रेमडीसीवीर-ऑक्सिजनचा पुन्हा तुटवडा…रुग्णांसह प्रशासनही चिंतेत..

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

रेमडीसीवीर-ऑक्सिजनचा पुन्हा तुटवडा…रुग्णांसह प्रशासनही चिंतेत..

जिल्ह्यात रेमीडीसीवीर इंजेक्शन्सचा पुन्हा तुटवडा भासू लागला आहे. तर ऑक्सिजनचा साठा केवळ चार दिवस पुरेल इतकाच आहे.

महादजी शिंदे विद्यालयातील माजी विद्यार्थ्यांचा मेळावा उत्साहात
एकविराच्या महिलांना उदबत्ती व धूप बनवण्याचे प्रशिक्षण
अनधिकृतपणे आर्थिक हित साधून ५ G मोबाईल टॉवरला परवानगी दिल्याचा आरोप… लोकायुक्तांकडे तक्रार

 अहमदनगर/प्रतिनिधी-जिल्ह्यात रेमीडीसीवीर इंजेक्शन्सचा पुन्हा तुटवडा भासू लागला आहे. तर ऑक्सिजनचा साठा केवळ चार दिवस पुरेल इतकाच आहे. यामुळे रुग्णांसह प्रशासनही चिंतेत आहे. प्रशासनासमोर रुग्णालयांच्या मागणीनुसार इंजेक्शनची उपलब्धता करण्याचे व दुसरीकडे आणखी ऑक्सिजन मिळवण्याचे आव्हान उभे आहे. तशात रुग्णालयांनी आता रुग्णांच्या नातेवाईकांनी परस्पर आणलेल्या इंजेक्शनचे अधिकृत बिल असेल तरच ते स्वीकारण्याचा निर्णय घेतला असल्याने रुग्णांच्या नातेवाईकांना ओळखीपाळखीतून वा बाहेरगावाहून इंजेक्शन आणण्याचा मार्गही खुंटला आहे. 

    दरम्यान, प्रशासनाने आता प्रांताधिकारी स्तरावर इंजेक्शन वाटप व नियोजनाचे अधिकार दिले आहेत. जिल्ह्यामध्ये रेमडीसीविर इंजेक्शनचा पुरवठा अत्यंत कमी प्रमाणामध्ये होत असतानाच जे उपलब्ध होतात, त्यांचे आता नियोजन कशा पद्धतीने करायचे याचा आराखडा प्रशासन करीत आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी संबंधित इंजेक्शन हे रुग्णालयांना पुरवण्यासाठी प्रांताधिकार्‍यांना नियुक्त केले असून त्याबाबतचे आदेश दिले आहे. मात्र, जिल्ह्यामध्ये दररोज येणारा साठा अत्यंत तुटपुंजा असल्यामुळे पुन्हा इंजेक्शनसाठी धावपळ सुरू झाली आहे. जिल्ह्यामध्ये इंजेक्शनच्या साठा कमी प्रमाणात असल्यामुळे ते कोणा-कोणाला व कसे पुरवायचे असा प्रश्‍न आता निर्माण झालेला असतानाच दुसरीकडे ऑक्सिजनचा पुरवठाही म्हणावा असा नाही. चार दिवस पुरेल एवढाच साठा नगर जिल्ह्यामध्ये सध्या आहे. दोन दिवसापूर्वी नाशिक येथून दोन टँकर नगर येथे आले होते. त्यामुळे नगर जिल्ह्याला आता चार दिवस पुरेल एवढा साठा आहे. इंजेक्शन रुग्णालयांना मिळाले पाहिजे यासाठी रुग्णांच्या नातेवाईकांची इंजेक्शन मिळवण्यासाठी पळापळ सुरू झाली आहे. नगर जिल्ह्याला 14 एप्रिलपासून अवघा 8 हजार 343 इंजेक्शनचा साठा उपलब्ध झाला आहे. दुसरीकडे नगर शहरामध्ये रुग्ण संख्याही वाढत चालली आहे. विशेष म्हणजे तालुका स्तरावर  असणारे रुग्ण नगर शहरामध्ये येऊ लागले आहे. त्यामुळे जिल्हा रुग्णालयामध्ये आता जागाच शिल्लक राहिली नाही, तर खासगी रुग्णालयांमध्ये सुद्धा तशा प्रकारची अवस्था पुन्हा पाहायला मिळत आहे. नगर जिल्ह्यासाठी जे इंजेक्शन येते आहे त्याचे नियोजन करण्यासाठी आता प्रशासनाने निर्णय घेतला असून प्रांताधिकार्‍यांना आता त्याबाबतचे नियोजन करण्याचे आदेश दिले आहे. जे इंजेक्शन तालुक्याला पुरविले जातील, ते संबंधित रुग्णालयांमध्ये देण्याची जबाबदारी आता निश्‍चित करण्यात आली आहे. या आदेशाची अंमलबजावणी सुरू झाली आहे.

 अवघी 537 इंजेक्शन्स आली

प्रशासनाकडे इंजेक्शनचा पुरवठा जसा होईल, त्यानुसार तो संबंधित तालुक्यांना देण्यात येतो. त्यासाठी आता प्रांताधिकार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्ह्यामध्ये मंगळवारी 537 इंजेक्शन प्राप्त झाले व त्याचे वितरण त्या-त्या तालुक्यात करण्यात आले आहे. शहरी भागांमध्ये सुद्धा रुग्ण संख्या वाढत असल्यामुळे तेथेसुद्धा आता इंजेक्शन पुरवण्यात येत असल्याचे उपजिल्हाधिकारी उदय किसवे यांनी सांगितले. रुग्णांच्या नातेवाईकांकडे इंजेक्शन देत नसून थेट रुग्णालयात देत असल्याचेही त्यांनी सांगितले.

COMMENTS