पश्चिम बंगालमध्ये निवडणुका सुरू आहेत आणि पंतप्रधान बांगला देशात जातात आणि बंगाल बद्दल भाषणे देतात.
कोलकात्ताः पश्चिम बंगालमध्ये निवडणुका सुरू आहेत आणि पंतप्रधान बांगला देशात जातात आणि बंगाल बद्दल भाषणे देतात. हे निवडणुकीच्या आचारसंहितेचे संपूर्ण उल्लंघन आहे, असा आरोप मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केला. शनिवारी पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान होत आहे. त्याचवेळी मोदी बांगला देशाच्या दोन दिवसांच्या दौर्यावर गेले आहेत.
मोदी यांनी शनिवारी शेख मुजीबुर रहमान यांच्या समाधीस्थळाला भेट दिली आणि त्यांना पुष्पांजली वाहिली. ते बांगला देशातील तुंगीपारा येथे ‘बंगबंधू’ यांच्या समाधीस श्रद्धांजली वाहणारे पहिले सरकार प्रमुख झाले आहेत.पश्चिम मिदनापूर जिल्ह्यात मतदान सभांना संबोधित करताना ममता यांनी भाजपला सर्वात मोठा फसवणूक करणारा पक्ष असे संबोधले. मोदींनी शनिवारी ओराकांडी येथील मतुआ समाजाच्या मंदिराला भेट दिली. येथे त्यांनी पूजाही केली. ओराकांडी येथे मतुआ समाजाचे संस्थापक हरिशचंद्र ठाकूर यांचा जन्म झाला होता. मोदी म्हणले, मी अनेक वर्षांपासून या संधीची वाट पाहत होतो. मी 2015 मध्ये जेव्हा बांगला देश दौर्यावर आलो होतो, तेव्हा मी ओराकांडीला येण्याची इच्छा व्यक्त केली होती. ती इच्छा आज पूर्ण झाली. मोदी म्हणाले, की मी पश्चिम बंगालमध्ये ठाकुरनगरमध्ये गेलो होतो. तेथील माझ्या मतुआ भाऊ-बहिणींनी मला कुटुंबातील सदस्याप्रमाणेच प्रेम दिले होते. विशेषतः ‘बॉरो-मां’चा आपलेपणा, आई प्रमाणेच त्यांचा आशीर्वाद, माझ्या आयुष्यातील अत्यंत महत्वाचे क्षण आहेत. पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यातील मतदान होत असतानाच मोदींनी मतुआ समाजाच्या मंदिरात पूजा केली. पश्चिम बंगालमध्ये मतुआ समाजाची संख्या जवळपास दोन कोटी एवढी आहे. हा समाज पश्चिम बंगालमधील मतांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा आहे. मोदींनी आपल्या दौर्याच्या दुसर्या दिवशी ईश्वरीपूर गावातील प्राचीन जेशोरेश्वरी काली मंदिरात जाऊनही दर्शन घेतले आणि पूजा केली. मोदींच्या बांगलादेशातील या मंदिर भेटींकडे राजकीय दृष्टीनेही पाहिले जात आहे. त्यामुळेच ममता यांनी त्यांच्यावर आचारसंहिता भंगाचा आरोप केला.
COMMENTS