पाथर्डी प्रतिनिधी - महाराष्ट्र बोर्डच्या १२वी च्या इंग्रजी भाषेच्या पेपरला शहरातील एम एम निऱ्हाळी विद्यालयाच्या परिक्षा केंद्राबाहेर पेपर
पाथर्डी प्रतिनिधी – महाराष्ट्र बोर्डच्या १२वी च्या इंग्रजी भाषेच्या पेपरला शहरातील एम एम निऱ्हाळी विद्यालयाच्या परिक्षा केंद्राबाहेर पेपर संपल्यानंतर विद्यार्थ्यांनी आमच्याकडून पैसे घेऊन आम्हाला कॉपी पुरवली नाही.या कारणावरून एका एजंटला घेराव घालत मोठा गोंधळ घातला.त्यानंतर घटनास्थळी पोलिसांनी येत संबंधित एजंटला ताब्यात घेत पोलिस ठाण्यात नेले त्यानंतर पोलिस ठाण्यात दोन तास चाललेल्या गोंधळानंतर संबंधित एजंटच्या बॉसने विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना पुढील पेपरला कुठलीही अडचण येणार नाही अशी फोनवर हमी दिल्यानंतर विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी कुठलीही तक्रार दाखल न करता परतीची वाट धरली.
याबाबत सविस्तर माहिती अशी की,मंगळवारी १२ वी बोर्डाच्या च्या पेपरला सुरुवात झाली आहे.तालुक्यातील अनेक केंद्र हे संवेदनशील असल्याने तेथे कॉपीचा कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही याची काळजी विद्यालयाने घेतली होती.प्रशासनाच्या या भूमिकेने मात्र तालुक्याबाहेरील प्रवेश असणाऱ्या विद्यार्थ्यांची फजिती झाली.इंग्रजीचा पेपर संपल्यानंतर आम्ही एवढे हजारांनी पैसे दिले,तुम्ही पास करण्याची हमी दिली होती,आम्हाला कुठलीही मदत झाली नाही,आम्ही पास कसे होणार,आमचे पैसे परत करा असे म्हणत एजंटला घेराव घातला.त्यानंतर सदरील घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलिसांनी येत संबंधित एजंटला पोलीस ठाण्याला घेऊन गेले असता बाहेरील विद्यार्थ्यांनी आणि त्यांच्या पालकांनी मोर्चा पोलीस ठाण्याकडे वळवला.
विद्यार्थी आणि पालक हे पोलीस ठाण्याला आल्यानंतर आम्ही मुंबई,औरंगाबाद,सातारा, पुणे,बीड या ठिकाणाहून आलो खर्च करून आलो आहोत.तसेच संबंधित एजंटने आमच्याकडून हजारांनी पैसे घेत आमच्या मुलाना पास करण्याची हमी दिली आहे.परंतु आजच्या पेपरला मुलांना कुठल्याही प्रकारची मदत केली नाही.आमच्या मुलांना कुठलीही कॉपी करू दिली नाही.तालुक्यातील मुले खुशाल कॉपी करत होते.आमच्या मुलांना वेगळा न्याय आणि तालुक्यातील मुलांना वेगळा न्याय का?असे आरोप यावेळी त्यांनी केले.
त्यानंतर संबंधित एजंटचा बॉसचा त्यातील एका पालकाला फोन आल्यानंतर त्याने मी विद्यार्थ्याच्या हिताचे काम करत आहे.झालं गेलं सोडून द्या तुमच्या मुलांची जबाबदारी माझी असे म्हणत येणाऱ्या पेपरला कुठलीही अडचण येणार नाही असा शब्द दिल्यानंतर विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी उद्या पाहू असे म्हणत पोलीस ठाण्यात कुठलीही तक्रार दाखल न करता परतीची वाट धरली.
COMMENTS