महागाईचा कडेलोट

Homeताज्या बातम्यासंपादकीय

महागाईचा कडेलोट

देशभरात गेल्या अनेक महिन्यांपासून सर्वसामान्य जनता महागाईचा टाहो फोडत असतांना, त्या महागाईचा आवाज अजूनही केंद्र सरकारपर्यंत पोहचलेला नाही. विशेष म्हण

जम्मू-काश्मिरमधील प्रश्‍न प्रलंबितच
हिंडेनबर्गचे भूत पुन्हा सज्ज
संसदेचा आखाडा

देशभरात गेल्या अनेक महिन्यांपासून सर्वसामान्य जनता महागाईचा टाहो फोडत असतांना, त्या महागाईचा आवाज अजूनही केंद्र सरकारपर्यंत पोहचलेला नाही. विशेष म्हणजे महागाईचा दर हा केंद्रीय अर्थखात्याच्या अखत्यारित असणार्‍या संस्था जाहीर करतात. गेल्या तीन महिन्यापासून म्हणजे मार्च, एप्रिल, मे या तीन महिन्यात महागाईच्या दराने नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. तरी देखील केंद्र सरकार महागाई रोखण्यात अपयशी ठरतांना दिसून येत आहे. मे महिन्यात महागाई दर 15.88 या विक्रमी पातळीवर गेला. यातील आकडेवारीवरून महागाईचा कडेलोट झाल्याचे दिसून येत आहे. एप्रिल महिन्यात महागाईचा दर 15.08 टक्के इतका होता. मागील 10 वर्षांतील महागाईचा हा उच्चांकी स्तर आहे.केंद्र सरकारने मे या महिन्याची महागाईची आकडेवारी जाहीर केली. त्यात घाऊक मूल्यावर आधारित महागाई दर 15.88 टक्के इतका वाढला आहे. सलग 14 महिने महागाई दर 10 टक्क्यांवर आहे. किरकोळ महागाईचा दर मात्र किंचित घसरला आहे. मे महिन्यात किरकोळ महागाईचा दर 7.04 टक्के इतका आहे. त्याआधी एप्रिल महिन्यात तो 7.79 टक्के इतका होता. प्रामुख्याने खनिज तेल, कच्चे पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू, अन्नपदार्थ, मूलभूत धातू, अ-खाद्य वस्तू, रसायने आणि रासायनिक उत्पादने आणि अन्न उत्पादने इत्यादींच्या किमतींमध्ये वाढ झाल्यामुळे महागाईत वाढ नोंदवण्यात आली होती.
या आकडेवारीवरून महागाईचा दर सातत्याने चढाच राहिला असतांना तो कमी करण्यात सरकारला अपयश आल्याचे दिसून येत आहे. मात्र तरी देखील ठोस निर्णय घेण्याऐवजी केंद्र सरकार वर-वरची मलमपट्टी करतांना दिसून येत आहे. हा महागाईचा भडका, मोदी सरकार कसा रोखणार हा प्रश्‍न आहे. अन्नधान्य व इंधनाच्या किंमती सातत्याने वाढत चालल्या आहेत. अशावेळी यातून मार्ग कसा काढणार हा महत्वाचा प्रश्‍न आहे. महागाई, बेरोजगारीचा निर्देशांक वाढत चालला आहे. रिझर्व्ह बँकेने महागाईच्या वाढीबद्दल चिंता व्यक्त केली आहे. किंमती कमी करण्याचे आश्‍वासन देवून मोदी सरकार सत्तेत स्थानापन्न झाले. मात्र त्यांना किंंमती कमी करण्यात सातत्याने अपयश येतांना दिसून येत आहे. पूर्वीचे डाळीचे, इंधनाचे, जीवनावश्यक वस्तूंखो दर बघितले, म्हणजे महागाई किमान चारपटीने आजही कायम आहे. परंतु सर्वसामान्य जनतेला महागाई कमी झाल्याचे सांगून नवे सरकार कसे आपल्या धोरणात यशस्वी झाले आहे, याची अप्रत्यक्ष भलावण यातून केली जात आहे. यावरुन आपणांस असे दिसून येईल की मोदी सरकार जी आश्‍वासने देवून सत्तेत आले आहेत, त्यांची पूर्तता न करता लोकांना मुर्ख बनविण्यात गुंतले आहे. परंतु त्यांना कुणीतरी कल्पना द्यायला हवी, की जगात सगळ्या लोकांना सर्वकाळ मुर्ख बनविता येत नाही. त्यामुळे सुर्य आणि जयद्रथ कधीतरी समोरासमोर येणारच आहे. खाद्यतेलाच्या किंमती देखील झपाटयाने वाढत चालल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांनी जगायचे कसे, हा महत्वाचा प्रश्‍न आहे. घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीने हजारी केव्हाच ओलांडली आहे, तेलबॅगने 200 रुपयांची मर्यादा ओलांडली असून, पेट्रोलने तर शंभरी केव्हाच ओलांडली आहे. भाजीपाला, डाळी, अन्न, धान्यांच्या किंमती सर्वसामान्याच्या आवाक्याबाहेर जातांना दिसून येत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांने जगायचे कसे, महागाईचा राक्षस त्यांचा कडेलोट करत आहे, तरी देखील अत्यावश्यक वस्तूंच्या किंमती कमी होतांना दिसून येत नाही. केंद्र सरकारने तर आता कल्याणकारी योजनांना कात्री लावली आहे. त्यामुळे देशातील वंचित घटकांनी कसे जगायचे हा प्रश्‍न त्यांना सतावतोय. गेल्या अनेक महिन्यांपासून महागाईचा दर जर असाच चढता राहिला, तर सर्वसामान्यांचे जगणे मुश्किल होईल.

COMMENTS