Homeताज्या बातम्यासंपादकीय

मरण स्वस्त होत आहे…

ट्रॅव्हल्सने प्रवास करणारे ते निष्पाप 33 जीव आपल्याच धुंदीत, उद्याच्या स्वप्नात, नागपूर-पुणे असा समृद्धी महामार्गावर प्रवास करत होते. त्यातील अने

लोकशाहीचा उत्सव आणि मूल्ये
तृणमूलचा काँगे्रसला धक्का
कारागृहातील प्रशासनाला हादरे

ट्रॅव्हल्सने प्रवास करणारे ते निष्पाप 33 जीव आपल्याच धुंदीत, उद्याच्या स्वप्नात, नागपूर-पुणे असा समृद्धी महामार्गावर प्रवास करत होते. त्यातील अनेकजण 20-25 वर्ष वयोगटातील होते, उद्याच्या भविष्याची स्वप्ने बघत, तर कुणाला मिळालेल्या जॉबचा आनंद, तर आपल्या मुलाला विधी महाविद्यालयाला प्रवेश मिळाला म्हणून त्याला नागपूरला सोडून परत पुण्यात परतणारे प्राध्यापक, त्यांची पत्नी आणि मेडीलकला असलेली त्यांची मुलगी, अशा 25 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला, त्यांचा केवळ मृत्यूच झाला नाही, तर त्यांच्या स्वप्नांची, त्यांच्या उद्याच्या भविष्याची हत्याच केली, असेच म्हणावे लागेल. होय, आपल्या व्यवस्थेने केलेली ही हत्याच म्हणावी लागेल. भारतासारख्या देशात आजही नियम पाळले जात नाही, भ्रष्टाचाराच्या कुरणात आज पाहिजे ते सहज उपलब्ध होते. त्यामुळे नियम पाळण्यासाठी असतात, याचा विसरच आज सर्वांना पडतो आहे. चूक नेमकी कुणाची, याची सविस्तर चौकशी होईलही, मात्र त्यातून अर्धसत्यच बाहेर येईल, किंवा ते येवूच दिले जाणार नाही, कारण व्यवस्था सडलेली आहे. मूळातच त्या ट्रॅल्हल्सची, त्यावरील चालकाची, त्याला वाहनचालकाचा मिळणारा परवाना, त्याचबरोबर ते वाहन सुयोग्य स्थितीत होते का, या सर्व बाबींकडे प्रामुख्याने लक्ष देण्याची गरज आहे. रस्त्यावर हजारो ट्रॅव्हल्स धावत असतात, त्यांची तपासणी होते का, त्या गाड्या सुस्थितीत आहेत का, हा कळीचा मुद्दा आहे. त्याचबरोबर समृद्धी महामार्ग याकडे दुर्लक्ष करून कसे चालेल. हा महामार्ग मृत्यूचा सापळा बनत चालला आहे, मात्र अपघात नेमके कोणत्या कारणामुळे होत आहे, याचा शोध घेण्याची तसदी मात्र कुणीही दाखवत नाही. समृद्धी महामार्गाचे लोकार्पण झाल्यापासून त्यावर अपघातांचे सत्र सुरू आहे. महामार्ग पोलिसांनी दिलेल्या आकडेवारीनुसार, जानेवारी ते एप्रिल या चार महिन्यांच्या कालावधीत या महामार्गावर 358 अपघात घडले असून, यामध्ये 40 पेक्षा अधिक जणांनी जीव गमावला आहे. महामार्ग पोलिसांनी या अपघातांमागील कारणे शोधण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामध्ये सर्वाधिक 104 अपघात डुलकी लागल्याने किंवा शेकडो किमीचा सलग प्रवास करून थकल्याने घडले आहेत. 81 अपघात हे टायर फुटल्याने घडले असून, उष्ण तापमान आणि अतिवेग यामुळे घर्षण होऊन टायरफुटीच्या घटना घडत असल्याचे म्हटले जात आहे. अतिवेगामुळे 72, प्राणी मध्ये आल्याने 18, तांत्रिक बिघाडामुळे 16, ब्रेक डाऊन झाल्याने 14; तर इतर काही कारणांमुळे 74 अपघात घडल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. त्यामुळे वाढते अपघात रोखण्याचे मोठे आव्हान आहे. मात्र खरंच वेगामुळे अपघात होत आहे का, की खरंच या रस्त्यात दोष आहेत, या संपूर्ण बाबींची चौकशी होण्याची गरज आहे. आज मरण स्वस्त होतांना दिसून येत आहे. कुणी खून करतो, कुणी कोयता हातात धरून हल्ला करतो, तर कुणी अपघातातून जीव घेतात. हो व्यवस्थेने घेतलेले जीव आहे, ही हत्याच आहे. खरंतर त्या चालकाची गाडी चालवण्याची मानसिकता, त्याला मिळणारे वेतन, त्याला किती तास गाडी चालवावी लागते, या सर्व बाबी बघता, खरंच आपण नियम पाळतो का, हा महत्वाचा मुद्दा आहे. समृद्धी महामार्गाच्या गुणवत्तेवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित होत आहे, त्यासंदर्भात राज्यसरकारने नेमलेली समिती चौकशी करेलही, पण त्यातून फार काही निष्पन्न होईल असेही नाही. मृत्यूचा हा सिलसिला असाच सुरू राहिला, तर काय करायचे, हा महत्वाचा प्रश्‍न तसाच उरतो.

COMMENTS