कुठे अडविले, कुठे तोडले बॅरिकेटस्

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कुठे अडविले, कुठे तोडले बॅरिकेटस्

केंद्र सरकारने लागू केलेल्या कृषी कायद्यांच्या विरोधात सुरू झालेल्या शेतकरी आंदोलनाला आज सात महिने झाले.

१२ वी ची परीक्षा पास होण्यासाठी हजारोंनी पैसे देऊनही मदत नाही
चक्क खून करून पोलिसांना करायचा चेलेंज LOKNews24
आपली पेन्शन आपल्या दारी मोहिमेला प्रथम पुरस्कार

नवी दिल्ली : केंद्र सरकारने लागू केलेल्या कृषी कायद्यांच्या विरोधात सुरू झालेल्या शेतकरी आंदोलनाला आज सात महिने झाले. या निमित्तान शेतकर्‍यांनी देशभरात आंदोलन केले. मोर्चे, निवेदने देण्यात आली. कुठे शेतकर्‍यांना रोखण्यात आले, कुठे शेतकर्‍यांनी बॅरिकेटस् तोडण्यात आली. 

संयुक्त किसान मोर्चाकडून देशभरात राजभवनावर मोर्चे काढण्यात आले. दरम्यान, शेतकर्‍यांकडून राष्ट्रपतींना संबोधित करत लिहिण्यात आलेले पत्र प्रत्येक राज्यातील राज्यपाल आणि उप राज्यपालांकडे सोपवण्यात आले. शेतकर्‍यांकडून या आंदोलनाला ’शेती वाचवा, लोकशाही वाचवा दिवस’ असे संबोधण्यात आले. या दरम्यान अनेक ठिकाणी पोलिस आणि प्रशासनात धुमश्‍चक्री उडाल्याच्या बातम्या समोर येत आहेत. शेतकरी नेते राकेश टिकैत यांच्या अटकेची अफवादेखील या दरम्यान पसरली; मात्र खुद्द राकेश टिकैत आणि दिल्ली पोलिसांकडून ’सोशल मीडिया’द्वारे या अफवा असल्याचे स्पष्ट करण्यात आले.

हरयाणाच्या पंचकुलामध्ये शेतकरी आणि पोलिसांमध्ये वाद उफाळलेला दिसून आला. चंदीगडमध्ये हरयाणाच्या राज्यपालांना पत्र सोपवण्यासाठी हजारो शेतकरी पंचकुलाहून निघाले होते. रस्त्यात पोलिसांनी त्यांना अडवण्यासाठी बॅरिकेटस् लावले होते. त्यामुळे संतापलेल्या शेतकर्‍यांनी बॅरिकेटस् उखडून बाजुला फेकले. लखनऊमध्येही शेतकरी संघटना राज्यपालांना निवेदन देण्यासाठी निघालेले असताना पोलिसांकडून बॅरिकेटस् लावून त्यांना रोखण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यानंतर 6-7 शेतकर्‍यांनी राज्यपालांची भेट घेत त्यांना निवेदन सोपवले. काळे कृषी कायदे मागे घेतले जात नाहीत, तोपर्यंत आंदोलन कायम राहील, असा निर्धारही शेतकर्‍यांनी व्यक्त केला. उल्लेखनीय म्हणजे, आणीबाणी लागू होऊन 46 वर्षपूर्तीच्या दुसर्‍याच दिवशी शेतकर्‍यांचं हे आंदोलन सुरू आहे.

COMMENTS