छ.संभाजीनगर ः पोलिसांनी ललित पाटीलला अटक केल्यानंतर, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगरनंतर पालघरमध्ये ड्रग्जचा कारखान्यावर पोलिसांनी छापे टाकले आहेत

छ.संभाजीनगर ः पोलिसांनी ललित पाटीलला अटक केल्यानंतर, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगरनंतर पालघरमध्ये ड्रग्जचा कारखान्यावर पोलिसांनी छापे टाकले आहेत. मात्र याप्रकरणी शिंदे गट आणि ठाकरे गटात एकमेकांवर आरोप-प्रत्याराोप सुरू आहेत. राज्यातील ड्रग्ज प्रकरण गांभीर्याने घेण्याची गरज आहे. या प्रकरणात अनेक आमदार तसेच खासदारांचा समावेश असण्याची शक्यता आहे, असा दावा संजय शिरसाट यांनी केला आहे. त्यांच्या या दाव्याने मोठी खळबळ उडाली आहे.
काही दिवसांपूर्वीच ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी शिंदे गटाचे नेते दादा भुसे यांचे नाव घेतले होते. तर दुसरीकडे दादा भुसे यांनी आपण चौकशीला तयार असून, ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांची देखील चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी केली होती. त्यानंतर आमदार शिरसाट यांनी गंभीर आरोप केले आहेत. ड्रग्ज प्रकरणात कोणत्याही पक्षाच्या नेत्याचा हात असेल, तर त्याला तातडीने जेलमध्ये टाका अशी मागणी सुद्धा शिरसाट यांनी केली आहे. सरकारने ड्रग्स प्रकरण गांभीर्याने घ्यावे. यामध्ये राज्यातील आमदार-खासदार सहभागी आहेत, असा दावा शिरसाट यांनी केला. देशभरात ड्रग्ज यांचे रॅकेट आहेत. गृहखात्याने याकडे लक्ष देण्याची गरज आहे. यामध्ये सत्ताधारी पक्षाचे आमदार-खासदार असो वा विरोधी पक्षाचे पोलिसांनी तपास करुन त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करुन त्यांना जेलमध्ये टाकावे, अशी मागणी देखील संजय शिरसाट यांनी केली आहे. दरम्यान, आझाद मैदानावरील दसरा मेळावा जोशात पार पडणार, असा विश्वास संजय शिरसाट यांनी केला. जे तुळशीपत्र घरावर ठेवून शिवसेनेसाठी लढले अशा शिवसैनिकांचा हा मेळावा आहे. स्वाभिमानी शिवसैनिक आणि बाळासाहेब यांना मानणारे शिवसैनिक या मेळाव्याला असतील, असं शिरसाट म्हणाले. काहींनी सत्तेसाठी लाचारी पत्करली. काश्मीरला जाऊन मिठ्या मारल्या. सिल्व्हर ओकच्या सोफ्यावर बसले, अश्या लोकांच्या मेळाव्याला शिवसैनिक नसतील, असा टोला सुद्धा संजय शिरसाट यांनी ठाकरे गटाच्या दसरा मेळाव्याला लगावला.
पालघरमध्येही आढळला ड्रग्जचा कारखाना – पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यात ड्रग्जचा कारखाना असल्याची माहिती मिराभाईंदर पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर मिराभाईंदर गुन्हे शाखेकडून पालघर जिल्ह्यात मोठी कारवाई करण्यात आली आहे. अत्यंत गुप्तपणे आणि सावधगिरी बाळगत ही कारवाई केली गेली. ड्रग्ज बनवण्यासाठीचा कच्चा माल देखील या कारवाईदरम्यान जप्त करण्यात आला आहे. राज्यात अशा प्रकारे होणार्या सलग कारवाईंमुळे ड्रग्ज तस्करांचे धाबे दणाणले आहेत. मोखाडा तालुक्यातील एका फार्म हाऊसवर हा कारखाना चालू होता. या कारवाईत कोट्यवधी रुपयांचे साहित्य जप्त केल्याची माहिती आहे. तसेच या संदर्भातील आरोपीला वसईमधून अटक करण्यात आली आहे.
COMMENTS