सातारा / प्रतिनिधी : आज 103 वर्षे पूर्ण झाल्यानंतरही रयत शिक्षण संस्थेत खूप चांगले प्रकल्प राबविले जात आहेत. नव्या योजना सुरू केल्या आहेत. स्वतःच
सातारा / प्रतिनिधी : आज 103 वर्षे पूर्ण झाल्यानंतरही रयत शिक्षण संस्थेत खूप चांगले प्रकल्प राबविले जात आहेत. नव्या योजना सुरू केल्या आहेत. स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी विद्यार्थ्याला आवश्यक ती कौशल्ये देण्याचा प्रयत्न केला जात आहे. तरी देखील भविष्यकालीन विचार करता कल्पक व लवचिक अभ्यासक्रम निर्माण करून वैश्विक समस्या सोडवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणारा रयतचा विद्यार्थी संस्थेतून घडावा, असे मत संस्थेच्या मॅनेंजिंग कौन्सिलचे सदस्य आ. दिलीप वळसे-पाटील यांनी व्यक्त केले.
ते रयत शिक्षण संस्थेच्या वतीने कर्मवीर समाधी परिसरात आयोजित संस्था वर्धापन दिन समारंभामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. याप्रसंगी संस्थेचे व्हाईस चेअरमन अॅड. भगीरथ शिंदे ,सहसचिव राजेंद्र साळुंखे, संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य अॅड. रवींद्र पवार, प्राचार्य आर. डी. गायकवाड, के. के. घाडगे, अॅड. दिलावरसाहेब मुल्ला, प्रि. डॉ. बी. टी. जाधव, प्राचार्य डॉ. के.जी. कानडे, विलास महाडिक यांची प्रमुख उपस्थिती होती.
आ. वळसे-पाटील म्हणाले, कर्मवीर भाऊराव पाटलांनी सत्यशोधक समाजाचा वारसा चालवत बहुजनासाठी ज्ञानाची कवाडे उघडली. त्यांच्यावर महात्मा गांधी व महात्मा फुले यांच्या विचाराचा प्रभाव होता. त्यांचा वारसा त्यांनी पुढे चालवला. बहुजनांच्या जीवनात बदल घडला पाहिजे. यासाठी सुरुवातीच्या काळात रयत शिक्षण संस्थेने खेड्यापाड्यापर्यंत विस्तार केला. कर्मवीर अण्णांच्या नंतर यशवंतराव चव्हाण वसंतराव-दादा पाटील, शरदराव पवार यांनी संस्थेचे अध्यक्षपद भूषवले. गेल्या शंभर वर्षातील प्रगती आपण सारेच पाहतो आहोत. तरीदेखील भविष्यकाळातील आव्हाने व नवीन शैक्षणिक धोरण यांचा विचार करता संस्थेने ऑफलाइनप्रमाणे ऑनलाईन शिक्षणाकडे लक्ष दिले पाहिजे. संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील क्लस्टर युनिव्हर्सिटीचे काम लवकरच सुरू होईल. रयत शिक्षण संस्थेतील सेवकांनी समर्पण पध्दतीने संस्था चालवली. संस्थेचा विस्तार केला, महाराष्ट्र कर्नाटकातील अनेकांना शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून दिल्या. कित्येकांना रोजीरोटी मिळाली अण्णा आयुष्याच्या शेवटपर्यंत कार्य करत राहिले. परंतू अण्णांच्या नंतरदेखील सिंहावलोकन करून अधिकाधिक कार्य करण्याची जबाबदारी तुम्हा-आम्हा सर्वांची आहे. सन 1986 नंतर 34 वर्षांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 आले आहे. त्याचा विद्यार्थी शिक्षक, पालक व संस्था यावर काय परिणाम होईल, याचा अभ्यास आपण सर्वांनी केला पाहिजे. केवळ विद्यार्थ्याला डिग्री मिळवून देणे हे आपले उद्दिष्ट असता कामा नये. तर एक समर्थ व सशक्त नागरिक रयत मधून घडावा. त्याने क्रिटिकल थिंकिंग व सायंटिफिक दृष्टीने विचार करणे गरजेचे आहे. भविष्यात क्रेडिट सिस्टीम येऊ घातलेली आहे. शाश्वत विकासाची जी उद्दिष्टे आहेत ती साध्य करण्यासाठी रयत शिक्षण संस्थेत प्रयत्न व्हावेत.
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना संस्थेचे चेअरमन मा. डॉ. अनिल पाटील म्हणाले की, संस्थेला ग्वाल्हेर, कोल्हापूर, फलटण, सातारा, औंध, भोर यासारख्या संस्थानानी मदत केली. तसेच संस्थेला गावांनी आसरा दिला. तुटपुंज्या वेतनावर शिक्षकांनी संस्था चालवली आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी संस्थेवर विश्वास दाखवला. स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये सरकारची कोणतीही मदत नसताना अण्णांनी 578 व्हॉलंटरी शाळा सुरू केल्या. काही गावांनी जमिनी दिल्या, घरे गहाण ठेवून संस्थेसाठी लागणारा फंड जमा केला. कुठे ग्रामपंचायत बिनविरोध करून येणारे पैसे देणगी स्वरूपात संस्थेला दिले. संस्था अत्यंत दुर्गम भागापर्यंत आदिवासी क्षेत्रापर्यंत पोहोचलेली आहे. संस्थेने कोट्यवधी रुपये गुंतवून सी ट्रिपल आय सारखी केंद्रे उभारली आहेत. आज संस्थेकडे 223 पेटंट असून त्यातील 35 ग्रॅण्टेड आहेत. पैकी पाच कृत्रिम बुध्दिमत्तेची तर पाच कॅन्सरवरील औषधासंदर्भातील आहेत. भविष्यकाळात आर्टिफिशियल इंटेलिजन्स, रोबोटिक्स, डेटा सायन्स, क्लाऊड कॉम्पिटिंग, सायबर सिक्युरीटी यासारख्या अभ्यासक्रमांना नोकरीच्या संधी आहेत. यापुढे रिसर्च इन्स्टिट्यूट, टीचिंग इन्स्टिट्यूट व ऑटोनॉमस कॉलेज अशा तीन प्रकारच्या फॅकल्टी राहणार आहेत. मल्टी डिसिप्लिनरी महाविद्यालयाचे यापुढे प्राबल्य राहणार आहे. या वर्षीपासून संस्था दहा विद्यार्थ्यांसाठी संस्थेचे अध्यक्ष शरद पवारसाहेब यांच्या नावाने स्कॉलरशिप देऊन पाच विद्यार्थ्यांना परदेशी पाठवणार आहे. तर पाच परदेशी विद्यार्थ्यांना रयतमध्ये शिक्षणाची संधी देणार आहे. संस्था उभारण्यासाठी समाजातील प्रबोधनकार ठाकरे, मालोजीराजे नाईक निंबाळकर, कर्जतचे दादा पाटील, माहुलकर दादा यासारख्या असंख्य धुरिणांनी प्रयत्न केले आहेत.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे सचिव डॉ. विठ्ठल शिवणकर यांनी केले. उपस्थितांचे आभार संस्थेच्या उच्च शिक्षण विभागाचे सहसचिव डॉ. शिवलिंग मेनकुदळे यांनी केले तर सूत्रसंचालन डॉ. सविता मेनकुदळे यांनी केले. या कार्यक्रमास रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडीचे सदस्य, सातार्याच्या विविध महाविद्यालयाचे प्राचार्य, आजी-माजी लाइफ मेंबर्स, लाइफ-वर्कर्स, शिक्षक व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.
COMMENTS