मुंबईत एका महिन्यात ऑक्सिजन प्रकल्प

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुंबईत एका महिन्यात ऑक्सिजन प्रकल्प

कोरोना विषाणूचा संसर्ग मुंबईत अधिकाधिक पसरत असल्याने बाधितांचे प्रमाण वाढत चालले आहे.

भारतीय लष्कराचे चीता हेलिकॉप्टर कोसळले
भारनियमनाविरोधात केडगावकर रस्ता रोकोच्या पवित्र्यात
अभिनेत्री कल्याणी कुरुळे-जाधवचे अपघातात निधन

मुंबई/प्रतिनिधीः कोरोना विषाणूचा संसर्ग मुंबईत अधिकाधिक पसरत असल्याने बाधितांचे प्रमाण वाढत चालले आहे. मुंबई महापालिका पुन्हा कोरोनाविरोधात लढा देत असून त्यातील ऑक्सिजनची निर्माण झालेली त्रुटी भरून काढण्यासाठी ऑक्सिजन प्रकल्प उभारण्याचीही तयार अंतिम टप्प्यात आली आहे. त्यासाठी मुंबईतील 12 ठिकाणांची निवड झाली असून त्यात प्रामुख्याने कोरोना जंबो सेंटरसह रुग्णालयांचाही समावेश आहे. पुढील एका महिन्यात सर्वच्या सर्व 12 केंद्रात ऑक्सिजन प्रकल्प तयार होऊन ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत होणार आहे.

मुंबईतच नव्हे, तर राज्यातील रुग्णालयांत रुग्णांना प्रवेशापासून ऑक्सिजनच्या कमतरतेसारख्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. ऑक्सिजन मिळत नसल्याने रुग्णांना अन्यत्र नेण्याचीही वेळ उद्भवली आहे, म्हणून महापालिकेने अतिरिक्त ऑक्सिजन सिलिंडरच्या खरेदीचा निर्णय घेतला आहे; मात्र रुग्णांना ऑक्सिजन सतत आणि कोणत्याही अडथळ्याविना उपलब्ध होण्यासाठी महापालिकेनेच आता ऑक्सिजन प्रकल्प उभारण्याचे ठरविले आहे. त्यासाठी आवश्यक असलेली परवानगी आदी सर्व प्रक्रिया हाती घेण्यात आली आहे. मुंबई महापालिकेने ऑक्सिजन प्रकल्प उभारण्यासाठी आवश्यक असणारी जागा, मनुष्यबळ, आवश्यक ते तंत्रज्ञान आदी बाबी विचारात घेतल्या आहेत.

सध्या ऑक्सिजनची मागणी प्रचंड प्रमाणात वाढली असल्याने स्थानिक पातळीवरील जंबो सेंटर, रुग्णालयांत ऑक्सिजनचा पुरवठा होण्यावर सध्या लक्ष केंद्रीत केले जात आहे. इतरत्रही ऑक्सिजन मिळत नसल्याने परावलंबत्व कमी करण्यासाठी महापालिका आग्रही आहे. स्वालंबनाचे तंत्र अवलंबत त्या-त्या ठिकाणी 24 तास सुरळीत ऑक्सिजनचा पुरवठा होण्यासाठी 12 ठिकाणी ऑक्सिजन प्रकल्प बांधले जाणार असल्याचे मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांनी स्पष्ट केले. एका जंबो सेंटर वा रुग्णालयात ऑक्सिजन प्रकल्प तयार झाल्यावर तिथे एका तासात 2 ते 5 हजार क्युबिक मीटर ऑक्सिजन उपलब्ध होईल. त्यातून एकाचवेळी 25 ते 30 रुग्णांना त्याचा पुरवठा करता होणार आहे. त्याचप्रकारे इतर ठिकाणीही अशाच पद्धतीने प्रकल्प तयार झाले, की तिथल्या रुग्णालयांना ऑक्सिजन सुरळीत मिळण्यात अडचणी येणार नाहीत. एका ट्रॉमा केंद्रात बांधलेल्या ऑक्सिजन प्रकल्पासाठी सुमारे अडीच कोटी रुपये इतका खर्च आला होता. महापालिकेने सध्या 12 जंबो केंद्र, रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन प्रकल्प उभारण्यासाठी निविदा मागविल्या आहेत. त्यावर निर्णय होताच तातडीने प्रकल्प उभारण्याचे काम हाती घेण्यात येईल, असे वेलरासू यांनी सांगितले. सध्या पालिकेच्या अखत्यारीतील मोठ्या जंबो केंद्रासह इतर रुग्णालयांचा त्यात समावेश आहे. त्यात बीकेसी, दहिसर, नेस्को, वरळी जंबो सेंटरचा प्रामुख्याने समावेश आहे.

COMMENTS