भारतासारख्या विविधतेने नटलेल्या देशात सांस्कृतिक दहशतवादाची ओळख करून देण्याची गरज नाही. हा सांस्कृतिक दहशतवाद सत्तेचे वारे फिरले की, अधूनमधून बाहेर न
भारतासारख्या विविधतेने नटलेल्या देशात सांस्कृतिक दहशतवादाची ओळख करून देण्याची गरज नाही. हा सांस्कृतिक दहशतवाद सत्तेचे वारे फिरले की, अधूनमधून बाहेर निघतो, आणि संपूर्ण समाजमन ढवळून काढतो. हा सांस्कृतिक दहशतवाद आठवण्याचे कारण म्हणजे मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेते किरण माने. विविध राजकीय आणि सामजिक विषयांवर प्रखर भूमिका घेणारे अभिनेते किरण माने सध्या सोशल मीडियावर खुप चर्चेत आहेत. स्टार प्रवाहवरील मुलगी झाली हो या मालिकेतील विलास पाटील ही भूमिका त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर बिंबवली. मात्र आता किरण मानेंना या मालिकेतून बाहेर काढण्यात आल्याचं पुढे आलं आहे. आपण घेत असलेल्या राजकीय भूमिकांमुळेच मालिकेतून काढण्यात आल्याचा आरोप अभिनेता किरण माने यांनी केला आहे.
किरण माने यांना या मालिकेतून बाहेर काढण्याचे प्रमुख कारण म्हणजे, त्यांनी घेतलेली शेतकर्यांची भूमिका. राजकीय वरदहस्तातून शेतकरी आंदोलन मोडीत काढल्याचे वक्तव्य त्यांनी केले होते. त्यानंतर त्यांना आपली रोजी-रोटीच गमवावी लागली. भारतासारख्या देशात आजही विरोधी मतांना महत्व दिले जात नाही. खिलाडूपणाचा तर विसरच पडला आहे. आपली मते समोरच्यांनी ग्राह्य धरांवी, अन्यथा तो देशद्रोह ठरतो, अशी काही राजकीय पक्षांची भूमिका सर्वसामान्यांवर थोपवण्याचे प्रकार अलीकडच्या काही वर्षांत समोर आले आहे. जर आपली भूमिका समोरच्याला आवडत नसेल, तर त्याला त्या संस्थेतून नोकरीतून, बाहेर काढले जाते. किंवा त्याला देशद्रोही ठरवून मोकळे होतात. हा सांस्कृतिक दहशतवाद प्रत्येक क्षेत्रात कार्यान्वित आहे. तो कुठे उघड तर कुठे छुप्या पद्धतीने सुरू आहे. याविषयी बोलतांना किरण माने म्हणतात, मी पुरोगामी विचारांचा माणूस आहे. छत्रपती शिवराय, शाहू, ़फुले, आंबेडकर, तुकोबा राया, ज्ञानेश्वर माउली यांच्या विचारांचा मी पुरस्कर्ता आहे. मी ते विचार सोशल मीडियावर मांडत असतो, अगदी तुकारामाचे विद्रोही अभंग सुद्धा. ज्या अभंगामुळे एका विशिष्ट विचारधारेच्या माणसांनी त्यांना त्रास दिला ते अभंग मी पोस्ट करीत असतो. ज्या विचारधारेनं शिवरायांच्या राज्याभिषेकाला नकार त्याबद्दल मी व्यक्त होत असतो. परंतु जे मी बोलतो ते बर्याच जणांना खपत नाही. माझी ही विचारधारा बर्याच जणांना मान्य नाही. मी कधीही कुणाला किंवा कशावरही अश्लील अथवा अर्वाच्य भाषेत टीका करीत नाही. प्रत्येक माणसाकडे एक राजकीय भूमिका असते तशी माझीही आहे. आणि ती असावी आणि आपली मतं मांडण्याचा अधिकार जोपासावा. संविधानानं मला सत्ताधार्यांवरदेखील टीका करण्याचा अधिकार दिलाय. असे माने म्हणतात. भारतीय संविधानाची अंमलबजावणी 26 जानेवारी 1950 पासून सुरु झाली. संविधानांचा स्वीकार करून 71-72 वर्षांचा कालावधी लोटला असला तरी, देखील या देशात काही विशिष्ट विचारधारा आपले विचार सर्वसामान्यांवर थोपवण्याचा प्रयत्न करतांना दिसून येतात. किरण माने जर विद्रोही भूमिका घेत असतील तर, त्याविरोधात या मालिकेच्या दिग्दर्शकाने इतका आकंडतांडव करण्याची काहीच गरज नव्हती. तसेच माने यांचे त्या मालिकेतील काम प्रक्षेकांच्या पसंतीस उतरले असतांना, त्यांना केवळ त्यांच्या भूमिकेमुळे या कामावरून कमी करण्याचा कोणताही हक्क त्यांना मिळत नाही. त्यांच्या भूमिकेशी माने सहमत असतील असे नाही. मात्र या निमित्ताने सिनेसृष्टीतील सांस्कृतिक दहशतवाद पुन्हा एकदा उफाळून आला आहे. सिनेसृष्टीत नेहमीच काही विशिष्ट घराण्यांचीच मक्तेदारी आहे. त्यामुळे नवीन चेहर्याला, किंवा कलाकाराला या सृष्टीत स्थिरावण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागतो. तसेच तो स्थिरावला तर, त्याला दिग्दर्शक, निर्मात्याच्या भूमिकेशी सहमत असावे लागते, अन्यथा जर तो स्वतंत्र विचाराचा असेल तर त्याला या सिनेसृष्टीतून कायम बाहेरचा रस्ता दाखवला जातो. किरण माने यांना देखील याच सांस्कृतिक दहशतवादाचे बळी ठरवले जात आहे. मात्र यानिमित्ताने सिनेसृष्टीतील कितीजण माने याच्या पाठीमागे उभे राहतात, किती जण ठाम भूमिका घेतात, हे बघावं लागणार आहे.
COMMENTS