Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राष्ट्रवादीचे कार्यालय काँग्रेस ताब्यात घेणार का?

काँग्रेसचे पदाधिकारी कोणती भूमिका घेणार; काँग्रेस प्रेमींचे लक्ष राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयाची जागा काँग्रेस पक्षाच्या नावावर आहे. यापासू

राष्ट्रीय लोकअदालतीला जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद; 13 हजार 177 प्रकरणे निकाली
परप्रांतीयांना डांबून ठेवल्याप्रकरणी पिता-पुत्रावर गुन्हा दाखल
सरकारी नोकर्‍यांमध्ये कंत्राटी पध्दतीने नोकर भरतीचा दुर्भाग्यपूर्ण निर्णय : आ. पृथ्वीराज चव्हाण

काँग्रेसचे पदाधिकारी कोणती भूमिका घेणार; काँग्रेस प्रेमींचे लक्ष

राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयाची जागा काँग्रेस पक्षाच्या नावावर आहे. यापासून आम्ही अनभिज्ञ होतो.अचानक हा विषय समोर आल्याने या जागेच्या कागदपत्रांची माहिती घेतो. वकिलांच्या सल्ल्यानुसार योग्य ती कायदेशीर बाबी तपासून घेऊ. जर राष्ट्रवादी कार्यालयाच्या जागेचा उतारा प्रेसिडेंट तालुका काँग्रेस कमिटी वाळवा नावावर निघत असेल तर राष्ट्रवादीने नैतिकता पाळून काँग्रेस कार्यालय रिकामे करावे.
जितेंद्र पाटील, तालुकाध्यक्ष, वाळवा काँग्रेस पक्ष

इस्लामपूर / प्रतिनिधी : राष्ट्रवादी पक्षाच्या स्थापनेनंतर येथील काँग्रेसच्या कार्यालयाच्या इमारतीचा ताबा राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यानी घेतला आहे. कार्यालय काँग्रेसच्या नावावर असून, ताबा मात्र गेल्या 24 वर्षांपासून राष्ट्रवादीचा आहे. नुकत्याच पार पडलेल्या काँग्रेस मेळाव्यात यावरती जोरदार मंथन झाले. काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी कार्यालय ताब्यात घेण्याचे आदेश पदाधिकार्‍यांना दिले आहेत. त्यामुळे राजकीय गोटात खळबळ माजली आहे. आता काँग्रेसचे पदाधिकारी नेमकी कोणती भूमिका घेतात याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.
सातारा जिल्ह्यातील प्रत्येक तालुका ठिकाणी एक काँग्रेस भवन काढावे असे लेखी पत्र काँग्रेस कमिटी दिल्ली येथून प्रत्येक जिल्ह्यात दि. 27 फेब्रुवारी 1954 साली आले होते. यावर तत्कालीन वाळवा तालुका अध्यक्ष शंकर बापूराव पाटील व चिटणीस यशवंतराव मोरे यांनी काँग्रेस भवनासाठी जागा मिळावी म्हणून दक्षिण सातारा-सांगली जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी केली होती. त्यानंतर लगेच जुलै महिन्यांत जागा मिळाल्याने काँग्रेस भवनसाठी एक खोली बांधण्यात आली. त्यानंतर तत्कालीन तालुकाध्यक्ष मोहन पतंगराव पाटील यांनी अधिकची जागा शासनाकडून मिळवून 7 ऑक्टोंबर 1959 रोजी बांधकाम केले. सिटी सर्व्हेला 26 ऑगस्ट 1961 रोजी प्रेसिडेंट तालुका काँग्रेस कमिटी वाळवा अशी नोंद झाली. ती आजही कायम आहे, असे काँग्रेसचे पदाधिकारी सांगत आहेत.
माजी मंत्री आ. जयंत पाटील यांनी सन 1985 मध्ये काँग्रेस पक्षात प्रवेश केला. काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर 1999 पर्यंत त्यांनी तालुक्यातील सर्व निवडणुका व विधानसभा काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर लढवली आहे. खासदार शरदचंद्रजी पवार यांनी सन 1999 मध्ये काँग्रेस पक्षाशी फारकत घेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. आ. जयंत पाटील यांनी शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केला. तेंव्हापासून आज अखेर काँग्रेस पक्ष कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यालय सुरू आहे. मात्र, तालुक्यातील काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी यापासून अनभिज्ञ होते.
चार दिवसांपूर्वी राजारामबापू नाट्यगृहात ओबीसी काँग्रेसचा मेळावा झाला. या मेळाव्यासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आले होते. या मेळाव्यात महाराष्ट्र काँग्रेस ओबीसी विभाग प्रदेश अध्यक्ष भानुदास माळी म्हणाले की, राष्ट्रवादी कार्यालय हे काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात सुरू आहे. राष्ट्रवादी कार्यालयाचा सिटी सर्वे उतारा हा प्रेसिडेंट तालुका काँग्रेस कमिटी वाळवा यांच्या नावाने निघत आहे. त्यामुळे काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांनी राष्ट्रवादी कार्यालयाची जागा ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न करा, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासमोर माळी यांनी सांगितले.
सन 1999 पासून काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यालय सुरू आहे. तासगाव व कवठेमहांकाळ येथे राष्ट्रवादी कार्यालयाची जागा काँग्रेस पक्षाने आपल्या ताब्यात घेतली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयाच्या इमारतीतील खालचा भाग भाडे तत्वावर दिला आहे. याचे भाडे राष्ट्रवादी कार्यालयाला मिळत असल्याचे काँग्रेसचे पदाधिकारी सांगत आहेत. तरी आजपर्यंत राष्ट्रवादीला मिळालेले भाडे याचा हिशोब काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी मागणार का? तसेच राष्ट्रवादी कार्यालयाच्या जागेवर काँग्रेस पक्षाचा हक्क सांगणार का? या प्रश्‍नाकडे तालुक्यातील काँग्रेसप्रेमी नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयाची जागा काँग्रेस पक्षाच्या नावावर आहे. याबाबत मला काहीही माहिती नाही.
विजय पाटील, तालुकाध्यक्ष, वाळवा राष्ट्रवादी काँग्रेस

COMMENTS