून कांस्य पदकासाठी खेळण्याची संधी भारतीय महिला हॉकीपटूंनी मोठ्या जिद्दीने मिळविली होती. म्हणून त्यांचेही कौतूक व्हावेच. महिला खेळाडू  भलेही सामना हरल्या असतील,  मने मात्र जिंकलीत. भारतीयांना  या सगळ्याचा अभिमान आहेच. त्यांच्या जिद्दीचे कौतूक केले तेव्हढे थोडेच  आहे.या महिला खेळाडूंनी गाळलेला घाम देशास पदक मिळवून देण्यास अपयशी  ठरला असला तरी त्यांनी  केलेली मेहनत देशातील करोडो मुलींसाठी प्रेरणा बनली आहे. 
 जागतिक ऑलम्पिक स्पर्धेमध्ये सुवर्ण, रौप्य, कांस्य अशा तिन्ही प्रकारचे पदक मिळवत 126 खेळाडूंच्या ऑलंम्पिक संघाने भारतासाठी प्रचंड मेहनत करत सात पदके मिळवून देवून तिरंग्याची  ‘आन-बान-शान’ कायम ठेवली आहे. भारताच्या शिरपेचात सुवर्णपदकाची भर घालत निरज चोप्राने भारताची मान जागतिक स्पर्धेत सुवर्ण पदकांच्या तालिकेत एक पदक मिळवून उंचावली आहे. त्यामुळे संपूर्ण देशवासियांनी सर्व  खेळाडूंचे तोंडभरून कौतूक करायला हवे.सोबत आपण या खेळाडूंच्या किंबहूना एकूणच क्रिडा क्षेत्रासाठी किती आणि कुठले योगदान देतो याचाही विचार करायला हवा.भारतीय व्यवस्थेची क्रिडा क्षेत्राबाबत असलेली उदासीन मानसिकता जोवर बदलणार नाही तोवर आहे असेच समाधान गोड आणि गोल्ड मानावे लागेल.

COMMENTS