राज्यातील 11 हजार कैद्यांचे लसीकरण

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राज्यातील 11 हजार कैद्यांचे लसीकरण

कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून सध्या देशात लसीकरणाची प्रक्रिया सुरू आहे. राज्यातील कारागृहात असलेल्या कैद्यांचे लसीकरण सुरू आहे.

ओबीसी आरक्षणासाठी भाजप नेते रस्त्यांवर ; राज्यभर चक्का जाम आंदोलन
लातूर जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा
भाजप अनुसूचित जाती मोर्चाच्या मध्य मंडळाध्यक्षपदी अशोक भोसले

पुणे/प्रतिनिधीः कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून सध्या देशात लसीकरणाची प्रक्रिया सुरू आहे. राज्यातील कारागृहात असलेल्या कैद्यांचे लसीकरण सुरू आहे. आतापर्यंत दहा हजार 700 कैद्यांचे लसीकरण करण्यात आले आहे. लहान असलेल्या नऊ जिल्हा कारागृहांतील सर्व कैद्यांचे लसीकरण झाले आहे.

कोरोनाचा संसर्ग वाढल्यानंतर कारागृहातील कैदी व कर्मचार्‍यांनादेखील कोरोनाची लागण झाली होती. यामध्ये आतापर्यंत 13 कैद्यांचा मृत्यू झाला आहे. नऊ कर्मचारी कोरोनामुळे दगावले आहेत. कारागृहात कोरोनाचा संसर्ग वाढू नये, म्हणून प्रत्येक जिल्ह्यात स्वतंत्र तात्पुरती कारागृहेदेखील उभारण्यात आली होती. त्या ठिकाणी काही दिवस कैद्याला ठेवूनच त्यानंतर मुख्य कारागृहात हलविण्यात येत होते. राज्यात सध्या मध्यवर्ती, जिल्हा, खुली अशी 47 कारागृहे आहेत. या ठिकाणी साधारण 33 हजार 405 कैदी आहेत. या सर्व कारागृहांत लसीकरणाला सुरुवात करण्यात आली आहे. आतापर्यंत 10 हजार 700 कैद्यांना कोरोनावरील लस देण्यात आली आहे. लसीकरणाची प्रक्रिया सुरूच आहे. राज्यात असलेल्या 47 कारागृहांपैकी लहान असलेल्या नऊ जिल्हा कारागृहांत कैद्यांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. यवतमाळ, वाशीम, वर्धा, बुलडाणा, गडचिरोली खुले कारागृह, मोशी खुले कारागृह, विसापूर खुले कारागृह, आटपाडी खुली कॉलनी, सिंधुदुर्ग जिल्हा कारागृहांतील सर्व कैद्यांना लस देण्यात आली आहे. आधार कार्ड नसलेल्या कैद्यांना विशेष बाब म्हणून लस देण्यात येत आहे. त्यासाठी स्थानिक प्रशासनाकडून परवानगी देऊन आधार कार्ड नसलेल्या 45 वर्षांवरील कैद्यांना लस देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. येरवडा मनोरुग्णालयातील 471 कैद्यांकडे आधार कार्ड नसल्यामुळे त्यांना विशेष बाब म्हणून लस देण्यात येणार आहे.

COMMENTS